Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Thursday 7 January 2016

शिक्षक समृद्धीची पायवाट...




नावीन्यूपर्ण रीतीनं शिकवणं ही प्रथम शिक्षकाची गरज बनायला हवी. मुलांची गरज ती नंतर बनेल... ‘मी राष्ट्राच्या उद्धारासाठी, शिक्षणक्षेत्रावर उपकार करण्यासाठी काम करणार नाही, तर मी माझ्या आनंदी स्वार्थासाठी काम करीन,’ इतकी स्पष्टता शिक्षकांच्या विचारांत असली पाहिजे... शिक्षकांनी स्वतःला कसं समृद्ध करत न्यावं, स्वतःला कसं नित्यनूतन ठेवावं, त्याविषयी काही सांगतील प्रयोगशील शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी या मासिक सदरातून...

प्रिय शिक्षक बंधू-भगिनींनो...!
शिक्षकांना उपदेश करण्याची लाट आलेली असताना ‘आता हे आम्हाला काय उपदेश करणार?’ असं वाटू शकेल. मात्र, मी उपदेश तर अजिबात करणार नाही; उलट शिक्षक म्हणून अधिक समृद्ध कसं होता येईल, याविषयी मदतच करणार आहे. उपदेशापेक्षा, दुर्बोध चर्चेपेक्षा, शिक्षणव्यवस्था बदलण्यापेक्षा शिक्षकांना रुची आहे ती स्वतःला आणि स्वतःची शाळा बदलण्यात, हे मला हजारो शिक्षकांना भेटल्यावर समजून आलं. शिक्षकाचं मन हे एखाद्या गृहिणीसारखं असतं. एक गृहिणी दुसऱ्या गृहिणीला ज्या उत्सुकतेनं एखादी पाककृती विचारते, त्या उत्सुकतेनं एक शिक्षक दुसऱ्या शिक्षकाच्या उपक्रमाकडं बघत असतो. त्याविषयी विचारत असतो. त्याच सहजतेनं शिक्षकसमृद्धीची चर्चा मी करणार आहे.

शिक्षकसमृद्धी मला महत्त्वाची का वाटते? ३० वर्षांच्या नोकरीच्या मांडवाखालून गेल्यावर खूप कमी जणांच्या व्यक्तिमत्त्वात समृद्धी जाणवते. नोकरीच्या सुरवातीचा उत्साह नोकरीच्या कालखंडात एकसलग असा टिकून राहत नाही. उलट व्यवस्थेविषयी एक तिरस्कार, नकारात्मकता निर्माण होते. प्रतिभाशाली व्यक्ती हळूहळू इतरांसारखी का बनून जाते, ही माझी चिंता आहे. विद्यार्थी हा विद्यार्थी म्हणून विकसित होताना शिक्षक हा शिक्षक म्हणून विकसित झाला पाहिजे आणि हेच वाक्‍य केंद्रवर्ती ठेवून शिक्षकसमृद्धीकडं बघायला हवं. या व्यवस्थेत शिक्षकाच्या क्षमता मारल्या न जाता उन्नत व्हायला हव्यात. रवींद्रनाथ टागोर हे वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा शाळेत नाटक बसवायचे आणि त्यात ते भूमिकाही करायचे. लीलाताई पाटील ८० व्या वर्षीही वर्गात शिकवतात; याचं कारण या समृद्धीत मिळणाऱ्या आनंदात त्या आहेत.

वाडी-वस्तीवर काम करणारा शिक्षक कधी कधी न्यूनगंडानं खचून जातो. त्याला वाटतं की इतक्‍या मोठ्या देशात एका छोट्या शाळेत २०-२५ पोरांना मी शिकवून इथल्या व्यवस्थेत काय फरक पडणार आहे...? पण जगात सर्व शोधांची सुरवात एका छोट्या प्रयोगशाळेतूनच झालेली असते. सामाजिक बदल एखाद्या लहान खेड्यातूनच सुरू झालेले असतात.  ...कोठारी आयोग म्हणतो त्याप्रमाणे आपल्या उपक्रमशील शाळा या शिक्षणाच्या प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमध्ये होणारे बदल हेच उद्या व्यवस्थेत होणारे बदल असणार आहेत...आमच्यासारखी गावोगाव हवाईफवारणी करणारी माणसं फार काही बदल करू शकत नाहीत, तर शेवटी एकेका शाळेत ठिबक सिंचन करणारा शिक्षकच बदल करू शकणार आहे.

शिक्षकी पेशात इतर कोणत्याही पेशापेक्षा लवकर कंटाळा येण्याची जास्त शक्‍यता असते. इतर व्यवसायांत ग्राहक हा साधारणतः व्यावसायिकाच्या वयाचा असतो. वकिलाकडं किंवा उद्योजकाकडं येणारा ग्राहक हा त्याच वयाचा असतो. समवयस्क असल्यानं संवाद तरी होऊ शकतो; परंतु शिक्षक आणि त्याचे विद्यार्थी यांच्या वयातच इतकं अंतर असतं, की सहजसुलभ विषयावर बोलता येत नाही. प्राथमिक शिक्षक जेव्हा नोकरीला लागतो, तेव्हा त्याचं वय २० वर्षं आणि चौथीच्या विद्यार्थ्याचं वय १० वर्षं असतं. नंतर शिक्षकाचं वय वाढतच राहतं आणि त्या वर्गातल्या विद्यार्थ्याचं वय मात्र १० वर्षांचंच राहतं. शिक्षक ५८ वर्षांचा झाला तरी विद्यार्थ्याचं वय मात्र १० वर्षांचंच राहतं. शिक्षक नोकरीत कंटाळण्याची जी कारणं आहेत, त्यातलं एक कारण हे आहे. पुन्हा जर शिकवण्याच्या पद्धतीत नावीन्य आणलं नाही, तर कंटाळा वाढण्याची शक्‍यता जास्त आहे. शिक्षकी पेशाची तुलना पत्रकारितेशी किंवा गायक-अभिनेत्याच्या व्यवसायाशी करायची तर त्या क्षेत्रात रोज नावीन्य आहे...विषय रोज बदलत असतात आणि त्यामुळं त्यात कंटाळा येण्याची शक्‍यता खूपच कमी असते... पण इथं शिकवायचे घटक खूप कमी असल्यानं त्यात यांत्रिकता येण्याची जास्त शक्‍यता असते. पाण्यावर तेलाचा तवंग पसरावा तसा कंटाळा सर्वत्र पसरत जातो!

ही आनंद निर्माण करणारी स्वयंप्रेरणा कशी जागवता येईल? आज खरंतर शिक्षणक्षेत्रात जे तरुण-तरुणी येत आहेत, ते अत्यंत बुद्धिमान आहेत. ज्यांना ‘मेडिकल’ला प्रवेश मिळू शकला असता, अशी ही मुलं-मुली आहेत आणि जे जिल्हा परिषदांच्या शिक्षक निवड परीक्षेत निवडले जात नाहीत, ते नापास नाइलाजानं खासगी शाळेत जातात आणि तरीही या हुशार विद्यार्थ्यांमधली प्रतिभा टिकवून ठेवण्यात यंत्रणेला अपयश आलेलं आहे. त्यांच्या स्वयंप्रेरणेला आपण जागवू शकलो नाही, कागदात बुडालेल्या प्रशासनाच्या अनागोंदीत या तरुण मुलांना आपण स्वप्नाळू ठेवू शकलो नाही. ...नोकरीत सुरवातीच्या काळात असलेला उत्साह नंतर टिकत नाही, याचं कारण काय असावं? याचं एक कारण म्हणजे आजच्या प्रशासन व्यवस्थेला ‘चांगल्याचं कौतुक नाही आणि वाइटाला शिक्षा नाही.’ प्रशासनाचा स्वभाव हा असा बनला आहे. मला एक शिक्षक म्हणाला होता ः ‘आम्ही शिक्षक म्हणजे एक यंत्र आहोत... पैसे मागा, पैसे देऊ, काम मागा, काम देऊ.’ यामुळं वाडी-वस्तीवर काम करणारे शिक्षक निराश होतात. विदर्भाच्या एका छोट्या गावातून एकदा जाताना एका शाळेनं प्रभातफेरी काढली होती. कुणी गावकरीही फारसे बघायला नव्हते. आम्ही गाडीतून उतरलो आणि त्यांचं कौतुक केलं. ते शिक्षक भरून पावले....पण नंतर बारीक चेहरा करून म्हणाले ः ‘‘तुम्ही आलात म्हणून खूप बरं वाटलं; पण आम्ही खूप वेगवेगळे उपक्रम करतो. मात्र, त्यांची दखल कुणीच घेत नाही हो...’’
काम करणाऱ्या माणसांचं दुःख मला कळलं. मी एका दुर्गम शाळेत गेलो होतो. तिथल्या शिक्षकाचा वर्ग तपासला. दर्जा फार चांगला नव्हता. मी नाराजी व्यक्त केली. त्या वेळी त्या शिक्षकानं व्यक्त केलेल्या भावना अजून आठवत आहेत. तो म्हणाला होता ः ‘‘आम्हाला रागावलं तरी चालेल; पण रागवायलासुद्धा आमच्या शाळेत कुणी येत नाही! तेव्हा कौतुकाला कुणी येणं तर दूरच राहिलं.’’

हे काहीसं नकारात्मक वाटेल; पण अशा स्थितीत निराशा न होता काम करत राहण्याचा मुद्दा आहे. अशा दुर्गम भागातल्या शिक्षकांसाठी मला ‘टीचर’ पुस्तकातली सिल्व्हिया ही शिक्षिका महत्त्वाची वाटते. तिची बदली न्यूझीलंडच्या मावरी बेटावर झाली होती. ती निराश झाली; पण तिनं प्रयोग करताना हळूहळू आदिवासींच्या शिक्षणाला दिशा दिली. तिच्या अधिकाऱ्यांनी तिला प्रोत्साहन दिलं नाही; पण ती निराश झाली नाही. तिनं जे अनुभव लिहून काढले, ते अनुभव प्रसिद्ध करायलाही तिथल्या प्रकाशकांनी नकार दिला. शेवटी तिच्या मृत्यूनंतर ते पुस्तक अमेरिकेतून प्रसिद्ध झालं.

दुसरं उदाहरण ‘तोत्तोचान’ या पुस्तकातल्या शिक्षकाचं आठवतं. निवृत्त झाल्यावर त्याला मुलांशिवाय करमत नाही. तो रेल्वेच्या डब्यात शाळा सुरू करतो. त्या शाळेत सात वर्षांत तो खूप प्रयोग करतो आणि युद्धात त्या शाळेवर बाँब पडतो. डबा जळून जातो. नंतर शिक्षकही काही दिवसांनी मरून जातो; पण काही वर्षांनी जपानमधले सर्व सर्जनशील लोक एकमेकांचे मित्र झालेले असतात... याचं कारण म्हणजे, ते सारे त्या रेल्वेतल्या डब्यातले शाळेतले मित्र असतात...! हे विद्यार्थी आपल्या त्या शिक्षकाच्या आठवणी लिहून काढतात आणि त्याचं पुस्तक प्रसिद्ध करतात. ते पुस्तक जगातलं ‘बेस्ट सेलर’ ठरलं. ‘टीचर’ , ‘तोत्तोचान’ या पुस्तकातले शिक्षक भले त्या काळात दुर्लक्षित राहिले असतील; पण त्यांची आठवण आज आपण इथं, या ठिकाणी इतक्‍या दूरदेशी काढतो आहोत, हे समर्पित शिक्षकाचं सामर्थ्य आहे. तेव्हा चांगल्या शिक्षकांनी निराश होऊ नये. भले आज आपली दखल घेतली जाणार नाही; पण समोर बसलेले विद्यार्थी जेव्हा मोठे होतील, तेव्हा आपली दखल घेतील आणि आपलं योगदान नक्कीच समाजासमोर येईल. जगातल्या शिक्षणाचा प्रवास हा अशा लाखो शिक्षकांच्या समर्पणातून घडलेला आहे. संस्कृतमधला महाकवी भास आपली दखल न घेणाऱ्या राजाला म्हणाला होता ः ही पृथ्वी विशाल आहे आणि काळ अनंत आहे (...माझी पारख करणारा कुणीतरी, कधीतरी पुढच्या काळात नक्कीच असेल). हे सत्य लक्षात घेतलं की कुणी कितीही उपेक्षा केली, तरी कधीच निराशा येणार नाही.

कौतुक केलं नाही तर निराश होण्याची मानसिकताच बदलण्याची गरज आहे. काम करताना मला आनंद मिळाला पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचे आहे. ज्या ठिकाणी मला ३५ वर्षं नोकरी करायची आहे, त्या ठिकाणी मला आनंद मिळाला पाहिजे. त्या ठिकाणी जाताना मला मजा वाटली पाहिजे; पण मी कबूल करतो की... सुटीची नोटीस आल्यावर मलाही मुलांसारखाच आनंद होतो. हा काय प्रकार आहे...? ज्या गोष्टीत आनंद मिळतो, ती गोष्ट माणूस कितीही विरोध झाला तरी करतोच आणि ज्यात त्याचं मन रमत नाही, ती गोष्ट कितीही सक्तीची केली, तरी त्यातून तो सुटका करून घेऊ इच्छितो...
कामात तोचतोचपणा आल्यामुळं मला त्यात आनंद मिळत नाही. मेडिकल दुकान चालवणारा जसा सकाळ-दुपार-संध्याकाळ ‘हे औषध घ्यायचं,’ हे वाक्‍य सतत उच्चारून कंटाळून गेलेला असतो किंवा एसटी बस स्टॅंडवरचा कंट्रोलर सारखं सारखं तेच बोलून लोकांवर चिडत असतो, तसंच आपलं आपल्या कामाबाबत होत आहे का....? याचा ज्यानं त्यानं मनाशी विचार करून बघावा... आपल्या शिकवण्यातली उदाहरणंसुद्धा बदलत नाहीत, हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा तुम्हालाच हसू येईल... मराठी किंवा इंग्लिश व्याकरणात प्रयोग शिकवताना तीच तीच उदाहरणं दिली जातात... ‘रामने आंबा खाल्ला’ ‘रामाने रावणाला मारले’ ‘तो पत्र लिहितो...’ मुलांना चित्र काढून देताना तीन त्रिकोण काढून डोंगर काढला जातो. त्यामागं सूर्य उगवतो आणि खाली नदी वाहत आहे, हेच चित्र आम्ही पिढ्यान्‌पिढ्या काढत आलो आहोत. तेव्हा नावीन्यूपर्णरीतीने शिकवणं ही प्रथम शिक्षकाची गरज बनायला हवी. मुलांची गरज ती नंतर असेल... तेव्हा ‘मी राष्ट्राच्या उद्धारासाठी, शिक्षणक्षेत्रावर उपकार करण्यासाठी काम करणार नाही, तर मी माझ्या आनंदी स्वार्थासाठी काम करीन,’ इतकी स्पष्टता असली पाहिजे.

मराठीसारखा कविता, गोष्टींचा विषय आनंददायी करणं सहज शक्‍य आहे; पण मी विज्ञान, भूगोल, गणितसुद्धा तितकाच आनंदी करू शकेन का...? आज शिक्षकांची अशैक्षणिक कामं खूप वाढली आहेत. शिक्षकांना शिकवायला खूप कमी वेळ मिळत आहे, हे कुणीच नाकारणार नाही. २० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वेळ आज या कामात जातो; पण तरीही महाराष्ट्रातल्या काही शाळा अत्यंत दर्जेदार कशा आहेत? याचं कारण त्या शाळांना वेळ कमीच मिळतो; पण त्या शाळांनी मिळणारा वेळ हा कौशल्यानं वापरलेला आहे, हे त्यांचं वेगळेपण आहे. मी अशा शिक्षकांची तुलना नेहमी कुशल गृहिणीशी करतो. एखादी गृहिणी पुरणपोळीचा स्वयंपाक दोन तासांत करते, तर दुसरीला चार तास लागतात. एकाच कृतीला लागणारा हा वेगवेगळा वेळ कौशल्यामुळं कमी होत असतो. सुदैवानं ज्ञानरचनावादात अशा प्रकारे शिक्षणाची रचना व्हावी, असं अपेक्षित असल्यानं या आनंदनिर्मितीची प्रक्रिया विकसित व्हायला अनेक ठिकाणी सुरवात झालेली आहे. शिक्षक हा केवळ मदतनीसाच्या भूमिकेत अपेक्षित असल्यानं मुलांच्या आणि शिक्षकांच्या आनंदी वृत्तीत वाढ होत आहे.

ऐकलेली कथा आठवली ः एक आई बाळाला नदीत आंघोळ घालत असते. त्या वेळी ते तिच्या हातातून निसटतं व पाण्याच्या तळाशी जातं आणि पुन्हा वर येतं. तळाशी गेल्यावर त्याला एक रत्न दिसतं. त्या रत्नानं त्याचे डोळे लकाकतात आणि त्यानंतर जेव्हा केव्हा ते मूल एकटं असायचं, तेव्हा तेव्हा ते रत्न त्याच्या नजरेपुढं तरळायचं आणि ते अस्वस्थ व्हायचं. मूल मोठं होतं; पण ते रत्न काही त्याला गप्प बसू देत नाही. शेवटी एक दिवस मोठा झालेला तो मुलगा रात्री घर सोडून निघतो... रात्री अंधारात जाताना एका कोरड्या विहिरीत पडतो. त्या विहिरीत एक गुहा असते. तो मुलगा त्या गुहेत जातो, तर तिथं एक साधू बसलेला. या मुलाला ज्या रत्नानं जन्मभर अस्वस्थ केलेलं असतं, तेच रत्न त्या साधूच्या हातात असतं ! साधू त्या मुलाला म्हणतो ः ‘‘ये बाळ, ये. मी तुझीच वाट बघत होतो. ज्या क्षणी लहानपणी तुझे डोळे या रत्नानं लकाकले, त्याक्षणी तुझा माझ्याकडं येण्याचा प्रवास सुरू झाला होता...’’
हे जे डोळे लकाकण्याचं ‘रत्न’ असतं, ते म्हणजे शिक्षकाच्या बाबतीत ‘एखादं पुस्तक’, ‘एखादा उपक्रम’, ‘एखादं भाषण,’ ‘उपक्रमशील शिक्षकाची भेट’ असं काहीही असू शकतं. त्यातूनच सर्जनशीलतेकडं आणि समृद्धीकडं नेणाऱ्या प्रवासाची सुरवात होऊ शकते... शिक्षक म्हणून जन्म होण्याचा एक क्षण असतो, तो अशा डोळे लकाकण्यातूनच होत असतो. नोकरीच्या रुक्ष चौकटीत स्वप्नाळूपणा टिकणं, हे सर्वात महत्त्वाचं आहे... कवी पाश म्हणतो त्याप्रमाणे ‘सपनों का मर जाना सब से खतरनाक है।’ ही ‘वेडे’पणाची आणि जगातल्या सर्वच समर्पित शिक्षकांमधली स्वप्नाळू वृत्ती शिक्षकांमध्ये संक्रमित होवो, हीच नव्या वर्षाची शुभकामना...!

--------------------------------------------------------
शिक्षकी पेक्षात लवकर कंटाळा का येतो?
 कारणं तशी बरीच आहेत...त्यातली ही काही ः
* शिक्षक-विद्यार्थी यांच्या वयात मोठी तफावत; त्यामुळं तादात्म्य साधता येत नाही.
* कामात नावीन्य अजिबात नसतं. रोज तेच अन्‌ तेच काम!
* प्रशासनाला चांगल्याचं कौतुक नाही अन्‌ वाइटला शिक्षा नाही!
* वेगळं काम केलं तर त्याची दखल घेतली जातेच असं नाही .

हेरंब कुलकर्णी(सप्तरंग)

4 comments:

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता