Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Thursday 19 January 2017

लोकमत ऑक्सिजन चा विशेष अंक प्रत्येक तरुण-तरुणीने,पालकाने वाचावा असा 11 JAN 17

उकळी फुटल्यावर.. 2
·         कॉलेजातल्या तरुणच नव्हे, शाळेतल्या कच्च्याबच्च्या मुला-मुलींच्या अस्वस्थ सिक्रेट जगात 
डोकावून पाहणाऱ्या खास अंकाचा पार्ट - 2
कळतं हो सगळं, पण पटत नाही. मान्य कसं करणार, आमची मुलं अशी वागत असतील?’
- गेल्या गुरुवारी आॅक्सिजनचा अंक प्रसिद्ध झाल्यानंतर एका घाबऱ्याघुबऱ्या आईचा फोन आला. त्यांचा प्रश्न होता की, मुलांच्या जगात असंकाही आहे हे मान्य कसं करणार?
मान्य करा अगर करू नका, मुलामुलींच्या आयुष्यात या गोष्टी घडत आहेत, हे वास्तव.
हेचित्र सर्वसमावेशक आहे का? म्हणजे सगळीच मुलं आणि सगळ्याच मुली त्यातल्याअसतात का? - असेही प्रश्न अनेकांनी विचारले. त्याचं उत्तर अर्थातच नाहीअसं आहे. पण हे खरं, की ही लागण मोठी आहे आणि वाढती आहे.
गंभीर आहे, ते हे की या स्वाभाविक वाटणाऱ्या थ्रिलचे परिणामकुणी या मुलांना वेळेवर सांगत नाही आणि आपापली लढाई एकेकट्याने, गुपचूप लढत राहणं.. त्यापायी येणारा असह्य ताण सोसत राहणं आणि हे सगळं आपल्या आईवडिलांपासून, घरापासून लपवत राहण्याचा आटापिटा त्यांच्या वाट्याला येतो.
ही मुलं आतून एकेकटी पडत जातात. त्यातून बरेच जण बाहेरही पडतात. काळ हे औषध इथेही लागू पडतंच की! पण मनावर ओरखडे राहतात.
जी बाहेर पडू शकत नाहीत, त्यांच्या बाकीच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो. तोल हरवतो. त्यातून कुणी गुन्हेगारीच्या चक्रात अडकलं की आयुष्य नको त्या वळणांनी सटकत राहतं. विशेषत: मुलगे.
आधीच्या परस्पर संमतीतून चालू झालेली नाती नंतर काही कारणांनी बिनसली की आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. प्रकरण ब्लॅकमेलिंगपर्यंत पोचतं. दबाव. दडपण. बळजोरी. मग पोलीस. तक्रारी. चौकश्या.
- हे असं समजा झालं, तर.. 
पुढे काय?
- या सर्वात कळीच्या प्रश्नाचं उत्तर शोधणारा हा अंक.
- आॅक्सिजन टीम
सुटायचंय?
यातलं काही तुम्हाला माहितीये?
तुम्ही काही अनुभवलंय?
कधी अडकला आहात, नको त्या गुंत्यात?
मदत हवी आहे तुम्हाला त्यातून सुटण्यासाठी?
- तर मोकळेपणाने विचारा प्रश्न,
शेअर करा तुमचे अनुभव.
पुढच्या भागात या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा
प्रयत्न आपण करू!
नाव लिहू नका. लिहिलंत तरी ते गुप्त राहील याची खात्री बाळगा.
ईमेल :  oxygen@lokmat.com
कोण असतात ह्या?

·         मुली?
मुलींच्या जगात कशाला काही असेल मुलांसारखं? हॉट
- असा प्रश्न पडलाच असेल, तर मुलींमध्येही हॉट व्हिडीओ, न्यूड गाणी, पांचट जोक्स आणि प्रसंगी पोर्न पाहणं हे बऱ्यापैकी आम असतं. आहे.
आणि मुलांपेक्षा त्यांची प्रतिमा सोबरअसल्यानं त्यांचे मोबाइल तपासले जात नाहीत की कुणी त्यांच्या चॅट वाचत बसत नाहीत.
मात्र काही संदर्भात मुली मुलांच्या एखादं पाऊल पुढे आहेत असं एक वास्तव आॅक्सिजनच्या पत्रातून आमच्या हाती लागतं.
मुलांमध्ये शहरी, ग्रामीण असा भेद दिसत नसला, तरी मुलींमध्ये तो काही प्रमाणात आहे. ग्रामीण भागात मुलींवर अजूनही घरातल्या माणसांचे पहारे असतात. बंधन आहेतच. पण म्हणून मग एक वेणी, खाली मान अशा वाटेनं साऱ्याच जणी जात नाहीत.
काहींना थ्रिल हवं असतं, एक्साइटमेण्ट हवी असते. आणि काहींना ट्राय आउट करून पाहायचं असतं.
एका मुलीनं कन्फेशनम्हणून पाठवलेल्या पत्रात ती लिहिते, ‘तो स्वत: मला प्रपोज करेल असं मी वागले. त्यानं प्रपोज केल्यावर थोडे आढेवेढे घेऊन हो म्हणाले. मग बाइकवर फिरणं, चोरून काहीबाही करून पाहणं यात मला मजा येत होती. आपल्याही आयुष्यात असं सारं रोमॅण्टिक घडावं असं मला वाटत होतं. ते मी घडवून आणलं. मला माहिती होतं, वडील सांगतील तिथंच लग्न करावं लागेल. मी ते केलंही. तो त्याच्या वाटेनं निघून गेला. माझी कहाणी इथंच संपली. पण त्याच्याकडे काही फोटो राहिलेत माझे, त्यांची कधीमधी धास्ती वाटते.. त्यानं मला ब्लॅकमेल केलं तर..
ब्लॅकमेल केलं जाण्याच्या भीतीखाली जगणाऱ्या अनेकजणी मेल्स आणि पत्रांतून भेटतात. काही पोलीस कम्प्लेण्ट करतातही. मात्र गावभर होणाऱ्या चर्चेनं, बदनामीनं मोडूनही पडतात. 
दुसरीकडे प्रेमात पडून पाहणाऱ्याअनेकजणी. मुलांपेक्षा थोड्या बोल्ड. काहीशा आक्रमक. आणि आपल्या तालावर गोष्टी नाचू शकतात हे जाणणाऱ्या आणि त्या घडवणाऱ्याही..
रोजच्या नियमांनी बांधलेल्या आयुष्यात एक फट किलकिली करून त्या हे रोमॅण्टिक आयुष्य जगून घ्यायचा प्रयत्न करतात.
स्पर्शाची सहजता स्वीकारतात. मुलामुलींमध्ये वावरण्याचा मोकळेपणा मान्य करतात. सहज स्वीकारतात. आणि प्रसंगी आम्ही फक्त मित्र आहोत असंही म्हणतात..
ग्रामीण भागापेक्षा शहरी मुलींची अवस्था थोडी बरी आहे. त्यांच्या आयुष्यात मोकळीकआहे. निर्णयस्वातंत्र्यही आहे. आणि घरानं मुलगा-मुलगी मित्र असतात, त्यांचे ग्रुप्स असतात हे मान्य केलं आहे. पण तेच ग्रुप आता व्हॉट्सअ‍ॅपवर जाऊ लागले आहेत..
काही मुली बोल्डआहेत हे ओळखून त्यांना त्या ग्रुपमध्ये एण्ट्री दिली जाते. ग्रुपवर प्रत्येकाची/प्रत्येकीची नावं बदलली जातात. आणि मुलींना झेपेल इतपत चावटचॅट या ग्रुपवरही सुरू होतात.
एरवी हे मुलंमुली चांगले मित्र असतात, प्रत्यक्षात भेटत असतात. प्रेमाबिमात पडलेले नसतात परस्परांच्या. मात्र या ग्रुपमध्ये राहण्याची आणि त्याहून हॅपनिंग ग्रुपमध्ये शिरण्याची चढाओढ मुलींमध्येही लागलेली दिसते.
पण या ग्रुपच्या पलीकडे या मुलींच्या जगात काय घडतं?
नुस्तं पाहून काय उपयोग?
तरुण मुलग्यांना अनेक गोष्टी पाहूनच एक्साइटमेण्ट वाटते. त्यापुढचं पाऊल म्हणजे चर्चा आणि चावट गप्पा.
मुलींना मात्र स्वभावत: असं नुस्तं पाहून काही फार एक्साइटमेण्ट वाटत नाही. त्यांना प्रत्यक्ष कृती असं काही हवं असतं.
मग अनेक मुली व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स आणि चॅटवर तासन्तास गप्पा मारत राहतात. गप्पांचा विषय एकच- सेक्स’, दिसणंबिसणं, स्वत:चं आणि इतरांचंही.
आणि त्यापुढे जाऊन रोमान्स अनुभवणं. त्यात हे सारं करायला सोबतचे मित्र भरीस घालतात. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात. सिनेमात दाखवतात ते बेफिक्रंजग अनेकजणी जगू पाहतात, निदान त्या मोहात पडतात.
काहीजणी फसतात त्या याच टप्प्यावर.
अनेकदा आधी स्वेच्छेनं ज्या गोष्टी केल्या जातात त्या एका टप्प्यानंतर नकोशा होतात. किंवा आपण अडकत चाललो आहोत किंवा अडकवले जात आहोत हे लक्षात येतं.
आणि मग प्रसंगी या प्रकरणी पोलिसांची मदत घ्यावी लागते. आणि घरच्यांनाही सांगावंच लागतं जे घडतं ते. उत्सुकता, अज्ञान आणि शरीरसंबंध ते कामजीवन यासंदर्भातल्या शास्त्रीय माहितीचा अभाव यातून काही मुलीही एक्सपिरीमेण्टकरून पाहतात.
दुर्दैवानं काहीजणींना त्याची बरीच मोठी किंमत मोजावी लागते. आणि काहीजणी मात्र ब्लॅकमेलिंगला बळी पडतात. सतत दबावाखाली जगतात.
एक मोठं आकर्षण
मुलींच्या संदर्भात सध्या एक मोठं आकर्षण म्हणजे सोशल मीडियात म्हणजेच फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर होणाऱ्या अनोळखी लोकांशी ओळखी.. दोस्ती.
एरवी आपल्या आवडीनिवडी समान असणारे किंवा भन्नाट जगणारे फार कमी लोक आपल्या प्रत्यक्ष वर्तुळात भेटत. पण आता ते जग कित्येकपट या सोशल मीडियानं विस्तारलं.
आणि त्यातून अनेकींच्या प्रत्यक्ष न भेटताही ओळखी होऊ लागल्या. गप्पा रंगू लागल्या.
शेअरिंग वाढलं. जे घरात कुणाशीही बोललं जात नाही ते तिथं बोललं जातं.
आणि मग अनोळखी, अजनबी चेहऱ्याच्या त्या व्यक्तिमत्त्वाचा आधार वाटू लागतो. असा आधारही अनेकजणींना फार महत्त्वाचा वाटतो.
काहींची फसगत होते तीही याच टप्प्यावर.
मुलींच्या जगात मोठी खळबळ निर्माण करणारे आणि त्यांच्याही नकळत त्यांना उत्सुकतेच्या तोंडाशी उभे करणारे हे दिवस आहेत.
- आॅक्सिजन टीम
कोण असतात हे?

·         त्यातले मुलगे
बोलायचंय खूप, पण बोलायला कुणी नाही, सल्लाबिल्ला नको मला, फक्त ऐकून घ्या..
अशी प्रस्तावना करतच आलेलं पत्र आणि ईमेल वाचायला सुरुवात केली. एक गोष्ट आता आॅक्सिजनटीमलाही प्रकर्षानं जाणवते. अगदी पाचेक वर्षांपूर्वी पत्रात सुरुवातीलाच विनंती असायची की, मला मार्गदर्शन करा. मदत करा. मार्ग सांगा.
आता लिहिणारा तरुण पहिल्याच ओळीत सांगून टाकतो की, ‘मला सल्ला नको आहे, माझं मी करीन सॉर्ट आउट, पण कुणाला तरी हे सांगून मन मोकळं करायचं म्हणून तुमच्याशी शेअर करतोय..
हे वाचल्यावर पहिला प्रश्न हाच मनात येतो की, सल्ला-मदत नको- मार्गदर्शन तर त्याहून नको म्हणजे आपली वाट आपण शोधू किंवा ती सापडेल हे या तरुण मुलांना पक्कं माहिती आहे. म्हणजेच घरीही पालक किंवा शिक्षक, मित्र किंवा भाऊ यांच्याकडून ते सल्ल्याची अपेक्षा ठेवत नाहीत.
पोकळी आहे ती फक्त त्यांची आपबिती ऐकून घेण्याची..
आणि मग विषय जर नाजूक असेल तर तोंड उघडावं आणि मनातलं सांगावं अशा जागा त्यांच्या आयुष्यात नाहीतच...
आणि समस्येला सुरुवात याच टप्प्यातून झालेली दिसते..
पोर्न पाहणं ही तरुणच नाही तर शाळकरी मुलांमध्येही आम बात आहे. त्यात भयानकअसं या तरुण मुलांना काही वाटत नाही.
आणि शहरात राहणारी मुलंच असलेउद्योग करतात असं तर अजिबात नाही. खेड्यातच नाही, पाड्या-वस्तीत राहणाऱ्या मुलांच्या मोबाइलमध्येही असा गरम मसालाभरलेला असतो.
गरम मसाला दे ना तुझ्याकडचा!
मसाला डिलीट मारला रे, नवा भरायचाय!
- ही वाक्यं शहरात आणि ग्रामीण मुलांच्याही त्यापरिभाषेत आम आहेत. पोर्नच कशाला, सेन्सॉर्डने सिनेमात न दाखवलेले अनसेन्सॉर्डसिन्स, गाणी, न्यूड हे सारंही त्यांच्याकडे सहज असतं. आणि सिनेमात जे नाही त्याची देवाणघेवाण ही जास्त जोमानं होते.
मात्र ही मुलं आमच्याशी जे शेअर करतात, त्यात एक दिसतं की हा आनंद फक्त पाहणं आणि परस्परांत लेटेस्ट देवाणघेवाण एवढ्यापुरताच मर्यादित नसतो. म्हणजे या टप्प्यातला आनंद हा फार व्यक्तिगत आणि क्षणिक असतो.
खरा आनंद आहे तो जगजाहीर चर्चेत.
आणि त्यासाठीच बनलेले डर्टी टॉककरणारे गरमागरम व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप. आणि मग अनेकांमध्ये चढाओढ लागते आपण जे पाहतो ते तिथं शेअर करण्याची, त्यावर चर्चा करण्याची आणि त्या चर्चेची चटक लागण्याची. ओन्ली बॉईज असेच अनेकदा हे ग्रुप्स असतात. आणि त्यावर जी चर्चा चालते ती मिटक्या मारत वाचणं, बोलणं हा अनेकांच्या त्याआनंदाचा भाग असतो..
हे सारं एकीकडे असं सुरू असताना दुसरीकडे प्रत्यक्षातही मर्द बनम्हणत प्रेमात पडण्याचा दबाव असतो. जो जितकी जास्त लफडी करतो, तो तितका पॉप्युलर. आणि मग तिलाजिथं कुठं फिरायला नेऊ तिथं जे घडतं (किंवा जे घडलेलंच नसतं) त्याची बढाचढाके वर्णनं दोस्तांना ऐकवली जातात..
आणि त्यातून आपण कसे मॅनलीआहोत, कुठल्याही मुलीला कसे घोळात घेऊ शकतो असा भ्रम पाळला जातो.
अलीकडेच एका तरुणाची मेल आली. तो लिहितो, ‘मी प्रेमात पडलो, खरंच पडलो. टाइमपास नाही. पण माझे मित्र म्हणतात की तुझे तिच्यासोबतचे फोटो टाक ग्रुपवर. खूप मागे लागलेत. मी नाही म्हणालो तर ते आता मला छळताहेत, तिच्या घरी जाऊन सांगू म्हणताहेत.
या मित्रासारखा अनुभव अनेकांचा. अमुक एका ग्रुपच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये शिरण्यापासून प्रत्यक्ष ग्रुपमध्ये शिरण्यापर्यंतच्या टप्प्यात आपली बेधडक मर्दानगी अशी अनेकांना सिद्ध करावी लागते. काहीजण ते आनंदानं, स्वेच्छेनं करतात. त्यांच्या दृष्टीनं सारं दोन घटका टाइमपास असतो.
मात्र या टाइमपासमध्ये अजून एक भयानक गोष्ट दिसते..
पहिली म्हणजे आपण जे पाहतोतसं आपल्या गर्लफ्रेण्डनं करावं, निदान करू द्यावं अशी अपेक्षा.
दुसरी त्याहून गंभीर म्हणजे वयानं पाच-दहा वर्षे मोठ्या महिलेशी संबंध जोडून अनुभवीआनंद मिळवण्याची धडपड...
आॅक्सिजनला येणाऱ्या पत्रांत अनेक तरुण आपण या वाटेनं जात असल्याचं आणि त्यात अडकल्याचं स्पष्ट लिहितात..
सांगतात, की पूर्वी पत्रं फाडून टाकता येत होती. आता हा मोबाइल डाटा आपण डिलीट केला तरी डिलीट झालेला नसतो. अनेकदा त्यातून मुलीही ब्लॅकमेल करतात, पोलिसांपर्यंत प्रकरण जाते असेही अनुभव बरेचजण लिहितात.
खरंखोटं काहीही असो, अनेकदा आपण यात अडकलेलो आहोत हे या मुलांना फार उशिरा कळतं, आणि जोवर काही त्रास होत नाही तोवर ही गंमत चालूच राहते..
आणि घरच्यांना हे कळतही नाही.
जेव्हा कळतं, तेव्हा अनेकदा पोलीस दारात उभे असतात.
पचका आणि भीती
हे सारं जी मुलं शेअर करतात आमच्याशी, ते तरी का करतात?
तर एक तर त्यांना आतून भीती वाटत असते की आपण पकडले जाऊ. दुसरी भीती आपल्याला प्रत्यक्ष तसं काही करणंच जमणार नाही. तिसरी भीती सतत स्वत:च्या हातानं शरीराशी चाळा केल्यानं आपली शक्ती कमी होते असं मित्रांनी दिलेलं ग्यान.
आणि त्यातून जर हे घरी कळलं तर पचका होतो, गुड बॉयची इमेज तुटून पडते. आणि दुसरं म्हणजे जिच्याशी प्रेमप्रकरण असतं ती अनेकदा विकृतीचा ठपका ठेवते. किंवा मग ते नातंच नासतं या साऱ्यातून..
त्यातून मग डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, व्यसनं, अभ्यासातली अधोगती हे सारं चक्र फिरायला लागतं आणि फोकस हलतो.
या साऱ्या कहाण्या वाचताना पुन्हा पुन्हा हे जाणवत राहतं की, जे वरवर दिसतं ते या तरुण मुलांच्या गरम मसाला जगाचे नुसते चिकट तवंग आहेत..
वयात आल्यापासून तरुण होऊन गेल्यानंतरही अज्ञान, अशास्त्रीय माहिती आणि वरवरची एक्साईटमेण्ट या टप्प्यातच अनेकजण अडकून पडतात.
काही मनानं अडकलेली असतात, तर काही कायद्यानं अडकतात.
आणि मग वर्तमानपत्रात बातम्या होऊन झळकतात..
- आॅक्सिजन टीम
आॅनलाइन टाइम्पास नव्हे, गंभीर गुन्हा

·          - बाळसिंग राजपूत अधीक्षक, राज्य सायबर गुन्हे

प्रेमात पडलेले दोघे. त्या दोघांनी मिळून आपल्या खासगी क्षणांचं शूटिंग केलेलं असतं. पण नंतर दोघांपैकी एक (किंवा मुलगा) ब्लॅकमेल करत असेल आणि मुलीनं सायबर कायद्याची मदत घेतली तर काय होऊ शकतं?
* आपले खासगी व्हिडीओ अथवा फोटो काढून कुणी धमकी देत असेल, तर तो कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे आयटी अ‍ॅक्टबरोबरच त्याच्यावर भादंवि कलमान्वयेही कारवाई होऊ शकते. * अशा प्रकरणात घाबरून न जाता जवळच्या कुठल्याही पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी. न्यायालयाच्या आदेशामुळे यात मुलीची ओळख उघड केली जात नाही. त्यामुळे तक्रार केल्यास प्रसारमाध्यमांमध्ये माहिती जाईल, आपले नाव समोर येऊन आपली बदनामी होईल ही भीती मुलींनी मनातून काढून टाकावी. कारण याच भीतीमुळे मुली तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. * कुणालाच या प्रकरणाबाबत कळू नये म्हणून तसे पत्रही न्यायमूर्तींना देता येऊ शकते. म्हणजे ती माहिती कुणाला कळत नाही. पुढे न्यायालयात खटला उभा राहिला तरीही आपला जबाब सर्वांसमोर न घेता इन कॅमेरा देता येऊ शकतो. तशी व्यवस्था कायद्यानं करण्यात आलेली आहे. * यात अल्पवयीन मुलींचा समावेश असल्यास आयटीअ‍ॅक्ट, भादंविसह पॉस्को कायद्यान्वये कारवाई करण्यात येते. आरोपीला तीन ते पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते, तर भादंविनुसार शिक्षेचे स्वरूप वाढते. * फेसबुकवरून व्हिडीओ व्हायरल केल्याचं समजलं तर आपल्या स्वत:च्या फेसबुकच्या सेटिंगमध्ये जाऊन फेसबुकला त्याबाबत कळवावं. त्यांच्याकडून असे व्हिडीओ ब्लॉक करण्यात येतात. शिवाय पोलीसही संबंधित सोशल साइटला याची माहिती देतात. व ते साइटवरून काढून टाकले जातात. त्यामुळे व्हायरल झालं तर काय याची भीती न बाळगता पोलिसांची मदत जरूर घ्यावी.
फेसबुक अकाउण्ट हॅक झालं किंवा कुणी आपल्या नावानं फेक अकाउण्ट उघडलं तर तक्रार कुठं करायची?
* आपलं फेसबुक अकाउण्ट हॅक झाल्याचं समजताच आपण फेसबुकसेटिंगमध्ये जाऊन त्यात हॅकिंग, पायरसी असे विविध आॅप्शन असतात त्यापैकी हॅकिंगवर क्लिक करून याची तक्रार फेसबुकला द्यावी, जेणेकरून फेसबुक ते अकाउण्ट ब्लॉक करेल. * आपलं नाव आणि फोटोचा वापर करून आपल्यासारखीच माहिती कोणी शेअर करत असल्यास त्याबाबतही फेसबुकला कळवावं. किंवा कोणी चुकीचा मेसेज शेअर केला असेल तर तोही त्यावरून त्वरित हटविण्यात येतो. * त्यानंतर संबंधितांनी कोणत्याही पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करावी. त्यांना तत्काळ मदत मिळते आणि ते अकाउण्ट कुणी हॅक केलं याचा पोलीस तपास करतात.
आपले फोटो कुणी मॉर्फिंग करून व्हायरल केले तर काय करायचं? तसं करणाऱ्याला काय शिक्षा होऊ शकते? *
फोटो मॉर्फिंग करणं हा गुन्हा आहे. किंवा ते कोणी व्हायरल करून वैयक्तिक प्रतिमेला हानी पोहचवत असतील तर त्यांच्यावर विविध कलमान्वये कारवाई करण्यात येते. * या प्रकरणात आयटी अ‍ॅक्टबरोबरच विनयभंगाचाही गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच आयटी अ‍ॅक्टमध्ये तरुणींसंबंधात पुढील कलमांनुसार ६६ (अ), ६६ (ब), ६६ (सी), ६६ (डी) आणि ६६ (ई) कारवाई केली जाते. * ही सारी गंभीर कलमं आहेत त्यामुळे तसं करणाऱ्याला जबर शिक्षा होऊ शकते.
कुणी आपल्याला सतत घाणेरडे व्हिडीओ लिंक्स पाठवत असेल तर काय करायचं? कुठं तक्रार करायची?
* आपली इच्छा नसताना कुणी आपल्याला घाणेरडे व्हिडीओ लिंक्स अथवा अश्लील मेसेज पाठवत असेल, त्यामुळे आपल्या मनात लज्जा उत्पन्न झाल्यास तो प्रकार विनयभंगात मोडतो. त्यामुळे थेट विनयभंगाचाच गुन्हा संबंधितावर दाखल होऊ शकतो. * फक्त हात पकडून अथवा अश्लील चाळ्यांबरोबर एकटक पाहणं अथवा अशा स्वरूपाचे व्हिडीओ पाठविणाऱ्यांवर विनयभंगाच्या गुन्ह्यांनुसार कारवाई केली जाते. शिवाय आयटी अ‍ॅक्ट ६६ ई प्रमाणे कारवाई करण्यात येते. * त्यामुळे संबंधितांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार करावी. विनयभंगाचा गुन्हा संबंधितावर दाखल झाल्यास त्याला कडक शिक्षा होते. * कुणालाही असे मेसेज किंवा लिंक्स पाठवताना काळजी घ्या. ज्याला/जिला तुम्ही हे मेसेजेस पाठवत आहात, त्याला/तिला ते नको असतील तर तो गंभीर गुन्हा आहे.
आपल्या व्यक्तिगत चॅटचे किंवा मतांचे कुणी स्क्रीनशॉट घेऊन ठेवले असतील आणि त्यावरून ब्लॅकमेल करत असेल तर काय करायचं?
* एकमेकांच्या स्क्रीनशॉटबाबत फक्त तक्रार असेल तर ते दोघेही एकमेकांविरुद्ध तक्रार करू शकतात. * मात्र जर दोघांपैकी एक जण त्या स्क्रीनशॉटवरून ब्लॅकमेल करत असेल तर तो गुन्हा आहे. त्यावर आयटी अ‍ॅक्ट बरोबर भादंवि कलमानुसार कारवाई होऊ शकते. * त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हाही दाखल होतो. त्यामुळे कुणी आपल्या आॅनलाइन मतांचे स्क्रीनशॉट्स घेऊन आपल्याला धमकावत असेल तर घाबरून न जाता पोलिसांकडे जाणं उत्तम.
मॉर्फिंग, हॅकिंग, आॅनलाइन छेडछाड असे गुन्हे करणाऱ्यांना काय शिक्षा होऊ शकते?
* आयटी अ‍ॅक्टनुसार या प्रत्येक तक्रारीसाठी गुन्हेगारांना ३ ते ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते, तर भादंवि कलमांची वाढ झाल्यास ती शिक्षा गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार ५ ते १० वर्षांपर्यंत पोहचू शकते. * हा आॅनलाइन टाइमपास आहे, पोलीस काही करणार नाहीत असं कुणी समजू नये. कारण नुस्ता आयटी अ‍ॅक्ट नव्हे, तर अन्य कायदेही इथं काम करतात. आणि त्याद्वारे शिक्षा होऊ शकते.
प्रत्येक शहरात सायबर सेल असतात का? त्यांचे काही नंबर, हेल्पलाइन्स आहेत का?
* सद्यस्थितीत पोलीस मुख्यालयानुसार एक सायबर सेल असे एकूण ४३ सायबर सेल सध्या राज्यात कार्यान्वित आहेत. * याव्यतिरिक्त येत्या काही दिवसांत स्वतंत्र अशा सायबर पोलीस ठाण्यांची सुरुवात होणार आहे. त्याचा प्रस्तावही संमत झाला आहे. * त्यामुळे सायबरशी संबंधित असलेली कुठलीही तक्रार थेट सायबर पोलीस ठाण्यात करता येऊ शकेल. * पण सायबर सेल नसेल तर नेहमीच्या पोलीस ठाण्यात जाऊनही तक्रार नोंदवता येऊ शकते.
सायबर कायदा हा कार्यरत आहे आणि त्यानुसार गुन्हेगाराला खरंच गंभीर शिक्षा होते का? मुळात अशा गुन्ह्यांपासून स्वत:चा बचाव कसा करायचा?
* गुन्हेगारांना तत्काळ शिक्षा व्हावी म्हणून सायबर कायदा त्याची दक्षता घेतो. * वाढत्या सोशल नेटवर्किंगच्या जाळ्यामुळे प्रत्येक जण अपडेट राहायला बघतात. मात्र अशावेळी आपण काय करतो याचे भान त्यांना राहत नाही. मुळात सोशल मीडियावर अपडेट राहताना आपण काय, कोठे आणि किती शेअर करत आहोत याचं भान ठेवणं गरजेचं आहे. * आपण पोस्ट केलेला फोटो, माहिती कुणापर्यंत पोहोचावी याचेही आॅप्शन संबंधित साइट्सवर असतात. ते वापरायचे कसे हे शिकून घ्या. * विशेषत: मुलामुलींनी याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या तक्रारी वाढत आहेत. * अनेकदा मित्रमैत्रिणी एकत्र सेल्फी घेतात आणि पोस्ट करतात. किंवा अनेकदा दोघांमधील वैयक्तिक क्षणांचं चित्रण करतात. फोटो काढतात. आणि कुठे थोडी दरी निर्माण होताच याचाच फायदा घेत पुढे गुन्हे घडतात. * होता होईतो स्वत:चा खासगी फोटो, व्हिडीओ पोस्ट करणं टाळा. * अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंग करणं, आपली वैयक्तिक माहिती शेअर करणं टाळा. एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री करत असाल तर त्याची आधी माहिती काढा. * मोफत मिळणारा वायफाय वापरणं बंद करा, कारण यातूनच आपली माहिती शेअर होते. मोफत-ओपन वायफाय वापरू नका. * फेसबुकचा पासवर्ड सतत बदलत राहा. कुणालाही आपले पासवर्ड सांगू नका. * चॅटिंग करताना त्याचा बॅकअप ठेवत जा. मेल अथवा अन्य ठिकाणी तो सेव्ह करून ठेवा. पुढे काही तक्रार आल्यास त्याचा फायदा त्याच्याविरुद्ध सबळ पुरावा म्हणून होतो. थोडीशी काळजी घेतल्यास आपण या सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यातून नक्कीच स्वत:ला वाचवू शकतो. * आणि एवढं करून गुन्हा घडल्यास सायबर कायद्यान्वये आणि भारतीय कायद्यान्वये आरोपीला शिक्षा होते, यावर विश्वास ठेवून तक्रार करा.
किरकोळ चूक नव्हे, गंभीर गुन्हा
वाढत्या नेटवर्किंगमध्ये अपडेट राहण्याच्या नादात आपण काय, कोठे, किती आणि कुणाला शेअर करतोय याचं अनेकांचं भानच हरवत चाललं आहे. कोवळ्या वयात जुळलेले शारीरिक संबंध, त्यातून होणारी शेअरिंग, केअरिंग पुढे थोड्याशा अंतरानं नकोशी होते. त्यातूनच पुढे कायद्याची पायरी चढण्याची वेळ ओढावते. फसवणूक झालेल्या अनेकांना योग्य मदत मिळावी म्हणून पोलीस सध्या अनेक उपाययोजना राबवत आहेत. लैंगिक शिक्षणाबरोबरच अशा गुन्ह्यांचे दुष्परिणामही मुलांपर्यंत पोहचविण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत आहे. मुलामुलींचा पोलिसांबाबतचा आदर वाढावा म्हणून मुंबई पोलिसांकडून पोलीस दीदीहा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत शाळकरी मुलांना महिला पोलीस ताईच्या भूमिकेत मार्गदर्शन करत आहेत. मात्र तरीही मुलांनी अधिक सजग होऊन शेअरिंग करावं, असं पोलीस सांगतात. कारण चूक किरकोळ वाटत असली तरी तो गंभीर गुन्हा असू शकतो. आणि अश्लील मेसेज लिंक पाठवली तरी विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल होतो, हे तरुणांनी लक्षात ठेवायला हवं.
१०० या क्रमांकावर फोन करून तुम्ही पोलिसांची मदत चोवीस तास मागू शकता. आणि सायबर गुन्ह्याची तक्रारही नोंदवू शकता. आपली माहिती उघड करू नये अशी विनंती केली तर पोलीस ती करत नाहीत, अशी तरतूदही कायद्यात आहे.
१०३ मुलींना/स्त्रियांना मदतीसाठी आणि तक्रार नोंदवण्यासाठी ही पोलिसांची हेल्पलाइन आहे. तिथे सायबर गुन्ह्यांविषयी तक्रार नोंदवली जाऊ शकते.
प्रतिसाद pratisad पोलिसांचं अ‍ॅप डाउनलोड करून घ्या. या अ‍ॅपद्वारेही तुम्ही तक्रार करू शकता, मदत मागू शकता.
(शब्दांकन - मनिषा म्हात्रे)
...असं होतं तेव्हा?

·         देव डी या सिनेमामधला नायक लग्न ठरलेल्या मुलीकडे पूर्ण नग्न फोटो पाठव अशी मागणी करतो. अशी मागणी किंवा विशिष्ट कपड्यांतले फोटो काढून पाठवण्याची मागणी अनेकजण प्रेमात पडलेले/लग्न ठरलेले तिच्याकडे करतात. त्यालाकसं दुखवायचं म्हणून रोमान्सच्या नावाखाली तसे फोटो पाठवण्याची जणू सक्तीच होते.
पण खरंच तसे फोटो पाठवावेत का? आणि पाठवलेच असतील तर?
- कितीही जुनाट वाटत असलं तरी असे नग्न किंवा उत्तान कपड्यांतले, अंतर्वस्त्रातले फोटो काढून कुणालाही पाठवू नये. एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरीही, कुणी कितीही इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि तुझा माझ्यावर विश्वासच नाही असा आरोप केला तरीही! 
नाहीम्हणायला शिकणं, हा पहिला टप्पा.
वाढदिवस पार्टीत परस्परांना किस करतानाचे सेल्फी काढले जातात, मित्रमैत्रिणी फोटो काढतात. ते जवळच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रु्रपमध्ये शेअर केले जातात. आपले सेन्शुअस फोटो टाकण्याची आवाहनं ग्रुपमध्ये होतात. तिथं फोटो टाकले जातात. ते व्हायरल होतात. फिरत राहतात.
त्यामुळे कुणी कितीही आग्रह केला तरी आपले सभ्यसंकेतात न बसणारे कुठल्याच प्रकारचे फोटो कुणाला काढू देऊ नये, आपण स्वत:ही काढू नयेत.
ते दोघं प्रेमात आहेत. त्यातला तोस्वत:च्या खासगीक्षणांचे व्हिडीओज्, फोटो तिला सतत पाठवतो. त्यात मर्दानगी आहे, डेअरिंग आहे आणि आनंद आहे असंही सांगतो. अशावेळी तिनं काय करावं?
- हे असंकाही पाठवू नकोस, त्यात मला रस नाही, असं काही केलंस तर मला हे नातं तोडावं लागेल, असं त्याला स्पष्ट शब्दात ठामपणे सांगावं. आणि तो तसा वागला नाही तर प्रसंगी ते नातं तोडण्याची मानसिक तयारीही करावी.
मात्र त्यापूर्वी हे तपासून पाहावं की, अशा प्रकारच्या क्लिप्स आणि फोटो त्यानं यापूर्वी कुणाला पाठवले आहेत का? त्यासंदर्भात त्याच्याशी मोकळेपणानं बोलावं. स्वत: बोलणं शक्य नसेल तर विश्वासातल्या डॉक्टरकडे, मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जावं. कारण अशा क्लिप्स पाठवणं ही विकृती आहे असं थेट सर्रास म्हणता येत नसलं तरी ती सवय असू शकते. आणि त्यातून काही मानसिक डिसआॅर्डर निर्माण झालेली असू शकते. 
हे सारं योग्य उपचार, कौन्सिलिंगनं बरं होऊ शकतं. पण त्यासाठी त्या व्यक्तीशी संवाद साधून त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली पाहिजे.
तो असं वागूच कसं शकतो, या धक्क्यातून सावरून या प्रश्नाकडे पाहता येऊ शकतं.
ती दोघं प्रेमात पडतात, मनानंच नाही तर शरीरानंही जवळ येतात. पण पटत नाही, भांडणं होऊ लागतात. अशावेळी ते नातं तोडावंसं वाटतं; पण जवळिकीचेफोटो, व्हिडीओ असतात. ते दाखवून दडपण वाढवलं जातं. अशावेळी काय करावं?
- हे सांगणं पुन्हा जुनाटच वाटेल. पण तुम्ही प्रेमात पडलेले आहात असं वाटतं म्हणून लगेच सर्व प्रकारच्या जवळिकीची परवानगी संबंधित व्यक्तीला देणं टाळा(च). पूर्ण विचार करून, आपण हे नातं निभावू शकतो का, याचा निर्णय झाल्यानंतरच बाकीच्या जवळिकीचा विचार करा. त्यातही प्रत्येक गोष्टीचे फोटो कुणी काढत असेल तर गांभीर्यानं आणि दरवेळी न चुकता नकार द्या. त्या नकारावर ठाम राहा. आपल्या खासगी क्षणांचं असं चित्रण करणाऱ्या, अगदी फोटो काढणाऱ्याचाही संशयच यायला हवा. त्यामुळे एकतर नाहीम्हणा..
आणि योग्य वेळ येईपर्यंत थांबा.
दुसरी गोष्ट कुणी दडपण दाखवून ब्लॅकमेल करत असेल तर थेट घरच्यांना, निदान ज्याच्यावर विश्वास ठेवता येईल अशा मित्र-मैत्रिणीला सांगा. पोलिसांत जा. बदनामीची भीती वाटणं साहजिक आहे. पण रोज त्रास सहन करण्यापेक्षा यातून बाहेर पडणं हाच एकमेव योग्य मार्ग.
अनेकजणी ब्लॅकमेल होत असतानाही भावनिक गुंतवणूक म्हणून ते सहन करतात, आणि त्यातून अत्यंत गंभीर परिणामांना त्यांना सामोरं जावं लागतं.
कुणी ब्लॅकमेल करत असेल तर निर्णय भावनिक होऊन नव्हे, तर जास्तीत जास्त विचारपूर्वक आणि प्रॅक्टिकल होऊन घ्या.
फोनमैत्रीच्या जाहिराती सरसकट दिसतात, प्रसिद्ध होतात. त्यावर एकदा फोन करून पाहू म्हणत अनेकजण त्या फोनच्या चावट बोलण्याच्या जाळ्यात आणि पुढे अन्य गर्तेत फसतात, असं होतं तेव्हा?
- आपल्या जवळच्या माणसांना तरी हल्ली आपल्याशी आपण बोलू तेव्हा बोलायला वेळ असतो का?
मग एक फोन फिरवून ओळखीची ना पाळखीची व्यक्ती (महिला?) आपल्याशी का बोलेल
पण तरी असे फोन करून एकेकटे अनेकजण फसतात. त्या नादापायी सांगितलेल्या अकाउण्टला पैसे भरले जातात किंवा मग थेट फोनमधून बॅलन्स उडतो. 
या आर्थिक नुकसानीपलीकडे या फोनवरच्या चावट गप्पांची सवय हे एक सुटायला अत्यंत अवघड असं व्यसन आहे, हे विसरू नका. 
त्यात तुम्ही गुरफटला असाल, तर समस्या वेगळीही असू शकते. आत्मविश्वास नसण्याची, घेरून आलेल्या नैराश्याची किंवा एकटेपणाची.
- त्याकडे बारकाईने पाहा.
तुम्हाला मानसोपचाराची गरज आहे, चावट सल्ल्यांची नाही, असं समजा.
फेसबुकवर एखाद्या ग्रुपमधून जेव्हा एखाद्या खास पार्टीचं आमंत्रण येतं, तेव्हा ते स्वीकारावं का?
- नाही. अजिबात नाही.
माहिती नसलेल्या आणि फक्त व्हर्च्युअल ओळख असलेल्या माणसांकडून पार्टीचं कितीही आग्रहाचं आमंत्रण आलं तरी ते स्वीकारू नये. केवळ रेव्ह पार्टीचंच ते आमंत्रण असेल असं नव्हे, तर पैशाबाबत फसवणूकही होऊ शकते.
आणि दारू, ड्रग्ज यासह गंभीर चक्रात तुम्ही अडकू शकता.
त्यामुळे अनोळखी व्यक्तींसह आणि आपले मित्र आग्रह करत असले तरी अशा पार्ट्यांच्या मोहात न पडणं उत्तम!
कुणी तरी अश्लील मेसेज पाठवतो तेव्हा, जवळचा कुणी आपले फोटो व्हायरल करतो तेव्हा, इंटरनेट बुलिंगचे शिकार होतो आहोत असं वाटतं तेव्हा काय करावं?
- फार गंभीर असेल प्रकरण तर तडक पोलिसांत जावं. सायबर पोलिसांकडे. नाहीतर पालकांशी बोलून समक्ष त्या व्यक्तीला दम द्यावा.
पण प्रकरण मिटलं म्हणून इथंच न थांबता मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला, प्रसंगी औषधं घ्यावी. कारण मानसिक धक्क्यातून सावरणं सोपं नसतं. आणि या साऱ्या प्रकरणातून जो मनस्ताप होतो, त्यातून आत्मविश्वास गमावण्यापेक्षा उपचार घेतलेले उत्तम.
अनेकजण अनेक व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुक ग्रुप्सचा भाग असतात. गप्पांच्या ओघात वाहवत जातात. तिथं काहीबाही अश्लील बोलून बसतात. आणि मग ते बोलणं अनेकदा व्हायरल होतं, लोक स्क्रीनशॉट काढून ठेवतात, आणि त्यावरून टर उडवली जाते. खूप अपमान केले जातात, ज्याला आजच्या भाषेत बुलिंग म्हणतात. असं झालं तर काय करावं?
- एकतर कितीही जिवाभावाच्या माणसांचा ग्रुप असो, आॅनलाइन कमी बोला. आणि सभ्य भाषेतच बोला.
पण तरीही आपण बोललेलं अश्लील काही व्हायरल झालं किंवा त्याचे स्क्रीनशॉट काढून कुणी आपल्याला छळत असेल, टॉर्चर करत असेल, पैसे मागत असेल तर सायबर पोलिसांकडे मदत मागा. तक्रार करा. सायबर बुलिंग हा गुन्हा आहेच, संबंधित व्यक्तीला शिक्षा होऊ शकते.
घाबरून जाण्याला पर्याय आहेत आणि मदत मागता येऊ शकते, हे लक्षात ठेवा.
सेक्सटिंग असा शब्द अनेकांच्या आयुष्यात सध्या घुसला आहे. काहीजण तर रोज तसे मेसेजेस पाठवतात, वाचतात. आणि आपल्या बॉयफ्रेण्ड/गर्लफ्रेण्डलाही सतत सेक्सटिंग करतात. त्याचं व्यसन लागतं, अशावेळी...
- एकतर असे सेक्स मेसेज, फोटो कुणाला पाठवले आणि त्यानं जर तक्रार केली तर लक्षात ठेवा की, तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. शिक्षा होऊ शकते..
त्यामुळे आपण सेक्सटिंग करतोय म्हणजे गंभीर गुन्हा करतोय हे आधीे समजून घ्या.
दुसरं म्हणजे सेक्सटिंग हे व्यसन आहे. आणि ते जालीम आहे, जीवघेणं आहे. त्यातून तुमचा आत्मविश्वास तर कमी होईलच; पण जगण्यावरचा फोकसही हलेल..
त्यामुळे सेक्सटिंग करत असाल तर वेळीच सावध व्हा. हे उद्ध्वस्त करणारं व्यसन आहे.
पिवळी पुस्तकं वाचणं, पोर्न पाहणं, त्यातून उत्तेजित होणं सुरू होतं; पण त्यापुढे जाऊन शारीरिक त्रास सुरू होतात, जे गंभीर असतात. अशावेळी डॉक्टरकडे न जाता ते लपवले जातात. तसं केलं तर परिणाम भयानक होतात, तेव्हा..
- उत्तेजित होणं अनैसर्गिक नाही; पण त्यापायी स्वत:वरच काहीजण प्रयोग करतात. काही इतरांना त्रास देतात किंवा त्यापायी चुकीची माहिती मिळवून ते स्वत:च्या संदर्भात वापरतात. स्वेच्छेनं, पण अवेळी ठेवलेल्या संबंधातून मुलींनाही त्रास होऊ शकतो. रक्तस्त्राव होतो, वेदना होतात. युरीन इन्फेक्शन, जंतुसंसर्ग, पोटात दुखणं असं होत असेल तर ते लपवू नये. डॉक्टरांकडे त्वरित जावं.
लपवून ठेवल्यानं हे आजार वाढतात.
कायदा काय सांगतो?
Description: http://ddon2p0nm9l3g.cloudfront.net/gall_content/2017/01/11/2017-01-11~poscocopy_ns.jpg
·         एवढं काही नाही त्यात, पाठवली एखादी अश्लील लिंक आॅनलाइन तर काही मोठा गुन्हा नाही. कोणी लगेच फासावर चढवणार नाही, असं मित्र सांगतात, ते अनेकांना खरं वाटतं.
चावट, अश्लील एसएमएस, लिंक्स पाठवल्या तर कुणाला कळणार आहे, कोण काय वाकडं करणार लगेच आपलं, असा अनेकांचा ठाम गैरसमज असतो.
पण हा गैरसमज तुम्हाला गोत्यात आणू शकतो.
विशेषत: तरुणांना. अनेक तरुण मुलं सहज गंमत म्हणून आपलं डेअरिंग सिद्ध करण्यासाठी म्हणून आॅनलाइन छेडछाड करतात. आणि त्याचे परिणाम काय होतील किंंवा काय होऊ शकतात, याची मात्र त्यांना पुरेशी कल्पना नसते.
एक चूक आपल्यावर गुन्हेगारअसल्याचा शिक्का कायमचा मारू शकते. पोलीस दप्तरी आपल्या नावाची नोंद होऊ शकते. गुन्हे केल्याचं आपलं रेकॉर्ड तयार असतं आणि ते आपली पाठ कधीही सोडत नाही, याची अनेकांना कल्पना नसते. आणि त्यामुळे त्याचं गांभीर्यही वाटत नाही.
मात्र आॅनलाइन टाइमपास वाटत असला आणि गंमत म्हणून केलेला असला तरी गुन्हा तो गुन्हाच.
कुणालाही (विशेषत: मुलींना) अश्लील क्लिप्स, फोटो, जोक्स, मेसेज पाठवले आणि त्या संबंधित व्यक्तीनं त्यावर आक्षेप घेत जर पोलिसांत तक्रार केली तर पाठवणाऱ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. अशी तक्रार मुलीनं केली तर सायबर कायद्याप्रमाणेच नव्हे तर थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि त्यानुसार न्यायालयात होणारी शिक्षा ही गंभीर असते.
यापुढचा टप्पा अधिक कठोर शिक्षांचा असतो. एकदा का गुन्हेगारी रेकॉर्ड निर्माण झालं तर साधा पासपोर्ट काढून परदेशी, शिक्षण किंवा नोकरीसाठी जाणंही अशक्य व्हावं. कारण असं गुन्हेगारी रेकॉर्ड असणाऱ्यांस पासपोर्ट मिळणंही अवघड असतं.
याशिवाय शाळा-कॉलेजात बदनामी तर होतेच, पण पुढे नोकरी मिळणंही अवघड होऊ शकतं. कारण आपल्यापर्यंतची माहिती संबंधित कंपनीत आधीच पोहचलेली असू शकते. त्यामुळेच गंमत म्हणूनसुद्धा अशा चुकाआपल्या हातून होऊ नयेत म्हणून तरुण मुलांनी अत्यंत सावध राहायला हवं! 
तरुण मुलांनी
हे विसरू नये
१) सोशल मीडिया ही अत्यंत गांभीर्यानं वापरण्याची गोष्ट आहे. तिथं आपल्या व्यक्तिगत आयुष्यातले संदर्भ, फोटो, व्हिडीओ शेअर करताना काळजी घ्यावी. आपल्या पोस्ट पब्लिकअसू नयेत.
२) गंमत म्हणून, सहज म्हणून कधीही कुणाही अनोळखी मुलीस नको ते मेसेज, लिंक्स पाठवू नये.
३) ओळखीच्या मुलींना, मैत्रिणींनाही अश्लील वाटेल असे मेसेज, फोटो पाठवू नयेत. त्यांनी तक्रार केल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.
४) मित्रमैत्रिणींचा कॉमन ग्रुप असला आणि सगळे चलता हैम्हणत असले, त्यांना चालत असलं तरी आपण कुणाचेही खासगी फोटो काढणे, ते शेअर करणे, व्हायरल करणे असे उद्योग करू नयेत. त्यासंदर्भातही शिक्षा होऊ शकते.
५) विनयभंग, ब्लॅकमेलिंग, फसवणूक असे गुन्हे दाखल होऊन कायदेशीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.
तरुण मुलींनी 
हे विसरू नये
१) कुणीही, अगदी जवळच्या वाटणाऱ्या मित्रांनीही आॅनलाइन काहीही अश्लील, वाह्यात मेसेज, फोटो पाठवले तरी त्याला प्रथम कडक शब्दांत ताकीद द्यावी. निषेध नोंदवावा. आणि नाहीच ऐकलं तर घरच्यांना सांगावं.
२) आपल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्येही उगीचच कुणी आपल्याला त्रास देतं आहे, आपले फोटो इकडून तिकडे पाठवतं आहे असं वाटल्यास त्या ग्रुपशी, व्यक्तीशी संपर्क कमी करावा.
३) आभासी ओळखीला प्रत्यक्षातली ओळख समजून त्यावर विश्वास ठेवू नये.
४) प्रत्यक्षात उत्तम ओळख, मैत्री असेल तरीही अवास्तव मागण्या, इमोशनल ब्लॅकमेल, ग्रुपमधून काढून टाकण्याची धमकी देत केलेल्या मागण्या मान्य करू नये. धोका वेळीच ओळखावा.
५) घरच्यांना आपल्या मित्रमैत्रिणींबद्दल माहिती देत राहावी. त्यांच्यापासून गोष्टी लपवू नयेत.
कायदा काय म्हणतो?
शिक्षेचं स्वरूप काय?
विनयभंग
 कलम ३५४- विनयभंग - शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न (१ ते ५ वर्षाची शिक्षा).
कलम ३५४ (बी) - विनयभंग करण्यासाठी हल्ला करणं (३ ते ४ वर्षे शिक्षा).
कलम ३५४ (सी) - महिलांना कपडे बदलताना अथवा संभोग करताना पाहणं (३ ते ४ वर्षे शिक्षा).
कलम ३५४ डी - पाठलाग करणं (हे कृत्य एकदा केल्यास, पहिल्यांदा ३ वर्षे, तर दुसऱ्यांदा केल्यास ५ वर्षे शिक्षा होऊ शकते.)
कलम ३५४ अ - शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करणं (या बळजबरीसाठी तीन वर्षे शिक्षा होऊ शकते.)
..........................
बलात्कार
कलम ३७६ - बलात्कार - सात वर्षे ते जन्मठेप इतकी शिक्षा होऊ शकते. 
कलम ३७६ (डी) - सामूहिक बलात्कार (जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.)
कलम ३७६, ३०२ - बलात्कार करून हत्या - (यासाठीही जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.)
कलम ३७७ - अनैसर्गिक अत्याचार (जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.)
***
पॉस्को कायदा
बाललैंगिक अत्याचारविरोधी प्रतिबंध कायदा असं या पॉस्को कायद्याला म्हणतात. अल्पवयीन मुले अथवा मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात या कायद्याच्या तरतुदीअंतर्गत कारवाई होते. हा कायदा अतीव कडक असून, दोषी व्यक्तीस कठोर शिक्षेची तरतूद आहे.
फसवणूक, धमकी
कलम ३०७, ३०२ - अ‍ॅसिड हल्ला करणं, तसा प्रयत्न करणाऱ्यास मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
कलम ४२० - फसवणूक, खोट्या भूलथापा देणं यासाठी १ ते ५ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.
कलम ५०९ - धमकावणं, धमक्या देऊन दडपण आणणं यासाठी तीन वर्षे शिक्षा होऊ शकते. 
कलम ३८४, ८५ - खंडणीसाठी धमकावणं, पैसे मागणं यासाठी तीन वर्षे शिक्षा होऊ शकते.
- अ‍ॅड. प्रकाश साळसिंगीकर 



No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता