Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Thursday 19 January 2017

लोकमत ऑक्सिजन चा विशेष अंक - प्रत्येक तरुण तरुणीने वाचावा असा 5 JAN 17

गुदमरलेलं वादळ


·          - डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे
आमच्या हेल्पलाइनला मुलं फोन करतात. किंवा कौन्सिलिंगसाठी अगदी शाळकरी वयातली मुलंही आमच्याकडे येतात.. सांगतात, तसल्या साइट्स पाहतो. नेहमी पाह तो. पाहते. त्यातून वाटलं की, तसं काही करून पाहू.. मग परिचयातल्या, प्रेमातल्या कुणाबरोबर करतात हे मुलंमुली तसलं काही. (अर्थात मुलीही!) खास करून हॉस्टेलला राहणारी, आपापला ग्रुप असलेले मुलंमुली लहान मुलींना तसा सेक्शुअली त्रास देतात. म्हणजे त्यांच्याबरोबर तसलं काही करून पाहण्याचा प्रयत्न करतात. ते शूट करतात. त्यातली गंमत पाहतात. त्यांच्यासाठी हे सारं सेक्स कमी, एक खेळ असतो. मनाचा खेळ, त्यात त्यांना मजा येते. आणि मुख्य म्हणजे हे सारं प्रचंड अ‍ॅडिक्टिव्ह असतं त्यांच्यासाठी. त्यात वयात येतानाचे हार्मोेन्स कामाला लागलेले असतात. ते मागणी वाढवतात, वेड आणि उत्सुकता वाढवतात. लहान मुलांना त्रास देणारे त्यांच्यापेक्षा वयानं अगदी थोडे मोठे- म्हणजे दहा-बारा वर्षांची मुलंमुली पकडली जातात तेव्हा आमच्यासमोर एकच गोष्ट वारंवार येते. एक म्हणजे, त्यांना असा त्रास कुणीतरी दिलेला असतो, किंवा त्यांनी पाहिलेलं असतं ते. अनेकांना हे बॅड टच-गूड टच सुद्धा कळत नाही. कारण सुरुवातीला ते सारं हवंसं, चांगलंही वाटलेलं असतं. अनेक टीनएजर मुलं पोर्न पाहून ते सारं प्रयोग स्वत:वर करू पाहतात किंवा मग आपल्यापेक्षा लहानग्या मुलांवर ते सारं दमदाटी करून करतात. काहीजण स्वेच्छेने, एकमेकांच्या मदतीनं ते करून पाहतात, तसा प्रयत्न करतात. त्यातून नुस्तं व्यसन वाढत नाही. तर अनेकजण मारामारी करतात. अनेकदा मारामाऱ्या, शिवीगाळ केली जाते. दादागिरी करतात. दहशत माजवतात. ते मिळालं नाही पहायला तरी वेडीपिशी होत पुन्हा पुन्हा मिळवून मिळवून पाहतातच. दुसरा एक वर्ग आहे, तो प्रेमात पडणाऱ्यांचा. अगदी टीनएजच्या आधीच्या टप्प्यातसुद्धा प्रेमात पडणारे आज आहेत. प्रेमात पडण्याचा रोमान्स, त्यातली मजा, थ्रिल त्यांनी सिनेमात आणि सीरिअल्समध्ये तर पालकांसोबत बसून पाहिलेलं असतं. शारीरिक लगटही त्यांना फार चुकीची वाटत नाही, कारण ती ते रोज पाहतात. आणि आपण प्रेमात पडलेलो आहोत तर आपल्या प्रत्येक क्षणांचे फोटो काढून ठेवणं, व्हिडीओ करणं हे सारं या मुलांमध्ये आम आहे. ते सर्रास हे सारं करतात. शेअर करतात. ग्रुपवर टाकतात. फेसबुकवर टाकतात. शेअरिंग मोठ्या प्रमाणात असतं. आणि मग आपल्या जवळकीचे, नाजूक वाटलेल्या क्षणांचेही काहीजण फोटो/व्हिडीओ काढतात. आणि मग पुढं भांडण झालं, बिनसलं की मग एकमेकांना ब्लॅकमेलिंग करतात. एमएमएस बनवून पाठवतात. पोस्ट करण्याच्या धमक्या देतात. आणि मग या साऱ्यात अनेकदा मुली फार घाबरून जातात. अनेकदा घरी सांगतात. सांगत नाहीत. किंवा मग एखादी मैत्रीण हिंमत करून चाइल्ड हेल्पलाइनला फोन करते. किंवा मग पालकांनी पोलिसांत तक्रार केलीच तर केसेस आमच्यापर्यंत येतात. अगदी आत्महत्त्येच्या टोकापर्यंत जाऊन येतात मुलंमुली अनेकदा या प्रवासात हे पालकांना माहितीही नसतं. या मुलांच्या जगात अनेक वादळं आहेत. त्यांच्या शरीरात अनेक वादळं निर्माण होत आहेत. त्यांना लैंगिक शिक्षण, त्यातली शास्त्रीय माहिती योग्य वयात कुणी सहज देत नाहीत. त्याविषयी बोलत नाही. आणि दुसरीकडे त्यांची एक्साईटमेण्ट लेव्हल तर इतकी जास्त असते की ते मिळेल ते पाहतात. आपण काय करतो आहोत हे माहिती होण्याच्या आत त्यांचं ते करून झालेलं असतं.. अशा वादळी काळात आपण आहोत.. नुस्तं पोर्न नाही तर लैंगिक विषयाची खुलेआम उपलब्धता एकीकडे आणि त्याविषयीची चिडीचूप गुप्तता, संवादाचा अभाव दुसरीकडे हे असं चित्र आहे. आणि मुलं मात्र त्यांना जमतील तसे मार्ग काढत आहेत.. त्यातले काही अर्थातच चुकीचे आहेत.
(लेखिका पुण्याच्या चाइल्डलाइन हेल्पलाइनच्या संयोजक आहेत.)

एंगेजिंग, इंटरॅक्टिव्ह, एक्सायटिंग


·          - डॉ. दीपक शर्मा
मुलांच्या हाती मोबाइल आहे हा प्रश्न नाहीये.. प्रश्न आहे, त्यांच्या हाती दुसरे पर्याय उपलब्ध नाहीत, हा! इझी अ‍ॅक्सेस कुणाला नको असतो? पण मुलांच्या संदर्भात एंगेजिंगअर्थात गुंतवून ठेवू शकेल अशी एखादी गोष्ट फार महत्त्वाची असते. एंगेजिंग, इंटरॅक्टिव्ह आणि एक्सायटिंग असं काहीतरी आयुष्यात घडावं असं हे वय असतं.त्यात हातात मोबाइल येतो. त्यावर गाणी ऐकता येतात, सिनेमे पाहता येतात, चॅटिंग करता येतं, माहिती वाचता येते, पोर्न पाहता येतात, आपले फोटो टाकून चारचौघात घरबसल्या मिरवता येतं.
हे सारं ज्या एका गोष्टीनं होतं ती मुलं का सोडतील? आणि प्रश्न इथं खरा निर्माण होतो..
मुलांशी आईबाबा बोलतात ते चौकशा आणि सल्ले या दोनच रूपात. पूर्वी मुलांना धाक तरी होता आईबाबांचा. आता त्यांना वाटतं की, आईबाबाच हे सारं करतात तर ते आपल्याला का रोखतील?
जे पालक मुलानं पाठवलेले चावट फॉरवर्डस एन्जॉय करतात ते मुलाला व्हॉट्सअ‍ॅप वापरू नको असं म्हणाले तरी मुलं ते गांभीर्यानं घेतील का?
- असे अनेक प्रश्न आहेत.
प्रश्न साधनांत आणि माध्यमांत नाहीत, तर मनोवृत्तीत आहेत.
सेक्स ही गोष्ट वाईटच आहे असं नव्हे, तर ती योग्य वयात आयुष्यात येणं महत्त्वाचं आहे. त्या आधीच्या टप्प्यात अन्य थरारक, आनंददायक गोष्टी असू शकतात हे मुलांपर्यंत नेण्यात आपण अपयशी ठरलेलो आहोत.
त्यामुळे दोष समाजानं, पालकांनी आणि शाळांनी घेतला पाहिजे स्वत:कडे!
अर्थात तो कुणालाही दिला तरी समस्या तीच आहे.. मुलांच्या एकाग्रतेची. ओव्हर एक्सायटमेण्टची. अकाली मोठे होत सेक्समधलं थ्रिल शोधण्याची. प्रेमात पडणं आणि त्यातल्या थ्रिललाच प्रेम समजण्याची..
याचे वर्तन परिणाम मात्र गंभीर आहेत. सोशल मीडिया, अब्युझिंग, ट्रोलिंग ते प्रत्यक्षातल्या मारामाऱ्या आणि न्यूनगंड इथपर्यंत गोष्टी जात आहेत. त्या नेमक्या कशा जातात याचाच अभ्यास आम्ही करतो आहोत. तो अभ्यास आमच्या संस्थेला करावासा वाटणं हीच समस्या गंभीर असण्याचं लक्षण आहे. वर्तन समस्या आणि मोबाइल यासंदर्भात सध्या आम्ही निम्हान्समध्ये संशोधन करतो आहोत. उत्तरं सापडतीलही, पण प्रश्न आहेत, हे आधी आपण मान्य करायला हवं.
(लेखक नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेण्टल हेल्थ सायन्सशी संलग्न अभ्यासातील संशोधक आहेत.)
पोर्न जबाबदार असतं का?


·          - डॉ. राजन भोसले
मुलांच्या हाती मोबाइल-कम्प्युटर असतात. ते काही माहिती गूगल करत असतात, यूट्यूबवर अभ्यासाचे व्हिडीओ शोधत असतात. आणि त्याच्या खालीच तसल्याकाहीतरी लिंक हलताना दिसतात. उत्सुकता कुणाला वाटत नाही? आणि या मुलांना तर ती स्वाभाविकपणे वाटतेच. मग ती ते क्लिक करतात. पाहतात. हरखून जातात. घाबरून जातात. किळस करतात. एन्जॉय करतात. मग मित्रांना सांगतात. सगळे मिळून पाहतात. चर्चा करतात. पुन्हा पाहतात. चक्र सुरू होतं.. टेक्स्ट दॅट यूआरएल!

पोर्न? म्हणजे त्या तसल्याअश्लील क्लीप्स? आमच्या घरी असं काही नाहीच, शक्यच नाही, त्याला तसलंकाही उपलब्धच होऊ शकत नाही, हिंमत काय त्याची..’ - क्लिनिकमध्ये आलेले आईबाबा हे असं खात्रीने सांगत असतात तेव्हा कळत नाही, त्यांना कसं समजावणार? कारण जे त्यांना माहिती नाही, त्यांच्या कल्पनेतही नाही ते त्यांची मुलं रोज करत असतात, पाहत असतात. एन्जॉय करत असतात.
एक साधा एसएसएस, व्हॉट्सअ‍ॅपवरचा मेसेज, त्यात एखादी लिंक, मुलांच्या शब्दात यूआरएल टेक्स्टकेली जाते. आणि आपल्या मित्रानं जे पाठवलंय ते काही मिण्टात मुलांनी पाहून अनेकदा डिलिट किंवा फॉरवर्डही केलेलं असतं!
हे सारं तपशीलवार सांगत अशी अनंत उदाहरणं मी देऊ शकतो, पण ती मी देत बसत नाही.
एकच सांगतो, प्रचंड प्रमाणात मुलांच्या, अगदी शाळकरी वयातल्या मुलांच्याही अवतीभोवती पोर्न अव्हेलेबल आहे. 
आज तिशीत असलेल्या तरुण पिढीला तरी वयात येताना पिवळी पुस्तकं, चावट मासिकं, सीडी, सिनेमे, ब्लू फिल्म्स हे सारं मिळवावं, चोरून पाहावं लागलेलं आहे.
आज शाळेत जाणाऱ्या मुलांनाही हे सारं चोरूनकरायची गरज उरलेली नाही, ते मिळवावंलागत नाही. ते उघड, उपलब्ध आहे! सहज मिळतं. फुकट मिळतं. फोनवरच मिळतं. त्यामुळे खासगीही असतं.
म्हणून मी एकच गोष्ट ठळकपणे पुन्हा सांगतो, पोर्न प्रचंड उपलब्ध आहे, हे मान्य करा.
आणि दुसरी गोष्ट, जे उपलब्ध आहे, त्याचं आपण काहीच करू शकत नाही; हे मान्य करा!
मुलांवर नियंत्रण, संस्कार, कण्ट्रोल केलेले इंटरनेट अवर्स ही सारी पालकांची समजूत आहे; जे उपलब्ध आहे त्याचं आपण काहीच करू शकत नाही हे पालकांनी, शिक्षकांनी आधी मान्य करायला हवं!
होतं काय, चला पोर्न साइट्स पाहू असं ठरवून काही सारीच मुलं तसल्या साइट्स पाहायला जात नाहीत. सुरुवात कशी होते तर मुलांच्या हाती मोबाइल-कम्प्युटर असतात. ते काही माहिती गूगल करत असतात, यूट्यूबवर अभ्यासाचे व्हिडीओ शोधत असतात. आणि त्याच्या खालीच तसल्याकाहीतरी लिंक हलताना दिसतात. उत्सुकता कुणाला वाटत नाही? आणि या मुलांना तर ती स्वाभाविकपणे वाटतेच. मग ती ते क्लिक करतात. पाहतात. हरखून जातात. घाबरून जातात. किळस करतात. एन्जॉय करतात. मग मित्रांना सांगतात. सगळे मिळून पाहतात. चर्चा करतात. पुन्हा पाहतात. चक्र सुरू होतं..
आणि हे सुरू झालेलं चक्र मग उलटं फिरवणं इतकं सोपं नसतं!
धाक दाखवला, तक्रार केली, फटके दिले म्हणजे पोर्न पाहणं मुलं थांबवतात हा पालकांचा, शिक्षकांचा भ्रम आहे. कारण हे प्रश्न मुळात हाताळतात कसे हेच कुणाला कळलेलं नाही. असं होऊच कसं शकतं, हे चूक आहे, अनैतिक आहे, धक्कादायक आहेया प्रतिक्रियांपलीकडे जाऊन आता हे प्रश्न सोडवायला हवेत, हे अजून आपल्याकडे पालकांना, शिक्षकांनाच काय एमडी झालेल्या अनेक मानसोपचारतज्ज्ञांनाही माहिती नाही.
माझ्याकडे शाळकरी मुलांना घेऊन काही पालक येतात. किंवा शाळा समजद्यायला म्हणून बोलावून पालकांना झापतात आणि आमच्याकडे पाठवतात. तुमचा मुलगा तसलं काही पाहतो आहे, त्याला शाळेतून काढून टाकूअशी धमकी पालकांना देतात आणि म्हणून मग पालक घाबरेघुबरे होत आमच्याकडे येतात. त्यांना मुलगा (किंवा मुलगीही) पोर्न पाहतो या धक्क्यापेक्षाही त्याला शाळेतून काढून टाकतील याची भीती जास्त वाटलेली असते. तिकडे आपल्या शाळेची बदनामी झाली तर त्यापेक्षा हे सगळं पालकांवर ढकललेलं बरं म्हणत शिक्षक-प्रिन्सिपल घाबरलेले असतात. मुलांना रागावण्यापलीकडे ते दुसरं काहीच करत नाहीत.
काही शाळेत कौन्सिलर असतात. पण त्या कौन्सिलरला हेच कळत नाही की, या मुलांचं कौन्सिलिंग कसं करायचं? त्यांना या विषयातल्या कौन्सिलिंगचं काही प्रशिक्षणच नाही. त्यातलं स्किल नाही. साधे डिप्लोमा कौन्सिलर कशाला, अनेक मानसोपचारतज्ज्ञांनासुद्धा या लैंगिक प्रश्नांसंदर्भात एवढं घोर अज्ञान असतं की, तेच अनेक बेसिक शंका विचारतात. त्यांच्याकडे आलेल्या १२-१४ वर्षाच्या पोर्न पाहणाऱ्या मुलांचं ते कसं कौन्सिलिंग करणार?
कौन्सिलिंग तर सोडाच, अतिरेकी पोर्न पाहणारी जी मुलं असतात त्यांना ट्रिटमेण्ट काय द्यायची हेच अजून डॉक्टर्स, मानसोपचारतज्ज्ञ यांना उमगलेलं नाही.
हे वास्तव एकीकडे आणि सेक्स चॅटसह पोर्न पाहायला सरावलेली शाळकरी आणि कॉलेजात जाणारी तरुण मुलं दुसरीकडे. आपण कल्पना करतो किंवा कल्पनेतही नाकारतो त्यापेक्षा या वयात पोर्न पाहण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. इतकं प्रचंड की, ते व्यसन सुटणं हे आव्हान आहे. 
त्यामुळे मुलांना काही समुपदेश करण्याआधी मी पालकांना हेच सांगतो की, तुम्ही मुलांच्या हातात मोबाइल, नेट, कम्प्युटर दिला आहे, तेव्हाच मान्य करा की त्याला तसल्यासाइट्स उपलब्ध आहेत, तो पाहू शकतो. पाहत असणार..प्रश्न मान्य केला, तर आपण उत्तरांच्या दिशेनं पुढं जाऊ शकतो.
आणि आजच्या घडीला प्रश्न अत्यंत गंभीर आहे..
गुड पोर्न, बॅड पोर्न...? हे एक नवीन समीकरण सध्या काही डॉक्टर्स, पालकांच्या डोक्यात आहे. म्हणजे काही संदर्भात मुलामुलींनी अशा पोर्न साइट पाहणं हे हेल्दी आहे, असं ते मानतात. हेच सर्वथा चूक आहे. दहशतवाद चांगला आणि वाईट असा जसा नसतो, तो दहशतवाद असतो तशी पोर्न ही अत्यंत भयाण, वाईटच गोष्ट आहे. त्यात गुड-बॅड असं काही नाही. मुलांना तस्लं काही दाखवणं आणि त्याचं समर्थन करण्यापेक्षा त्यांना शास्त्रीय लैंगिक शिक्षणाची, त्यासंदर्भात मोकळेपणानं बोलण्याची गरज आहे. पोर्नच्या भयाण जगात चांगलं म्हणत मुलांना सोडणं हेसुद्धा भयानक घातक आहे.
पोर्न पाहण्याचे दुष्परिणाम
१) पोर्न पाहण्याचे शारीरिक दुष्परिणाम लगेच असे काही दिसत नाहीत. त्यामुळे कोण पोर्न पाहतंय हे कळायला मार्ग नाही, कारण एरवीचं वर्तन अत्यंत संयत, सभ्यच असू शकतं. मुलांच्या संदर्भातही हेच घडतं.
२) फक्त एकदाच पोर्न पाहिलं असं घडत नाही. ते मादक द्रव्यासारखं आहे. एकदाच दारू प्यालो असं घडत नाही. ती वारंवार प्याली जातेच. तसं एकदा पोर्न पाहिलं की ते वारंवार पाहिलं जातंच. प्रमाणाची चर्चाही चूक. कारण ते व्यसन लागतंच. आणि ते एकदा लागलं की कमी जास्त व्यसन असं काही उरत नाही.
३) मुलं पोर्न पाहून प्रचंड एक्साईट होतात, त्यांची एक्सायटमेण्ट लेव्हल वाढवण्यासाठी ते पुन्हा पुन्हा अधिक पोर्न पाहत राहतात. त्यासाठी जास्तीत जास्त वेळ देतात.
४) काहीजण आपल्या संदर्भात तसंच घडेल अशा अपेक्षा ठेवतात. लहान वयात ते करून पाहण्याची संधी मिळाली तर ती शोधतात. तसं करून पाहतात. कधी स्वेच्छेने, कधी सक्तीने.
५) डोळ्यांना चष्मे लागणे असं सर्रास दिसलं तरी एकदा पोर्न पाहण्याची शंका तपासून पाहावी इतका आपापला स्मार्टफोन जवळ घेऊन मुलं पांघरुणात दडून पोर्न पाहतात. एकेकट्यानं पाहतात.
६) सहसा रात्री पाहतात, त्यामुळे तब्येतीवर, झोपेवर परिणाम होऊन वारंवार तब्येत बिघडलेली दिसते.
७) त्यातच मन गुंतून राहिल्यानं अभ्यास, खेळ यातली प्रगती कमी होऊन एकलकोंडे, घुमे होतात.
८) सगळ्यात महत्त्वाचं हे सारं पालकांना कळतच नाही, आणि कळलं तरी मुलं ते पाहणं सोडत नाहीत.
९) पोर्नपायी दिवसागणिक अनेक शाळकरी, कॉलेजातल्या मुलांचे काही तास खर्ची पडत आहेत.
(लेखक लैंगिक प्रश्नांचे जाणकार आणि प्रख्यात सेक्सॉलॉजिस्ट आहेत.)
मोबाइल व्हिलनआहे का?
·          
·         
·          - बालाजी सुतार
मोबाइलचं झेंगट - ग्रामीण भागातल्या मुलामुलींच्या हातात मोबाइल आलेमोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅप आले,चॅटिंग आलेते बोलत सुटलेजे दिसतंते पाहत सुटले. लोक म्हणतात, पोरंपोरी बिघडले. पण बिघडले, ते नेमके कुणामुळे? कशामुळे?
वर्षभरापूर्वी फक्त मुलींच्या शाळेत एका कार्यक्रमाचा पाहुणा म्हणून गेलो होतो. कार्यक्र मात पालकांचाही सहभाग असणार होता. तिथे कार्यक्र माच्या आधी मुख्याध्यापिका बार्इंच्या कार्यालयात चहा पिताना बाई म्हणाल्या
आज तुम्ही मनाशी काय ठरवलं असेल ते भाषण कराच, पण त्यासोबत मुलींना स्वतंत्र मोबाइल फोन देऊ नकाअसंही सांगा पालकांना.’ 
मी जरासा चकित झालो. मग बाई म्हणाल्या, ‘काय आहे, या वयात मुलींच्या हाती फोन असल्यामुळे बरेचसे नको ते प्रश्न उद्भवत आहेत. मुली परस्पर मुलांशी बोलत असतात. कधी तास चालू असतानाही गुपचूप मेसेजेस पाठवत, वाचत असतात. मोबाइलमुळे वाईट वळण लागू शकतं या अडनिड्या वयातल्या मुलींना.
मी माझ्या भाषणात असं काही आवाहन केलं नाही; पण ही अशी परिस्थिती खरोखर प्रत्यक्षात आहे, हे मला माहीत होते.
एकदा एक ज्येष्ठ मित्र भेटले. ते वैतागून आणि संतप्त होऊन सांगत होते, ‘तो अमका तमका वाह्यात पोरगा माझ्या मुलीच्या मागे मागे चालतो रस्त्याने. शाळेत तिच्याच वर्गात आहे. पण बाहेरही कुठे क्लासला किंवा आणखी कुठे जातानाही तिचा पाठलाग करतो. त्याच्या बापालाही सांगून पाहिलं, काही फरक नाही.’ 
योगायोगाने तो पोरगा माझ्या थोड्याशा परिचयातला होता. एके दिवशी भेट झाली तेव्हा मी त्याला माझ्याकडे बोलावलं. तो आल्यावर इतर काहीबाही बोलत त्याच्याशी तोविषय काढला तेव्हा तो बोलायचा गप्प झाला. मग मी त्याला त्याचं (आणि तिचंही) वय केवढं लहान आहे, या वयात त्याने अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे वगैरे गोष्टी समजुतीच्या सुरात सांगितल्या. 
तेव्हा बराच वेळ गप्प बसलेल्या त्या मुलाने त्याचा स्मार्टफोन काढला आणि त्यातली फोटो गॅलरी उघडून मला काही फोटो दाखवले. ते त्याच्या वाढदिवसाचे होते आणि त्या प्रत्येक फोटोत ती मुलगी त्याच्याशी सलगीने उभी होती. एकमेकांना केक भरवणं वगैरे. तो म्हणाला, आमचं प्रेम आहे. 
दहावीतला मुलगा. दहावीतलीच मुलगी. ते फोटो पाहून मीच गप्प झालो. प्रयत्न म्हणून आणखी काहीबाही वेगवेगळ्या पद्धतीने बोलून पाहिलं की, तुझं हे एकतर्फी नाहीये हे चांगलं आहे, पण तुमचं हे जे काही चालू आहे त्यासाठी हे वय योग्य नाही. नीट अभ्यास करा, मोठे व्हा, मग तुमचे निर्णय तुम्ही घेऊ शकालच, वगैरे. त्याला कितपत पटलं माहीत नाही, पण आम्ही असं वागू असं त्यानं कबूल केलं.
तालुक्याच्या गावात वरिष्ठ महाविद्यालयात शिकवणारा एक प्राध्यापक मित्र आहे. त्याचं कॉलेज गावाच्या बरंच बाहेर आहे. कॉलेजच्या भोवतीने सगळी शेतं आहेत. तो म्हणाला, ‘साली या शेतातली पिकं वाढली की एक नवंच झेंगट लागतं आमच्या मागं.’ 
मी विचारलं, ‘कसलं झेंगट? शेतातल्या पिकांचा आणि तुमचा काय सबंध?’ तो म्हणाला, ‘लक्ष ठेवावं लागतं पोरापोरींवर. फोनवर बोलत बोलत वेगवेगळ्या दिशेनं पिकात शिरतात एकदम.मी म्हणालो, ‘हे असं सरसकट कसं म्हणू शकतोस यार तू?’ तो म्हणाला, ‘सरसकट नाही म्हणत, पण असं एकदोन वेळा झालं आहे. त्यामुळे प्रत्येकानं याबाबतीत लक्ष ठेवावं, असा आम्हाला संस्थेचाच खासगीत आदेश आहे.
संस्थेची भीती अगदी अल्प प्रमाणात का होईना रास्तच आहे, असं मला वाटून गेलं.
***
तीन वेगवेगळे प्रत्यक्षात घडलेले प्रसंग आहेत, ज्यांचा तत्काळ-सारांश मुला-मुलींच्या हाती मोबाइल देऊ नये, असा काढता येईल. यामुळे हे दुखणं संपेल का, असा प्रश्न तरीही निर्माण होतोच. मोबाइल हातात नव्हते तेव्हा कोवळ्या वयातली प्रेमप्रकरणं होत नव्हती काय, असा दुसरा प्रश्नही उत्पन्न होऊ शकतो. मोबाइलमुळे मुलामुलींना सहज (आणि गुप्त) संपर्काचं एक प्रभावी माध्यम उपलब्ध झालेलं आहे हे खरंच आहे, पण मुद्दा इथे संपत नाही.
वयाच्या त्या त्या टप्प्यावर उसळून किंवा उमलून येणाऱ्या नैसर्गिक ऊर्मी ही गोष्ट या सगळ्याचं मूळ आहे, हे विसरून चालणार नाही. त्या वयात अपरिहार्यपणे शरीरात होणारे बदल आणि त्यातून प्रकट होणाऱ्या मानसिक-शारीरिक भावना यांना कशा पद्धतीने हाताळावे किंवा किमान नियंत्रित करावे, याचं काहीही शिक्षण आपल्या मुलामुलींना आणि अर्थातच पालकांनाही नसतं, यातून हे प्रश्न निर्माण होतात. आपल्याकडे शाळा-महाविद्यालयांतून लैंगिक शिक्षण देण्याबाबत नेहमीच बोललं जातं, पण प्रत्यक्षात त्या पातळीवर परिणामकारक असं काहीही घडताना दिसत नाहीय.
फोनवरून सहज साधता येणारा संपर्कआणि स्मार्टफोनच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमातून सर्व प्रकारचं यलो लिटरेचर अगदी पोर्न मूव्हीजसकट केवळ बोटांच्या स्पर्शाच्या अंतरावर येऊन बसलेलं असताना कोवळ्या वयातल्या मुलांची काळजी करावी अशीच परिस्थिती आहे, हे खरे आहे. पण आजच्या वेगाने शहरीकरण होत असलेल्या ग्रामीण भागातल्या मुलामुलींकडे मोबाइल असणं ही आता नुसती चैनीची गोष्ट नाही, तर एक आवश्यक गरजही झालेली आहे. या धकाधकीच्या काळात विस्तारलेल्या शहरातली घरापासून शाळा-कॉलेजेसपर्यंतची अंतरं, त्या दरम्यान उद्भवू शकणारे अपघातासारखे धोके लक्षात घेतले तर मुलांशी पटकन संपर्क करता येईल अशी उपकरणे त्यांच्याकडे असू देणे ही एक महत्त्वाची गरज आहे. हातातून फोन काढून घेणे हा उपाय होऊ शकत नाही. 
मात्र कुठल्याही गोष्टीत स्मार्टफोनच्या वापरापासून एकूण स्वातंत्र्याचा, आई-वडील आपल्यावर टाकत असतात त्या विश्वासाचा, नात्यांदरम्यानच्या धाग्यांचा, कोवळ्या वयातल्या निसरड्या वळणाचा अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो हेही त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोललं गेलं पाहिजे. आई-बाबांसोबत मुलांचं नातं कितपत मोकळं आहे, यावर बऱ्याच गोष्टी आधारलेल्या असतात. अर्धवट कोवळीकीतून येणाऱ्या वेगाचं, स्वत:तल्या वेगळेपणाच्याकल्पनेचं, अगदी शरीरसंबंधातल्या अनावर ओढीचं आणि एकूणच जगण्यातलं दुसऱ्या टोकाचं थ्रिल या गोष्टींवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येणं शक्य होईल.
नियंत्रणहा शब्दही तितकासा योग्य नाही. पण संस्कारया शब्दाला फार पारंपरिक वास येतो म्हणून नियंत्रण’.
संवादहीच एकमेव गोष्ट कुठल्याही समस्येच्या सोडवणुकीकडे घेऊन जाणारी असते, एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं होऊ शकेल. 
.......................
(लेखक ग्रामीण प्रश्नांचे अभ्यासक, ख्यातनाम कवी आहेत.majhegaane@gmail.com) 
थ्रीलची निसरडी वाट


·         - मनीषा म्हात्रे
आई-वडिलांना धक्का बसेल असं मुला-मुलींचं खाजगी आयुष्य’ आकाराला येतं आहे. त्यांचे मोबाईल, मेसेजिंग अ‍ॅप्सच्या विंडोज,शाळेची दप्तरं, कॉलेजच्या सॅक्स आणि मुख्य म्हणजे त्यांची मनं या सगळ्यात भलभलत्या गोष्टी साठवलेल्या असतात.

 दिशा. १६ वर्षाची आहे. विक्रोळीत राहाते.आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर ती आई आणि आजीसोबत राहते. काम काम.. करणारी आई. आणि घर घर करणारी आजी. अशात आपण कुठे हे शोधणारी दिशा. मन स्थिर नाही. आपलं कोणी नाही असं वाटून आलेला एकटेपणा कायमचा सोबतीला आलेला. 
दिशा दहावी पास झाली आणि हातात स्मार्ट फोन आला.अचानक तिचं एकटेपण जणू संपलंच. कारण फोनने तिला दिलेली कनेक्टिव्हिटी. मैत्रिणींचे मित्र. त्यांचे मित्र तेही हीचे मित्र असा गुणाकार सुरू झाला. फ्रेण्डलिस्ट भराभर वाढत गेली. शेअरिंगला पूर आला. फेसबुकवर फोटोंचा जणू वर्षावच सुरु झाला. दिवसभर गुलुगुलु गप्पा सुरु. 
- आई-आजीला या कशाचाच पत्ता नव्हता.
अचानक एके दिवशी दिशा घरातून गायब झाली. फोनही बंद. घाबरलेल्या कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठलं. मात्र ती काही सापडली नाही. रात्री उशिराने घरी परतली. रडत रडत घरी आलेल्या दिशाला पाहून कुटुंबियांच्या डोक्यात वादळ.
काय झालं असेल?
तिला जवळ घेऊन विचारलं, तेव्हा आई आणि आजीला दिशाने एक कहाणी सांगीतली- एक गाडी आली. त्यात काही मुलं होती. त्यांनी माझं अपहरण केलं. मला मारलं आणि माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी कशी बशी पळाले आणि घरी आले.
- हे भयंकरच होतं. पुन्हा पोलीस ठाणं गाठलं. मुलीने सांगितलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. मात्र पोलीसांना पाहून भांबावलेल्या दिशाची बोलतीच बंद पडली. ती उलटसुलट उत्तरं द्यायला लागली. तपशीलाचा मेळ बसेना..
शेवटी तिने खरं काय ते कबुल केलं.
अपहरण वैगेरे काही झालेलं नव्हतं. दिशा तिच्या (नव्या) मित्रांबरोबर सिनेमाला गेली होती. तिथून अचानक शॉपिंगचा बेत ठरला. मग हॉटेलात जायचं ठरलं. या गंमतीजंमतीत बराच उशीर झाला. इतक्या उशीरा घररी गेल्यावर आई-आजीचा ओरडा बसेल, म्हणून मग ही अपहरणाची स्टोरीतयार झाली.
- मग पोलीसांनी तिचा मोबाईल चेक केला. तर त्यात पोर्न क्लीप्स आणि तशानिरोपा-निरोपीचे तपशील सापडले.
- पोलीस अधिकारी संवेदनशील होते. त्यांनी दिशाच्या आई-आजीला थोडी कल्पना दिली. मुलीवर नीट लक्ष ठेवा, म्हणाले. दिशाचे कान उपटले.
-हे असं कान उपटणं, आता पोलीसांच्या कामाचा एक महत्वाचा भाग बनला आहे.
अशा संवेदनशील घटनांमध्ये आपल्याला पोलिसांचा सहभाग माध्यमांमध्ये दिसतो तो गुन्हा घडून गेल्यावर. बलात्कार, शारीरिक बळजोरीचा प्रयत्न, ब्लैकमेलिंग, छेडछाड अशा बातम्या हल्ली सततच पाहा-वाचायला मिळतात. मग पोलिसांकडे धरपकड, गुन्ह्यांची नोंद, तपास अशी कामं येतात.
- पण त्याहीपेक्षा मोठं काम हल्ली पोलिसांच्या वाट्याला आलं आहे, ते या अशा वाट चुकू घातलेल्या/चुकलेल्या मुला-मुलींनावळणावर आणण्याचा प्रयत्न करणं. त्यांना समज देणं. त्यांच्या आईवडिलांना जागं करणं!!
फेसबुकवरून मैत्री झाली. व्हॉटसअ‍ॅपवर चॅटींग वाढलं, हाईक वरून दोघेही जवळ आले आणि सोशल मिडीयाच्या भावविश्वात गुंग झाले. ना कशाची फिकीर.. ना काळजी.. सोशल मिडीया आणि फक्त फ्रेंडस हेच आपलं विश्व समजून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, हाइक, जी चॅटच्या विळख्यात सापडलेली वयात येणारी मुलं, त्यांच्यातली शारीरिक गुंतागुंत, त्यापायी न कळणार्या धोक्यांना कवटाळत पुढे धावणारं त्यांचं बेलगाम आयुष्य... याचे गरगरून टाकणारे तपशील पोलीस अधिकार्यांशी बोलताना मिळतात.
एक तरुण माझा पाठलाग करतोय, माझी छेड़ काढतोयअशी तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात धडकलेल्या एका शाळकरी मुलीच्या तक्रारीवरून विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. पॉस्को आणि विनयभंगाची केस असल्याने पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून मुलाला अटक केली. मुलगाही अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली. तीन महिन्यानंतर मुलगा सुटून बाहेर आला... त्यानंतर आता तो मुलगा आणि तीच मुलगी मुलगी दोघेही गायब झाले आहेत. मुळात गेल्या तीन वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यातून मौज मजा झाल्यानंतर मुलगा दुसऱ्या मुलीकडे आकर्षित झाला. म्हणून त्याला धड़ा शिकविण्यासाठी मुलीने हे पोलिसांकडच्या तक्रारीचं पाऊल उचललं, असं खरं चित्र असल्याचं संबंधीत अधिकारी सांगतात. पुढे काही काळ उलटल्यावर दोघांनाही आपल्यातल्या प्रेमाचा पुन्हा नव्याने साक्षात्कार झाला म्हणून दोघं पुन्हा एकमेकांसोबत पसार झाले.
कुटुंबियाना त्यांचे प्रेमसबंध मान्य नाहीत म्हणून दोन्हीकडची कुटुंबं पोलिसांच्या मागे आहेत. 
- ‘आता या परिस्थितीत काय करणार?’- असा प्रश्नच पोलिसांना पडला आहे.
शिक्षण सोडून भलत्या वयात केवळ प्रेमाच्या (खरंतर अनावर शारीरिक आकर्षणाच्या) तात्कालिक उकळीपायी गायबहोणारी ही मुलं-मुली त्यांच्याही नकळत गंभीर अशा गुन्हेगारी विश्वात ओढली जाण्याची शक्यता वाढते असं पोलीस अधिकारी सांगतात. 
फेसबुकवर ओळख झाली, मग त्यानेबाहेर भेटायला बोलावलं, ‘तीगेली आणि नको ते घडलं... या तपशिलात थोडाफार बदल होत घडलेल्या घटना हल्ली रोज माध्यमात दिसतात. सोशल मीडिया साईट्सवरून झालेल्या ओळखी प्रत्यक्षातल्या परिचयात रुपांतरित होणं ही निसरडी वाट असू शकते, याची जाणिव या मुला-मुलींना नसते, असं नाही. पण थ्रीलनावाची कधी पूर्ण न होणारी ओढ या मुलांच्या विचारशक्तीवर सहज मात करताना दिसते.
त्यातूनच भलत्या कुणाच्या आश्वासनावर विसंबून आईवडिलांना न सांगता थेट घर सोडून जाण्यासारखे प्रकार घडतात.
याला उपाय काय?’- असं विचारलं तर अगदी अनुभवी, ज्येष्ठ पोलीस अधिकारीदेखील विचारात पडतात.
- आणि चर्चा येते ती त्याच जुन्या उत्तरावर : विश्वास!
आईवडील-शिक्षक आणि वाढत्या वयातली मुलं यांच्यातला विश्वास, संवाद, खुलेपणा या जुन्या गोष्टीच आजच्या नव्या काळात कधी नव्हत्या इतक्या महत्वपूर्ण आहेत, असं हे अधिकारी अक्षरश: विनवल्यासारखं सांगतात.
आई-वडीलांबरोबर तीसिक्रसी राहाणार नाही, अशी मुलांची खात्री असते अनेकदा. म्हणून शाळा-कॉलेजांनी या प्रकारच्या संवादासाठी पुढाकार घ्यायला हवा, असंही त्यांचं सांगणं आहे.
नक्की काय(काय) होतंय?पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या गप्पांमधून हाती लागलेले तपशील
1. आई-वडिलांना विश्वास ठेवणं कठीण व्हावं अशा वेगाने मुला-मुलींचं खाजगी आयुष्य त्यांच्या मोबाईल फोनमध्ये-मेसेजिंग अ‍ॅप्सवर आकार घेतं आहे.
2. स्वत:च्या मोठं होण्याचा संबंध ही मुलं मनमानी वागण्याशी लावू लागली आहेत. त्यासाठीचं नियोजन आई-वडिलांपासून गुप्तता राखून त्यांना करता येतं.
3. आठवी-नववीच्या वयातल्या मुला-मुलींच्या मोबाईल फोनमध्ये पोर्न क्लिप्स सापडणं, कुणाही त्रयस्थाला कळणार नाही अशा सांकेतिक भाषेत परस्परांशी बोलणारे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स असणं हे सातत्याने दिसतं.
4. शाळा-कॉलेजांमधल्या जागरूक शिक्षकांंकडे या अशाघडामोडींची माहिती असते. त्यांना त्याविषयी काळजीही वाटते. पण या काळजीला प्रत्यक्ष कृतीचं रुप देणं अनेकदा अशक्य बनतं त्याची कारणं दोन : एकतर शाळा-कॉलेजचं व्यवस्थापन शक्यतो भानगडी परस्पर मिटल्या तर उत्तमत्रयस्थ भूमिकेत असतं. हरकत घेणारे, अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी जागरूक असलेले शिक्षक बरेचदा एकटे पडतात. आणि दुसरं म्हणजे विद्याथर््यांच्या पालकांना काही सांगायला गेलं, तर ‘‘आमच्या मुलांवर तुम्ही संशय ठेवताच कसा?’- असा रागीट नकारच ऐकायला मिळतो. पालक सत्यस्थिती काय आहे, ते तपासून बघायलाही तयार नसतात.
5. शाळकरी आणि पुढे कॉलेजच्या वयातल्या मुलींचाही शारीरिक जवळिकीसाठी पुढाकार’, ‘तयारीअसणं, हा या प्रकारांना प्रोत्साहन/वाव देणारा विषय बनला आहे.
6. यामध्ये मुलींच्या शोषणाच्या घटना घडतात आणि त्यातून गंभीर स्वरुपाचे गुन्हे आकाराला येतात, हे तर दिसतंच... पण अल्पवयीन मुलगे या चक्रात अडकून आयुष्याची माती करून घेतात.
7. अनेकदा मुली सोयीने अशीनाती जोडतात, त्यांचा फायदा असतो तोवर सगळं बिनबोभाट, सुरळीत चालू राहातं... पण मुलींच्या मनाविरुध्द काही घडलं, अगर परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाऊ लागली आहे, अशी शंका मुलीला आली, की ती त्यामुलाचं नाव घेऊन मोकळी होते. आणि (विशेषत: कायदेशीर) परिणामांची जराही कल्पना नसलेला तो मुलगा अवघड अशा सापळ्यांमध्ये अडकत जातो.
(मनीषा लोकमतच्या मुंबई आवृत्तीमध्ये वार्ताहर म्हणून पोलीस बीट पाहाते)
स्पर्श-कल्लोळ


·         - वृन्दा भार्गवे
गजबजल्या रस्त्याच्या कुठल्याशा कोपऱ्यातएखाद्या चाय टपरीवर, आडवळणाच्या पुलावरएकमेकांच्या हातात केवळ हात घालूनच नव्हेतर अतीव असोशीने एकमेकांना कवटाळून पाठमोरी बसलेली जोडपी...जाणाऱ्या-येणाऱ्या समोरच पाठीवरून हात फिरवकीस कर, जवळ घे... हे सगळे बिनदिक्कत चालू! 

गेल्या काही दिवसांतल्या बातम्या. अस्वस्थ करणाऱ्या! शाळकरी मुलींविषयी, महाविद्यालयीन तरुण-तरुणींविषयी. बलात्कार, अत्याचाराबरोबर शाळा-महाविद्यालयातील त्यांचे असभ्य वर्तन, अश्लील, अश्लाध्य बोलणे, वावरणे कोणाच्याही नजरेत भरणारे. याकडे साऱ्यांनीच केलेले दुर्लक्ष. शाळेत शिक्षकांनी, महाविद्यालयात प्राध्यापकांनी, समाजात लोकांनी. रस्त्याच्या कुठल्याशा कोपऱ्यात, एखाद्या चाय टपरीवर, आडवळणाच्या एखाद्या पुलावर, तेथील सुशोभित मैदानवजा बागेत एकमेकांच्या हातात केवळ हात घालूनच नव्हे, तर अतीव असोशीने एकाच शालीत एकमेकांना कवटाळून पाठमोरे बसलेले अनेकजण.
जाणाऱ्या-येणाऱ्या समोरच पाठीवरून हात फिरव, कीस कर, जवळ घे... हे सगळे बिनदिक्कत चालू! 
अशा जोडप्यांच्या समोरूनच रस्त्यावरून जाणारे-येणारे फेऱ्या मारतात. इतर मुले नीट पाहून घेतात. छोट्या मुलांना अधिक कुतूहल, जे पडद्यावर पाहतो त्यापेक्षा हे अधिक चांगले की वाईट याची शहानिशा ते करत राहतात. पोलीस आलेच तर केवळ हटकल्यासारखे. त्यात दम वा जोर कमीच.
कुणी हटका-बोलायला-लिहायला-हरकत घ्यायला गेलेच, तर प्रश्नांच्या फैरी...
वयात येणाऱ्या मुलांना तारुण्यसुलभ भावना असू नयेत का? आकर्षणाचे काय? स्पर्शाचे काय? मोकळीकीचे काय? नसतात त्यांना घरे, नसतात कोणत्या खासगी जागा. मग ते संध्याकाळी एखाद्या फांद्या न कापलेल्या झाडाखाली, मित्राच्या पार्किंग प्लेस नसलेल्या जागेत, गाडीच्या आत, स्पर्शाचा हा अनावर खेळ खेळत असतील तर काय बिघडले? किंवा भर दुपारी रस्त्याच्या विरळ गर्दीच्या ठिकाणी कीस घेत उभे राहिले तर तुमच्या पोटात दुखायचे काय कारण? स्कार्फ लावून आपली ओळख न दाखवता सुसाट टू व्हीलरवरून गावापलीकडे जात आपापले वासनेचे वा प्रेमाचे जग त्यांनी उभे केले तर तुमचे काय बिघडले? त्याचा एवढा बाऊ का? कशासाठी?
- वरवर पाहता प्रश्न सुसंगत वाटू शकतील. परंतु ते तर्कशुद्ध नाहीत. 
शहरी महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या या मुला-मुलींकडे जरा बारकाईने पाहा :
२० ते २५ टक्के मुलेमुली सोडल्यास अकरावीत प्रवेश घेतलेल्या मुलींचा मेकअप, त्यांचे राहणीमान थक्क करणारे असते. त्यांना युनिफॉर्म असतो, परंतु तरीही त्यांनी कानात-हातात घातलेले अलंकार, त्यांच्या सलवारीच्या आत घातलेली लेगीन जाणवत असते. पाहण्या-बोलण्याचे विषय काय? - तर मोबाइलवर कोणी काल काय पाठवले, मग तो फोटो असो वा एखादे संभाषण. ते जितके चावट, फाजील द्वयर्थी तेवढे त्यांना चेकाळता येणार. हे पाहण्यासाठी तास बुडाला तरी चालेल. 
एखाद दोन तास अटेंड करून कॉलेज कॅम्पसमध्ये दोन-तीनच्या जोड्यांनी बसायचे. प्रशासन दर वेळेस हटकते असे नाही. एकतर वर्गात किंवा ग्रंथालयात किंवा उपक्र म असल्यास थोडा वेळ परिसरात नाहीतर थेट घरी असा निर्णय कडकपणे प्रशासन पाळते का
या मुलामुलींकडे संततिनियमनाची साधने सर्रास दिसतात हल्ली. याचा धक्का मानावा की निदान काळजी तरी घेतातयाचा सुस्कारा टाकावा, ते कळणे अवघड! या मुलामुलींमधल्या मोकळेपणाचा वारा बदलाची सुंदर दिशा दाखवतो हे खरे; पण त्याला नको त्यावेळच्या शरीर सहवासाचे-नात्याचे फसवणारे, आक्रोश करायला लावणारे, कधीकधी तर उद्ध्वस्त करायला लावणारे एक विचित्रसे अस्तर येऊन चिकटले आहे. नीटशी वाढही न झालेल्या कोवळ्या शरीराच्या मुली; आपले सर्वस्व कुणाकुणाच्या स्वाधीन करतात आणि त्यांच्यावर कोणीतरी व्हिडीओ फिल्म काढून मोकळा होतो. एखादीला गंमत म्हणून सिगरेट हवी असते.
तुझ्या आईचे इंस्टाग्रामचे फोटो काय सेक्सी आहेत आणि तू! तुझी आई मस्त राहते यार, तुझ्याकडे काय आहे?’ - असले प्रश्न विचारले गेले की मुली निराश होतात. समोरचा जे म्हणेल तसे करायला तयार होतात. 
काळ बदललाय हे खूप सवंग वाक्य आहे. आज या बदलत्या काळात प्रामुख्याने कुटुंबाने, शाळेने, महाविद्यालयाने सरते शेवटी समाजाने या मुलामुलींना कोणते संचित दिले आहे याचा विचार करायला हवा. 
कुटुंब मुलामुलींना कोणत्या गोष्टी दाखवते आणि कोणत्या लपवते? टीव्हीवर अमुक एक पाहा असे सांगितले जाते, की काय पाहू नको हे? स्मार्टफोन, पीसी किंवा लॅपटॉप हातात दिला जातो तेव्हा जबाबदरीनावाचे एक जरुरीचे उपकरण कुणी देते का या मुलांच्या हातात?
महाविद्यालयात एकाही प्राध्यापकाला मुलांचे दप्तर तपासण्याचा अधिकार नसतो. अपवाद फक्त परीक्षेच्या वेळेचा. अचानक प्रत्येक प्राध्यापकाने मोबाइलसकट विद्यार्थ्यांच्या सर्व वस्तू चेक करायला सुरुवात केली तर? घडणाऱ्या गुन्ह्याअगोदर कॉलेजा-कॉलेजात कितीतरी मुद्देमाल सापडू शकेल. पोर्नोग्राफीशी संबंधित छायाचित्रे, व्हिडीओज, कोणत्यातरी निरपराध मुलीने विश्वासाने केलेल्या गप्पांची रेकॉर्डेड संभाषणे, जिथे जे सेव्ह केले असेल ते पाहता येईल.
- पण हे काम आमचे नाही म्हणून शाळेत शिक्षकांनी आणि महाविद्यालयात प्राध्यापकांनी कानावर हात ठेवायचे. आपली मुलगी अशी नाहीच, आपला मुलगा हे असले कधी करूच शकत नाही असे पालकांनी छातीठोकपणे सांगायचे. आणि त्यातून आपल्याच मुलामुलींना जाळ्यात गोवणारी भीषण प्रकरणे घडली, बलात्काराच्या तक्रारी रस्त्यावर आल्या; की गुन्हेगारीचा शोध घेण्याची जबाबदारी मात्र पोलिसांवर सोपवायची. पुन्हा तपासात पोलिसांनी मुलगी-मुलगा यांच्या वर्तनावर भाष्य केल्यास त्यांची असंवेदनशीलता काढण्यास आपण तयार!हे नुसते आरोप नाहीत. नुसती टीका नाही. वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांच्या आधारावर क्षणार्धात एका पिढीवर फुली मारणे नाही.
पण मग का होते हे असे? का मुले आणि मुलीही फक्त शरीरानेच जगू-वागू लागतात? पालक आणि शिक्षक, शाळा आणि कॉलेजे काय करतात या मुलामुलींसाठी? आहे का काही संवादाला वाव? भेटवली जातात का त्यांना त्यांचीच आते-मामे भावंडे? दिला जातो का त्यांना एखादा इंटरेस्टिंग प्रोजेक्ट? विचारले जाते का त्यांना त्यांच्याच मित्र-मैत्रिणींबद्दल? बोलावले जाते का कधी घरी? होतात का ओळखी? मुलांचा मोबाइल असतो कधी आई-बाबांच्या हातात? शाळकरी मुलगीदेखील तिच्या मोबाइलला पासवर्ड ठेवते आणि म्हणते, माझी आई किंवा माझे वडील माझे मित्रमैत्रीण कधीच बनू शकत नाहीत. घरात दोनच गोष्टी मिळतात या मुलामुलींना- अति संशय किंवा अति काळजी. आणि सततची पाळत. अशा घराबद्दल जवळीककशी वाटणार? आणि जवळीकहवीशी वाटते तेव्हा/त्या वयात मग जवळच्याची ऊबकोण कशी टाळणार?
महाविद्यालयात वयाला सर्वार्थाने पंख फुटतात. आकर्षणाचा वेग दुपटीने वाढतो, राग कधी प्रबळ होतो, हिंसा कधी रुजते समजत नाही. अहंकाराची लागण तातडीचीच! वस्तूसारखीच व्यक्ती मिळाली पाहिजे. तिचा नकार म्हणजे घाला, अपमान, त्याचा बदला म्हणजे तिला/त्याला संपवणे. एकदम एक घाव नाही. तिच्या दृष्टीने जे मौल्यवान त्याचाच पालापाचोळा करायचा. हे घडते आहे. रोज. माझ्या नजरेसमोर घडते आहे.
समाज कायम तटस्थ. सोयीने इकडचा नाहीतर तिकडचा. एकतर टोकाचा संस्कृतिरक्षक नाहीतर मग मारा मिठ्या-हसा-नाचावाला! फ्रेंडली!! परिणामांबद्दल उदासीन. विपरीत घटना घडल्या की कायदा आणि सुरक्षा कशी बिघडली आहे याची बोंब मारायला तयार.
कोण जबाबदार आहे हे जे (बि)घडते त्याला?
- आपणच! 
समुपदेशन नावाच्या प्रकाराशी आपल्याला काही घेणे नाही. भीषण घटना घडल्याशिवाय यंत्रणा हलणार नाही. कॉलेजे ढिम्म बदलणार नाहीत. 
तरुणच नव्हे तर शाळकरी मुलेही हिंस्त्र बनत चालली आहेत. शरीराकडून त्यांचे लक्ष थोडे बाजूला वळवून त्यांच्या मनाशी त्यांची मैत्री घडेल असे काही करता येईल का?
काहिलीनंतर गार पाण्याचा शिडकावा झाल्यावर मृदगंधाने श्वास भरून घ्यावासा वाटेल, असे काही...?
(लेखिका विद्यार्थिप्रिय प्राध्यापिका आणि नाशिकच्या हं.प्रा.ठा. महाविद्यालयात वृत्तपत्र आणि संज्ञापन विभागाच्या प्रमुख आहेत.bhargavevrinda9@gmail.com )
मोबाइल नंबर भेटंल का?


·         - श्रेणिक नरदे
घरच्या देवाला कधी पाया न पडणारा गडी, तिला भेटायला म्हणून देवाचा भक्त झाला. कुठंही जगात भेटायचं म्हटलं की कोणतरी शंभर टक्के ओळखीतलं तिसरं त्या ठिकाणी दुर्दैवानं असतंयच. म्हणून मग हा देवळात खिडकीबाहेर उभं राहायचा आणि ती आत. तिथं पण खच्चून चारपाच मिन्टाचीच भेट व्हायची. हा जवळ जाऊन हात धरायला लागला की ती लाल व्हायची आणि पळून जायची. आणि हा तिथंच बसून राहायचा. ही अशी लव्हस्टोेरी. ...गावाकडं अनेकांची अस्ती!!  
प्रेम ते काय नसतंय, सगळ्या मनाच्या समजुती हायीत, गरज संपली की प्रेम संपतंय, नंतर नंतर प्रेमाचा कटाळा येतोय. पण प्रेमात पडलेला नवीन गडी जमीन सोडून चारदोन फूट हवेतून चालत असतो. ती हवा बॉलिवूड शिनमातल्या गुलाबी हवेसारखी वाट्ती!
जग सगळं याच्याकडे भुताटकी झालीय अशा नजरेनं बघतं. 
पण हा त्याच्याच तालात धुंद असतो...
एका अशाच दोस्ताचं प्रेम. 
हा कॉलेजच्या शेवट वर्षाला होता. गडी मुलकाचा आळशी, पण बोलण्यात चारसोबीस. कपड्याचा ताळमेळ कशाला कशाचा नसायचा. अशी याची लाइफ सुखात आळसात मस्त चाललीती. 
प्रेम वगैरे गोष्टींपासून धा हात लांब असायचा. मैत्रिणी बक्कळ होत्या, पण सगळ्या एंगेज होत्या. गावातल्या पोरीकडं बघितलं तरी गावात लगेच चर्चा व्हायच्या आणि विषय हार्ड व्हायचा.
म्हणून काही पोरं ही आयुष्यभर सरळमार्गी राहत्यात. 
कॉलेज संपत आलं तरी आपलं जुळलं नाही मग आपण काय कॉलेजलाइफ जगलो? अशी प्रश्नं आयुष्यभर पडत राहतात. 
माणसाला कायम भूतकाळात डोकवायची सवय अस्ती. एकांतात राहिलं की भूतकाळात कधी मन जातं कळतसुद्धा नाही. मग तेव्हा असं करायला हवं होतं, मग असं झालं असतं असं बिनकामाचं स्वप्नरंजन होऊन मन फस्ट्रेट होतं. 
याला बऱ्याचदा वाटायचं आपणसुद्धा प्रेमात पडावं. आपली पण एक गर्लफ्रेंड असावी. सगळं तिच्याबरोबर शेअर करता यावं. आता ऐकायला तर कुणाकडे सवड असते
अशा सगळ्यात कॉलेजच्या सुरुवातीच्या दोन तीन दिवसानंतर ती उगवली. ती बसायची तिथंच कुठतरी हा बसायचा. बडबड्या स्वभावामुळं तिनं आपल्याकडं बघावं म्हणून हा काहीही बडबडत राहायचा. कधीतर ती मागं वळून बघायची. 
पहिल्या दिवशीच ती बोलली. ओळख झाली. 
सोशल मीडियाच्या मोबाइल जमान्यात व्हॉट्सअ‍ॅपचा ग्रुप फॉर्म होतो. तसाच यांचाही झाला. तिथून गड्यानंं तिचा नंबर मिळवला. बोर्डाच्या परीक्षेत नंबर मिळण्यापेक्षा मोबाइल नंबर मिळायची खुशी वेगळी असते. पूर्वीच्या जमान्यातल्या आशिक लोकांनी तू भेटलीस तेव्हा खूप काही सांगायच होतं, मन थोडं बोलत होतं, खूप काही लपवत होतं’ ..असा सगळा कुट्टाण्णा केलंला! 
आता ते बदललं. 
व्हाट्सपवर सांगता येतंय लपवलेलं काही. 
च्याटिंग वाढत होतं, ती कॉलेज अधेमधे चुकवायची, याची नजर दाराकडे लागलेली असायची, कुणीही आली की तीच आल्याचा भास व्हायचा. ती यायची नाही तेव्हा हा एक लेक्चर करून सटकायचा. 
पोराला एखादी पोरगी आपल्यासाठी झुरते हे कळायला अखंड आयुष्य जातंय पण पोरींना कोण मागावर हाय हे लगेच कळतं. 
तिला जाणवलं, तिने उलटतपासणी चालू केली.
मग याने पण कबुली दिली. आवडतीस... 
ती नॉय नॉय नॉय म्हणायची. हा मनवायचा. हे सुरू राहिलं. 
एक दिवस जरा भांडण झालं. आणि तिचा पहिला फोन आला तो पण रडत रडत!
आयुष्यात मला असं कुणी नाही बोललंम्हटली आणि फोन बंद केला. 
सगळीकडूनं ब्लॉक केलं. अशावेळी मित्रमैत्रिणीच धावतात. हे जाम घाबरलं होतं. त्यातच प्रेमात पहिला रडका कॉल. मित्रमैत्रिणीने आधार दिला म्हणून हा वाचला. 
तिनं पण नॉय नॉय करत ब्लॉक काढला. 
परत सगळं लेवल झालं. 
चोरून भेटीगाठी व्हायल्या. 
कुणीतरी बघतंय म्हणून ती दहा मिन्टातच सटकायची. 
हा तिचं जाणं बघत बसायचा.
ती सोडून आख्खी प्रिथ्वी ब्लर झालेली दिसायची. 
हजारदा कुणी ओरडून सांगितलं तरी ऐकणार नसलेला हा तिच्या एका बोलण्यावर जीमला पळायला लागला, वेळच्या वेळी कामं करायला लागला, अपडेटेड जगणं चालू झालं. 
इतरवेळी याला प्रश्न पडायचा हे प्रेमात पडलेले येडे लोकं एवढा वेळ फोनवर काय बोलत असतील
त्या प्रश्नांची उत्तरं आता सापडायला लागलीती, कॉलेजमध्ये चारचौघात भेट रोज झाली तरी पाहिजे ते बोलता येत नही. 
चोरून भेटायचं तर कॉलेजबाहेर, तिथं गाव सगळं वळखीचं. एकदा हा भेटायला गेला, तिनं ठिकाण ठरवलंतं. हा तिची वाट बघत बसला. ती येत होती, जवळ आली आणि पुढं तसंच न बोलता निघून गेली. याला वाटलं काहीतरी झालं असणार. मग पुढं जाऊन तिला विचारलं तर घरच्या शेजाऱ्याने बघिटलंतं. योगायोगानं तो याचा मित्र निघला. 
तिथून आल्यावर ती फोन करून परत रडायली, आता सगळं घरात कळतंय म्हणून. 
यालापण तेवढीच भीती वाटली. त्या शेजाऱ्याला यानं गाठलं आणि तिच्याबरोबर माझी सेटिंग करून दे कीम्हणून त्याच्या मागं लागला. 
ते पण घाबरलं. मी नही जाम्हणटला. मग याला बरं वाटलं. 
त्याला कायच माहिती नाही हे कळल्यावर याच्या जिवाला चैन पडली. तिला सांगिटल्यावर तिला पण बरं वाटलं. प्रेम पवित्र वगैरे लोकं म्हणत्यात पण आपण एकटं हिंडताना कोण काळं कुत्रं आपल्याकडं बघत नही. पण एक पोरगी बरोबर असली की सगळ्यांच्या नजरा आपल्याकडं लागतात. कधीकधी वाटतंय जगात कोणच नसावं दोघांशिवाय. त्याला वाटायचं.
घरच्या देवाला कधी पाया न पडणारा गडी, तिला भेटायला म्हणून देवाचा भक्त झाला. कुठंही जगात भेटायचं म्हणटलं की कोणतरी शंभर टक्के ओळखीतलं तिसरं त्या ठिकाणी दुर्दैवानं असतंयच. म्हणून मग हा देवळात खिडकीबाहेर उभं राहायचा आणि ती आत. तिथं पण खच्चून चारपाच मिन्टाचीच भेट व्हायची. हा जवळ जाऊन हात धरायला लागला की ती लाल व्हायची आणि पळून जायची आणि हा तिथंच बसून राहायचा.
ही अशी लव्हस्टोेरी. 
गावाकडं अनेकांची असते.
त्यांची दोघांची अशीच. 
पण त्यांचंही तेच झालं. जे बाकीच्यांचं.
प्रेमाचं रूपांतर लग्नात व्हायची वेळ येत्या तेव्हा रीतीरिवाज असलेल्या जातिधर्माच्या भिंती आडव्या येतातच. 
आल्याच.
या दोघांच्या धर्मजाती निराळ्या, प्रेमाची गाडी जोरात पळत असताना अचानक असले फाटक येतात. 
मोठ्या शहरात कुण्णाची कुण्णाला खबरबात नसते, गावात घरातलं लष्टक घरच्या अगोदर बाहेरच्या लोकांना कळतंय. त्याच त्याच धर्मजातीच्या अभिमानी भिंती मग त्यांना लांब लांब करतात..
आता मात्र त्या दोघांना..
त्यांच्यासारख्या अनेक दोघांना या भिंती ओलांडून जवळ यायचं आहे कायमचं...
( श्रेणिक फेसबुकवर अत्यंत प्रसिद्ध असलेला तरुण लेखक आहे आणि शेतकरीही आहे.)shreniknaradesn41@gmail.com
सुटायचंय?


·          
कोवळ्या वयातच डसणारं अनावर शारीरिक आकर्षण इतक्या पटपट मर्यादा का ओलांडतंय? कॉलेजातल्या, तरुणच नव्हे; शाळेतल्या कच्च्याबच्च्या मुला-मुलींच्या अस्वस्थ सिक्रेट जगात डोकावून पाहणारा खास अंक
आठवी-नववीची मुलगी.
अचानक बातमी येते की तिच्यावर बलात्कार झाला. वर्गातल्याच पाच-सात मुलांनी एकत्र येऊन केलेला बलात्कार.सगळे शाळेतून एकत्रच निघाले. एका ठरलेल्या ठिकाणी जमले. आणि तिथे नको ते घडलं.
सात-आठ दिवसांनी तक्रार झाली. पोलिसी चौकशीची चक्रं फिरली. दोषी मुलांना अटक झाली. 
समाजाला धक्का. गोंधळ. स्वाभाविक संतापाच्या बातम्या. निदर्शनं. निषेध.
- काही दिवसांनी कळलं, की प्रकरण एवढं साधं नाही. संतापाऐवजी काळजी वाटावी असं आहे. अधिक गंभीर आहे.
ती मुलगी त्या मुलांच्याच गटातली. व्हॉट्स अ‍ॅपचा ग्रुप. फेसबुकवर सगळे फ्रेंडस. व्हॉट्स अ‍ॅपची ग्रुप चॅट तपासल्यावर पोलिसांनाही धक्का बसला असले मेसेजेस आणि फोटो. शिवाय क्लिप्स.
कोवळ्या वयातलं शारीरिक आकर्षण, अनुभवाची घाई, चोरटेपणातलं थ्रिल आणि आईवडिलांपासून शिक्षकांपर्यंत सगळ्यांचीच नजर सहज चुकवता येण्याच्या सोयी... यातून तयार होणारी शक्यता कोवळ्या वयातल्या मुलामुलींच्या आयुष्यात कोणतं वादळ आणते आहे, याची ही घटना हा एक नमुना.
-अशा बातम्या आता नेहमी ऐकू येतात.
हे का असं होतंय? जबाबदार कोण आहे या अकाळी उकळीला? सोशल मीडिया? तंत्रज्ञान? नको एवढा खाजगीपणा देणारे पासवर्डस? की या मुलांशी तुटलेला संवाद? त्यांच्या आयुष्यात आलेल्या कंटाळ्याचा तवंग?
पोलिसांना काय दिसतं’? हेल्पलाईन्स चालवणारे समुपदेशक कोणती सिक्रेट्सजाणतात?
- हे सगळं सगळं शोधण्याचा प्रयत्न आॅक्सिजनने केला आहे. त्याचा हा पहिला भाग!!!
.................................................
सुटायचंय?
यातलं काही तुम्हाला माहितीये? तुम्ही काही अनुभवलंय? कधी अडकला आहात, नको त्या गुंत्यात?
मदत हवी आहे तुम्हाला त्यातून सुटण्यासाठी? - तर मोकळेपणाने विचारा प्रश्न,शेअर करा तुमचे अनुभव.पुढच्या भागात या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करू!
नाव लिहू नका. लिहिलंत तरी ते गुप्त राहील याची खात्री बाळगा: 


No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता