Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Tuesday 25 October 2016

क्यू आर कोड म्हणजे काय

क्यू आर कोड

अनेक वेळा वर्तमानपत्रात जाहिरातीत आपण चौरस आकाराचा एक बारकोड पाहिला असेल. अलिकडे हे कोड जिकडे तिकडे अधिकाधिक दिसू लागले आहेत. विशेषत: अमेरिकेत त्याचा चांगलाच प्रसार झाला आहे. या क्विक रिस्पॉन्स कोड ने एखाद्या उत्पादनाविषयी अथवा व्यक्तिविषयी माहिती मिळवणे अधिक सुलभ झाले आहे.

क्यू आर कोड हा एक प्रकारचा बारकोड आहे. आपल्या नेहमीच्या, पुस्तकाच्या मागे आय एस बी एन नंबरसाठी छापलेल्या, बारकोडमध्ये उभ्या, वेगवेगळ्या जाडीच्या रेघा असतात. आणि त्यामुळेच ह्या बारकोडमध्ये माहिती फक्त आडव्याच दिशेत (१डी किंवा एक मिती) साठवता येते. परंतु क्यू आर कोडमध्ये रेघांच्या ऐवजी मेट्रिक्स – किंवा उभ्या आडव्या रेघांचे जाळे असते. त्यामुळे माहिती उभी आणि आडवी अशा दोन्ही दिशेत साठवता येते. ह्या जाळ्यातील चौरस काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे असतात. क्यू आर कोडमध्ये जी माहिती साठवायची असेल त्याप्रमाणे प्रत्येक माहितीसाठी एक वेगळी काळ्या पांढऱ्या चौरसांची संरचना तयार होते. हि संरचना वाचून ती माहिती स्कॅनरला कळू शकते. या संरचनेमुळेच क्यू आर कोडला द्वीमीत (2D) बारकोड असेही म्हटले जाते. जुन्या उभ्या रेघांच्या बारकोडमध्ये फक्त इंग्रजी नंबरच साठवता येतात. परंतु क्यू आर कोडमध्ये अक्षरे, अंक आणि तेही साध्या बारकोडपेक्षा बऱ्याच जास्त प्रमाणात साठवता येतात. क्यू आर कोडचा निर्मीती जपानमध्ये झाली असल्याने त्यात इंग्रजी बरोबर जपानी अक्षरेही साठवता येतात. क्यू आर कोडच्या ४०व्या आवृत्ती (व्हर्जन) ४० मध्ये ४२९६ इंग्रजी अक्षरे साठवता येतात!

क्यू आर कोडचा शोध जपानमध्ये टोयोटाच्या डेन्सो वेव्ह नावाच्या उपकंपनीत १९९४ मध्ये लावला गेला. गाड्यांचे उत्पादन करत असताना गाड्यांना ट्रॅक करता यावे म्हणून क्यू आर कोडची निर्मिती केली गेली. वेगाने स्कॅन करता येणारा आणि जास्त माहिती साठवता येणाऱ्या बारकोडची निर्मिती हा त्यामागचा उद्देश होता. क्यू आर कोड व्यतिरीक्त इतरही अनेक द्विमीत बारकोड पद्धती बाजारात उपलब्ध आहेत. त्यातील मुख्य पद्धती म्हणजे पीडीएफ ४१७, डेटा मॅट्रिक्स आणि मॅक्सी कोड. इतर तीनही पद्धती अमेरिकेत तयार केल्या गेल्या आहेत. या तीनही पर्यायांपेक्षा अधिक माहिती साठवण्याची क्षमता क्यू आर कोड मध्ये आहे. आज क्यू आर कोड हा द्विमीत बारकोडमधील सर्वात लोकप्रिय बारकोड समजला जातो.

क्यू आर कोड आणि मोबाइल
स्मार्ट फोन बाजारात आल्यापासून क्यू आर कोडचा वापर अधिकच वाढला आहे. आता स्मार्ट फोन असलेल्या कोणालाही क्यू आर कोड स्कॅन करणं सहज शक्य आहे. काही स्मार्ट फोनमध्ये क्यू आर कोड स्कॅन करणारे एप फॅक्टरीमध्येच घातलेले असते. पण जर तुमच्या स्मार्टफोन मध्ये असे एप नसेल तर ते तुम्हाला विनाशुल्क डाउनलोड करता येते. रेड लेझर, स्कॅन लाईफ, बारकोड स्कॅनर, शॉप सॅव्ही, आय-निग्मा अशा अनेक कंपन्यांची क्यू आर कोड स्कॅन करणारी एप विनाशुल्क उपलब्ध आहे. आयफोन, अँड्रॉइड आणि विंडोज फोन या तीनही मुख्य प्रकारच्या मोबाइल फोनवर ही एप उपलब्ध आहेत. मी अँड्रॉइडवरील क्यू आर ड्रॉइड नावाचे एप वापरतो. क्यू आर कोड मोबाईलने स्कॅन करुन त्यात साठवलेल्या माहिती आधारे वेबसाईटवर नेणाऱ्या अनेक एपनी मोबाइलर माहिती शोधणे सोपे केले आहे हे. या शिवाय मोबाइल आणि क्यू आर कोडचा अजून एक विशेष उपयोग एअरलाईन्स करुन घेत आहेत. तुम्ही घरुनच इंटरनेटवरुन अथवा तुमच्या मोबाइलवरुन तुमच्या विमानोड्डाणासाठी चेकइन करायचे. चेकइन केल्यानंतर तुम्ही बोर्डींग पास प्रिंट करण्याऐवजी मोबाईलवर तुम्हाला क्यू आर कोड असलेले एक पान एअरलाइन्सच्या एप मध्ये दिसायला लागते. हा कोड विमानतळावर जाऊन स्कॅन केला की तुम्हाला विमानात चढता येते! म्हणजे मग तुमच्याकडे चेकइन करायचे सामान नसेल तर तुम्हाला रांगेत उभी रहायची गरज नाही. तसेच बोर्डींग पास प्रिंट करण्यासाठी घरी प्रिंटर असायचीही गरज नाही. अमेरिकेत अनेक विमान कंपन्या आता याच पद्धतीने क्यू आर कोड असलेले इलेक्ट्रॉनिक बोर्डींग पास द्यायला लागले आहेत. भारतातील जेट एअरवेजने मात्र क्यू आर कोडचा उपयोग फक्त मार्केटींगपुरताच मर्यादित ठेवला आहे. त्यांच्या विविध (पेपरातल्या व ऑनलाईन) जाहिरातीमध्ये ते क्यू आर कोड वापरतात. हे क्यू आर कोड आय निग्मा या मोबाईल स्कॅनिंग एपने स्कॅन केला असता तुमचा फोन तुम्हाला जेट एअरवेजची मोबाईल साईट (किंवा साईटवरील विशिष्ट पान) उघडून देतो.

मोबाइलवरुन क्यू आर कोड स्कॅन करण्यामध्ये अजूनही काही अडथळे आहेत. अजूनही बऱ्याच लोकांना क्यू आर कोड म्हणजे काय हे माहित नसते. ते मोबाइलने स्कॅन करुन अधिक माहिती मिळवता येते ही संकल्पनाच त्यांना माहित नसते. अनेक मोबाइलवर क्यू आर कोड स्कॅन करणारे तिसऱ्याच कुठल्यातरी कंपनीचे एप डाऊनलोड करावे लागते. क्यू आर कोड म्हणजे काय हे माहित नसलेले लोक हे एप नसल्याने क्यू आर कोडच्या संपर्कातच येत नाहीत. तसेच अनेक वेळा मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या असे क्यू आर कोड तयार करतात कि ते फक्त त्यांच्याच एपने स्कॅन करता येतील. २०११ मध्ये आर्करायव्हल कंपनीने केलेल्या चाचणीत असे आढळून आले होते की ८०% कॉलेजच्या विद्यार्थ्यांना क्यू आर कोडची माहिती नाही. अर्थातच आज जरा परिस्थीती सुधारली असली तरीही क्यू आर कोडचा अधिक वेगाने प्रसार होण्यासाठी क्यू आर कोड स्कॅनर मोबाइल फोनच्या कॅमेरा एप मध्येच असणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांना कुठलेही एप डाऊनलोड न करता क्यू आर कोड स्कॅन करता येतील.

ज्या प्रमाणे एप डाऊनलोड केल्यावर क्यू आर कोड स्कॅन करणे सोपे आहे त्याच प्रमाणे क्यू आर कोड तयार करणेही अतिशय सोपे आहे. इंटरनेटवर अनेक वेबसाइट तुम्हाला नि:शुल्क क्यू आर कोड तयार करुन देतात. तुम्हाल जी माहिती क्यू आर कोडमध्ये टाकायची आहे ती तुम्ही टाइप केलीत कि एक बटन दाबल्यावर क्यू आर कोडचे चित्र तयार होते. हे चित्र तुम्ही तुमच्या संगणकावर डाऊनलोड करुन कुठेही वापरु शकता. http://www.the-qrcode-generator.com हि अशीच एक वेबसाईट आहे. तुम्ही आपला फोन नंबर किंवा इतर संपर्क माहिती या वेबसाइटवर टाकून स्वत:चा खाजगी क्यू आर कोड तयार करु शकता.

क्यू आर कोडचे उपयोग
मार्केटींगसाठी क्यू आर कोडचा उपयोग विविध कंपन्यांनी अतिशय नवनवीन युक्त्या वापरुन करायला सुरुवात केला आहे. भारतीय वर्तमानपत्रांमध्येही अनेक वेळा जाहिरातीत तुम्हाला क्यू आर कोड दिसेल. हा क्यू आर कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला त्या उत्पादनाच्या वेबसाइटवर जाता येते किंवा त्या विषयीचा व्हिडीओ मोबाईलमध्ये सुरु होतो. लाबलंचक वेबसाइटचा पत्ता मोबाइलच्या किबोर्डवर टाइप करायचे लोकांचे श्रम वाचतात. पण हा झाला खूपच साधा व प्रचलिच असलेला उपयोग. स्कांझ नावाच्या कंपनीने क्यू आर कोड असलेली ब्रेसलेट बाजारात आणली आहेत. स्कांझच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही तुमच्यासाठी एक पान बनवायचे. या पानावर तुम्ही तुमची नेहमीची माहिती (फोन नंबर, पत्ता, फेसबुक व ट्विटर प्रोफाइल) ठेवू शकता. तुमचे आवडते फोटो व व्हिडीओही ठेवू शकता. या पानाचा पत्ता साठवलेला क्यू आर कोड छापलेले ब्रेसलेट, पिशव्या, टिशर्ट आदी गोष्टी तुम्ही स्कांझच्या वेबसाइटवरुन विकत घेऊ शकता. यामुळे तुम्हाला व्हिजीटींग कार्डाची आवश्यकताच नाही! कुणी कार्ड विचारलं तर क्यू आर कोड असलेले ब्रेसलेट पुढे करायचं. समोरचा माणूस ते आपल्या मोबाइने स्कॅन करेल. क्यू आर कोडवाली व्हीजीटींग कार्डही बाजारात मिळतात हे एव्हाना आपल्या लक्षात आले असेलच! सुप्रसिद्ध अमेरिकन वाहिनी सी एन एन वर एका प्रसिद्ध कार्यक्रमात जॉन किंगने एक क्यू आर कोड दाखवून प्रेक्षकांना तो अधिक माहितीसाठी स्कॅन करण्यासाठी सांगितले होते. अमेरिकेत अनेक वेळा दुकानात अनेक उत्पादनांवरही क्यू आर कोड आढळायला लागले आहेत. एव्हढच नव्हे तर अनेक मोठमोठ्या चौकात नुसते क्यू आर कोड असलेले जाहिरातीचे फलकही दिसतात! लोकांना ते काय असावे याची उत्सुकता वाटून लोक ते स्कॅन करतात!

क्यू आर कोडमुळे माहिती मिळवणे सोपे आहे हे प्रथम मी मानायला तयार नव्हतो. परंतु एक दिवस मी लॉस अँजलिसमधल्या एका मॉल मध्ये फिरत असताना मला एका पोस्टरवर क्यू आर कोड दिसला. तो स्कॅन करण्यासाठी म्हणून एप डाऊनलोड केलं आणि तो स्कॅन केला. तो अतिशय सहजपणे आणि फास्ट स्कॅन झाला. त्यानंतर मी क्यू आर कोडच्या प्रेमातच पडलो. ज्या क्यू आर कोडची आधी मी दखलही घेत नव्हतो, असे अनेक क्यू आर कोड मला सर्वत्र दिसायला लागले. माझ्या या (प्रातिनिधीक) अनुभवामुळेच क्यू आर कोडचं भविष्य उज्ज्वल आहे असं मला वाटतं.
Download app

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता