Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Thursday 9 March 2017

मुक्त नेमकं कोण? स्त्री मुक्तीचा नेमका अर्थ सांगणारा वाचनीय लेख- लोकमत




पुरुषासारखं वागणं, बोलणं यालाच आपण स्त्रीमुक्ती समजतोय का? मिरवणुकीत फेटे घालून बाइक चालवणं आणि गळ्यात ढोल अडकवून वाजवणं ही मुक्ती आहे का?
मुद्दा हा की नुसतं बाह्यरंग बदलून आपण मुक्त आहोत हे मानणं म्हणजे मूर्खपणा आहे. मुक्तपणाची भावना ही विचारातून येते. आपल्या विचारांवर आपला प्रगाढ विश्वास असला की प्रत्येक कृती ही आत्मविश्वासानंच होते आणि हा आत्मविश्वास जिच्यात असतो ती खरी मुक्त स्त्री. मग तिच्या डोक्यावर पदर असो वा हॅट. गळ्यात मंगळसूत्र असो वा स्कार्फ. तिच्या स्वच्छ नजरेतली चमक हीच तिची ओळख असते.

एका समारंभात होते. हौशी माणसांनी आयोजित केलेला होता तो. कल्पकतेच्या निशाण्या जागोजागी दिसत होत्या आणि त्यातच एक घोषणा झाली की चला फेटे बांधून घ्या. सगळेजण गेले फेटे बांधायला. बघताबघता हॉल तुरेदार फेट्यांनी भरून गेला. गंमत म्हणजे यात बायकापण होत्या, सगळ्या वयाच्या. मी बघत होते. फक्त. विचारलंच कोणीतरी ‘अरे, तुम्ही नाही बांधलात फेटा? तुम्ही तर स्त्रीमुक्तीवाल्या?’ आता वय एवढं झलंय की हल्ली रागवण्याच्याऐवजी मी फक्त एक समंजस स्माइल ठोकते. विचारणारा बसू दे त्याचा अर्थ काढत.
पण त्या बाईचा तो प्रश्न मात्र मनात राहिला. इतक्या वर्षांनीपण स्त्रीमुक्ती, स्त्रीचं स्वातंत्र्य, मोकळेपणा हा आजही इतका वरवरचा आहे की पुरुषी वागणं म्हणजेच स्त्रीमुक्ती? त्या न्यायानं जिजाऊ, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी या ज्या खऱ्या अर्थानं सक्षम स्त्रिया होत्या. कारण त्या अंतर्बाह्य बदलाव करणं यालाच स्त्रीमुक्ती मानत होत्या का?
१९७५ ला आंतरराष्ट्रीय महिला दिन सुरू झाला. जवळपास चाळीस वर्षे झालीत या आंतरराष्ट्रीय हुंकाराला. आज आपण कुठे आहोत? की अजून संघर्ष चालूच आहे. पुरुषासारखं वागणं, बोलणं यालाच आपण स्त्रीमुक्ती समजतोय का? मिरवणुकीत फेटे घालून बाइक चालवणं आणि गळ्यात ढोल अडकवून वाजवणं ही मुक्ती आहे का? इतका सोपा मार्ग आहे याचा?
बाई ती कुठल्याही आर्थिक स्तरातली असो. कितीही शिकलेली असो. काहीही परिधान केलेली असो तिचा मुक्तपणा म्हणजे हे असं बेगडी वागणं नव्हे एक उदाहरण आठवतं. तन्नू वेड्स मनू रिर्टन्स हा चित्रपट आठवत असेल. त्यातील दत्तो ही दिसायला साधारण आणि गबाळीशी मुलगी. जिला पाहून तनू (ही एकदम सौंदर्यवती देखणी स्त्री) आपल्या नवऱ्याला विचारते की मला सोडून तू तिच्या प्रेमात पडलास? काय आहे हिच्यात? तेव्हा ती दत्तो शांतपणे उत्तरते, ‘मी स्वकर्तृत्वावर नोकरी मिळवलीय. राज्यस्तरावरची खेळाडू आहे. माझा संसार, मुलंबाळं यांना पोसू शकण्याची धमक आहे. तू काय केलंय आत्तापर्यंत? आधी बापाच्या जिवावर आणि नंतर नवऱ्याच्या पैशावर जगलीस.’ बाकी सोडून द्या पण दत्तो जे बोलली ते अगदी भीडणारं आहे. सगळ्यात मुक्त तीच असं वाटतं.
पण आजही स्त्रीच्या विचाराकडे न पाहता फक्त बाह्य आचाराकडे पाहिलं जातं. तिच्या कपड्यावरून जोखलं जातं. या चौकटी आपल्या अंगवळणी पडल्यात. आणि पुरुषी वागणं म्हणजे मुक्तपणा हा समजही. म्हणजे हवं ते घालता आलं, हवं तसं वागता आलं की आम्ही मुक्त. पण हे करायला तुम्हाला कोणाची तरी परवानगी लागतेय की नाही? या लोकशाही देशात तुम्ही जन्माला आलात की तुम्हाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळतं. ती कुणाचीही जागीर नाही कुणी कुणाला द्यायला. पण हा विचार आपल्याला स्पर्शूनच जात नाही. कारण, अशी सांगड घालणं फार सोपं असतं. मी अमूक एक विचार, अमूक निर्णय घेतला आहे आणि तो मी अमलात आणणार आणि त्याच्या बऱ्या-वाईट परिणामांची जबाबदारी मीच पूर्ण विचारांती घेणार, हे आपण करतो का? कुठलाही निर्णय असो.
साधं घरातलं उदाहरण.
आर्थिक नियोजन, गुंतवणूक, मुलांच्या गरजा, शिक्षण, घरातले काम (रोजचे आणि विशेष प्रसंगातले), दुरुस्त्या नूतनीकरण, अंदाजपत्रक, देणे-घेणे यात किती गोष्टी स्त्रीचं मत ग्राह्य धरून केल्या जातात? घराचा रंग अथवा पडद्याच्या कापडाचं सिलेक्शन याबद्दल बोलत नाही, तर आधीच्या प्रक्रियेबद्दल बोलतेय... आजही बहुतांशी घरात हे निर्णय पुरुष घेतो आणि बाईला सूचना दिल्या जातात. अमूक कर तमूक आण किंवा हे कर ते करू नकोस. (नियमांना अपवाद आहेच म्हणा) माझ्या बघण्यात अशाही पॉश बायका आहेत ज्या भन्नाट गाडी चालवणाऱ्या, फर्डे इंग्रजी बोलणाऱ्या, अप टू डेट राहणाऱ्या पण साधा चेकसुद्धा त्यांना देता येत नाही स्वत:च्या मर्जीनं. किंवा त्याहून साधं उदाहरण, सोसायटीच्या गणपतीची वर्गणीसुद्धा त्या नवऱ्याला न विचारता देऊ शकत नाहीत. बाह्य पेहरावावरून वाटतात की एकदम मुक्त; पण अंदरकी बात मात्र वेगळी...
मी काहीकाळ कचरावेचक स्त्रियांसोबत काम केलं. काहीकाळ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बचतगटांमध्ये काम केलं आणि अनेकदा मला जाणवलं की डोक्यावरून पदर घेणाऱ्या, कपाळभर कुंकू लावणाऱ्या, पाठीवर हजार घरातला कचरा वाहून नेणाऱ्या या स्त्रिया अनेक अर्थांनी मुक्त आहेत. कारण त्या आपले निर्णय स्वत: घेतात, आपलं मत ठामपणे सांगतात. नकार देण्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे आणि आपल्या निर्णयाची भलीबुरी जबाबदारी त्या डोळसपणे स्वीकारतात.
मुक्त स्त्रीची संकल्पनाच आपण अगदी दिखाऊपणाणं स्वीकारतोय.प्रसारमाध्यमातून जाहिरातीतून जे बिंबवलं जातंय त्यालाच खरं मानतोय. पुरुषासारखं वागणं म्हणजे स्वातंत्र्य असं ठरवतोय. आणि खेद याचा होतो की हे प्रमाण वाढत चाललंय.
आपलं मत निर्भयपणे स्पष्ट शब्दात मांडण्याचं आणि त्याला अनुसरून निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य ज्या घरात बाईला असतं आणि तो निर्णय मत नाही पटलं तरी ते मान्य करण्याचं औचित्य ज्या घरात दाखवलं जातं त्या घरातली स्त्रीही मुक्त असते. त्याला कुठल्याही आर्थिक, भौगोलिक, सामाजिक चौकटी नाहीत. तिच्या मनात एक आत्मविश्वास असतो आणि एक जिद्द. गंमत म्हणजे अशा ज्या स्त्रिया आपण पाहतो त्या नखशिखांत साध्या असतात. अगदी इंदिरा गांधीपासून पाहा. अशा स्त्रिया कधीही पुरुषी वागताना आढळणार नाहीत. कट्टर स्त्रीवादी कडव्या विचारवंत दुर्गा भागवत धुवट नऊवारी पातळ नेसून रणरागिणीसारख्या कडाडायच्या. आत्ताचे उदाहरण घ्यायचं तर आपले जे उपग्रह अंतराळात झेपावले त्यामागे अथक परिश्रम करणाऱ्या इस्रोच्या वैज्ञानिक बायका. किती तरी उदाहरणं आहेत.
मुद्दा हा की नुसतं बाह्यरंग बदलून आपण मुक्त आहोत हे मानणं म्हणजे मूर्खपणा आहे. मुक्तपणाची भावना ही विचारातून येते. आपल्या विचारांवर आपला प्रगाढ विश्वास असला की प्रत्येक कृती ही आत्मविश्वासानंच होते आणि हा आत्मविश्वास जिच्यात असतो ती खरी मुक्त स्त्री. मग तिच्या डोक्यावर पदर असो वा हॅट. गळ्यात मंगळसूत्र असो वा स्कार्फ. तिच्या स्वच्छ नजरेतली चमक हीच तिची ओळख असते.
शुभा प्रभू-साटम
(लेखिका मुक्त पत्रकार असून, स्त्रीमुक्ती चळवळीत कार्यरत आहेत.)
 ------------------------------------------------------------------------------------------------------------

खुंटी आणि फट 

प्राची पाठक 
(मनस्वी जगण्याचा ध्यास असलेल्या प्राची, मानसशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्रासह पर्यावरणाच्या अभ्यासक आहेत.)

अमुक झालं की मी आनंदी होईन,
तमुक मिळालं की मी मनासारखं जगेन,
ढमुक पार पडलं की मोकळा श्वास घेईन..
अशा अमुक-तमुक-ढमुकच्या खुंटीला आपला आनंद लटकवून ठेवणं, हे अनेक स्त्रियांच्या बाबत अगदी सहज घडतं. ‘स्त्री जन्माला येत नाही तर ती घडवली जाते’ इथपासून याची अगदी मूलभूत मनोसामाजिक-आर्थिक कारणं काढत बसता येतील. स्त्री- पुरुष समतेवर एक खापर फोडता येईल. घरातल्या परिस्थितीच्या नावानं एक बाण मारता येईल. अमकीला कसं सगळं आयतं, सहजच मिळालं, मला ना असं काही मिळालंच नाही असा नशिबालादेखील दोष देऊन टाकता येईल. तुलना, मत्सर, असूया, हेवा, कीव, सहानुभूती, राग, भीती, असहायता वगैरे अशा सगळ्या मनाच्या ट्रिप्स करता येतील. ‘काय ही स्त्री जन्माची कहाणी’ म्हणत रडत बसता येईल. स्त्रीचं शरीरच कमकुवत असा तथ्यहीन वाद घालता येईल. निसर्गच जिथे अन्याय करतो, तिथे बाकीच्यांचं काय, इथवर तो वाद ताणता येईल!
गेला ना आनंद कोणकोणत्या खुंट्यांवर?
स्वत: स्वत:ला आनंदी करायची जबाबदारी संपली. ‘यानं माझ्याशी असं केलं, म्हणून माझं तसं झालं’ या पटरीवर रेल्वे मग पॅसेंजरच्या वेगानं हळूहळू चालू लागते. तिची सुपरफास्ट एक्स्प्रेस कधीच होत नाही. विमान तर दूरच राहिलं. ‘तू माझं भलं कर’, ‘तू माझ्या आयुष्यात आलास की मी आनंदी’, ‘आजूबाजूचे माझ्या मनासारखे वागले की मी आनंदी’ म्हणजे आपला आनंद कायम दुसऱ्याच कुणाच्या पार्किंग लॉटमध्ये.
पण आपलं आनंदाचं झाड आपणंच कधी होणार? आपल्यातच तो आनंद कधी शोधणार?
अमुक झालं की मी आनंदी होईन या प्रकारात तुम्ही वरच्या पायरीवर चढलात तर वेगळं जग दिसतं. तिथे पुन्हा वेगळं अमुक-तमुक गणित सुरू होतं. ती साखळी कधी संपतच नाही. म्हणूनच प्रत्येक पायरीवर रडत बसायचं की एकेक पायरीवरून मस्त नजारा अनुभवायचा हे आपल्याच हातात असतं. आपल्याला आनंद मिळण्यात मुख्य अडसर आपणच तर असतो ! सगळे अमुक, तमुक ढमुक केवळ निमित्तमात्र असतात.
कोणी आनंदी दिसलं की, ‘कसं जमतं हिला’, असं कुतूहल जणू घायाळ करतं आपल्याला. इकडे तिकडे डोकावणं सुरू होतं मग. कोणाच्या आयुष्याच्या पॅकेजमध्ये बरं काय आहे, वाईट काय आहे यावर आपलं भिंग. त्यात बराच टाइमपासदेखील होऊन जातो. तात्पुरतं आपल्या विषयांपासून, प्रश्नांपासून मन वेगळीकडे जातं. पण कोणाच्या कोणत्याही गोष्टीवर भिंग रोखून आपले प्रश्न कधीच सुटणार नसतात. जास्त वेळ ते भिंग दुसऱ्याकडे रोखून ठेवल्यानं त्याचं बरेवाईट आपल्या अंगावर आहे त्यापेक्षा मोठ्ठं होऊन आदळतंच. सोबत आपले प्रश्नही मोठे होतात. त्यांना सोडवायला आपण काहीच केलेलं नसतं. इतरांकडे डोळे लावून बसल्यानं स्वत:चं विश्व किती संकुचित होऊन जातं. त्या संकुचित विश्वात मग परत ‘मला नं बाई हे मिळालंच नाही’, ‘मला हे जमतच नाही’ असं पालुपद सुरू होतं. प्रश्नांवर उपाय म्हणून उपवास तापास, स्वत:ला अधिकाधिक त्रास देणं सुरू होतं. नाहीतर मग त्याग वगैरे करणं. म्हणजे परत मन मारणं आलंच. त्याचंच गोंडस नाव ‘त्याग करणं !’ प्रश्नांच्या गाभ्याशी जातच नाही आपण. वरचेवर मलमपट्टी करत राहतो किंवा पळवाट शोधतो. अनेकदा त्रास वेगळाच असतो आणि उपाय भलताच सुरू असतो.
जगातले सगळे रडके, निगेटिव्ह मुद्दे कुणाच्या बाबत कितीही खरे असले तरी त्यातल्या त्यात एखादी बारीकशी फट शोधून आनंद मिळवणं, हसरे-प्रसन्न राहणं इतकं काही अवघड नसतं. जगात कुणीच सदोदित सुखी नसतं. काळोखात उजेडाची एखादी तिरीपसुद्धा प्रकाशाकडे न्यायला पुरेशी असते. तुकड्या तुकड्यातला आनंद जोडून मनमुराद जगायचा कॅनव्हास घडू शकतो. त्यासाठी स्वत:ची जबाबदारी स्वत: घ्यायला शिकलं पाहिजे. छोटे- मोठे निर्णय स्वत: घ्यायची सवय लावली पाहिजे. आरोग्यभान जपलं पाहिजे. केवळ वरचेवर नटून शरीर साथ देणार नाही. आतूनच सर्व्हिसिंग छान असेल तर नट्टापट्टा जास्त खुलून दिसेल. ‘मला हे जमणारच नाही’ आणि ‘ही काय बायांची कामं आहेत?’ यातून बाहेर आलं पाहिजे.
जेव्हा आपण ‘स्त्री ही जन्माला येत नाही तर घडवली जाते’ असा डायलॉग ऐटीत मारत असतो तेव्हा पुरुषदेखील जन्माला येत नाही तर घडवलाच जातो हे विसरूनच जातो. थोडे जास्त ऐसपैस असेलदेखील पुरुष म्हणून जगणं. पण त्यालाही अमुकच असावं ही चौकट असतेच. त्याचीही विविध मनोसामाजिक-आर्थिक कारणं असतात.
स्त्री जन्म हा काही कुठे अर्ज करून मिळालेला नसल्यानं त्याबद्दल निराशा बाळगणं किंवा टोकाचा अभिमान बाळगणं हे तसं व्यर्थच आहे. मिळालेल्या साच्यात राहून किंवा त्याला थोडे फार तडाखे देऊन आपल्यापुरते काही ठाम निर्णय अनेक स्त्रियांना घेता येतात. निर्णय घेण्याची, निवड करायची वेळ येते तेव्हा ‘तुम्ही म्हणाल ते’ आणि त्यातून काही वाईट घडलं तर ‘हे असंच होणार होतं, मला वाटलंच होतं’, असं बोलून काहीच उपयोग नसतो. ही मनातली धुसफूस नंतर बराच काळ तेवत ठेवण्यापेक्षा सुरुवातीपासून सक्रिय सहभाग घेता आला पाहिजे. त्यासाठी थोडं चौकस व्हावं लागतं. जेंडर रोल्सपलीकडे जाऊन आजूबाजूचं भान कमवावं लागतं.
सुंदर मी होणार’चा जसा ध्यास लागतो, तसा ‘निर्णय मी घेणार’चा ध्यास लागला पाहिजे. तुमचा आत्मविश्वास आणि तुम्ही मांडलेले रास्त मुद्दे पाहून तुम्हाला ऐकून घेणारे हळूहळू वाढू लागतील. स्वत:ची स्पेस तयार होईल. आपण काय आहोत ते नेमकं कळू लागेल. नवनवीन गोष्टी शिकणं, एकटीनं छोटे-मोठे प्रवास करणं, लहानसहान आव्हानांना धीरानं तोंड देणं, संवाद कौशल्य वाढवणं, मुद्देसूद बोलता येणं हे जमेल की हळूहळू. घट्ट पाय रोवून उभं राहायचं आणि भिडायचं आपल्या प्रश्नांना. निर्णय चुकले तर ते आपल्या स्वत:च्या विचारानं, समजुतीनं चुकले आणि त्या विचारांना ट्रॅकवर ठेवायची जबाबदारीदेखील आपलीच आहे हे समजणं हीच तर खरी कला आहे. ‘पडो झडो, आत्मविश्वास वाढो’ अशीच ही गंमत आहे. ती प्रक्रियादेखील मस्त एन्जॉय करता येते.
करून तर बघा.

https://goo.gl/lWWc3U

1 comment:

  1. मुक्त स्त्रीची माझी कल्पना नक्कीच वरवरची होती पण नेहमी वाटायचे काहीतरी सुटलाय ,आता कळले आणि लोकांना हीच पूर्ण कल्पना पोहोचवायची आहे• खरच धन्यवाद।
    खुंटी आणि फट। मला हे आजपर्यंत का जाणवले नाही ,मलाच कळत नाही। नेहमी लोकांपासून दूर पाळणारी मी,त्यांच्या लुचेलबाडु स्वभावामुळे कधी इंटरेस्टच नाही आला मिसळण्यात। पण मी प्रयत्न करणार आता 'माझ्यासाठी'.thank you so much to let me realise this.

    ReplyDelete

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता