Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Thursday 7 January 2016

चला, थोडे ऑफलाइन होऊया.......


'रातभर चलती रहती उंगलिया मोबाइल पर, किताब सीने पे रखकर सोये हुए जमाना हो गया...' व्हॉटस्अपवरून फिरत फिरत आलेला हा मेसेज, 'नेट' लावून जगताना आपण नेमकं काय गमावलंय हे नेमकेपणानं सांगणारा.. समजा आत्ता या क्षणापासून कॉपी, पेस्ट, फॉरवर्ड, व्हॉटस्अप, मेसेज, फेसबूक, ट्विट, स्क्रोल अशा दिवसांतून शेकडोवेळा करत असलेल्या कृती बंद झाल्या तर...? हा विचारही अनेकांना सहन होणारा नाही..

...

कान, घसा, नाक, डोके, पाठ, मेंदू, हात अशा वेगवेगळ्या अवयवांवर गॅझेट्सच्या अतिवापराने विळखा घातला आहे. झोप येत नाही, पाठ दुखते, निराश वाटतं, चिडचिड होते, रडू येतं, एकटेपणा वाढलाय, हाताला मुंग्या येतात, मान धरलीय, अशा एक ना अनेक तक्रारी घेऊन डॅाक्टरांकडे खेपा घालणारे 'नेटसॅव्ही' पेशंट वाढलेत. असंख्य वैद्यकीय तपासण्या झाल्यानंतर डॅाक्टर्स निद्रानाशाची कारणं तपासताना कामाचे स्वरूप काय, मोबाईल-लॅपटॅापचा वापर किती करता, फोनवर किती वेळ असता, या प्रश्नांच्या शोधातून निदान करू लागलेत.

काही वर्षांपूर्वी टीव्ही आणि कंप्यूटर घरोघरी आले अन् हळूहळू कुटुंबाचा 'अ'वास्तव हिस्सा बनले. 'इंटरनेट' नावाचं पिल्लू जेव्हा कंप्यूटरमध्ये शिरलं, तेव्हा माहितीचं मायाजाल खुलं झाल्याची चर्चा झाली. नेटचं हे नवं माध्यम समजून, शिकून घ्यावं लागेल म्हणून मोठा ग्राहकवर्ग त्याच्यापासून थोडा फटकून राहिला. पण मोबाइलने मात्र ती चिंता सटासट सोडावून टाकली. सहज सोप्या क्लिक्समधून, हातातल्या बटणांमधून, विविध भाषामाध्यमांतून मोबाइलने 'करलो दुनिया मुठ्ठीमे'चा आत्मविश्वास दिला. पण त्याचवेळी मती कुंठित करून टाकणारं, गुंगवून ठेवणारं, मेंदू हँग करणारं समांतर 'नेटवर्कही' तयार केलं.

या माध्यमांचा वापर सायबर कॅफे, ऑफिसपर्यंत मर्यादित होता, तोपर्यंत ठीक होतं, पंरतु आज स्मार्टफोन, आयपॅड, टॅबलेटच्या जमान्यात टीव्ही आणि इंटरनेट हुक्मी हजर राहू लागला. वाट्टेल तेव्हा, वाट्टेल तिथे कनेक्ट राहण्याचं, सतत संवाद साधण्याचा 'फोर्स' आरोग्यासाठी मारक ठरू लागला. मोबाइल टॉवरमुळे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम, मोबाईलच्या सतत वापरामुळे मेंदूवर कानावर होणारे परिणाम, इअरफोन लावून गाणी ऐकत चालताना किंवा वाहन चालवताना झालेले अपघाती मृत्यू हे उघड धोके समोर आहेतच. टीव्ही, कंप्यूटर, इंटरनेट, सीडी, डीव्हीडी, गाण्यांच्या ध्वनिफिती, चित्रफिती, व्हिडीओ गेम्स, प्ले स्टेशन, मोबाइल गेम्स इत्यादींच्या इलेक्ट्रॉनिक विश्वात जे-जे विकृत माहितीचं भांडार उपलब्ध झालं, ते हातातल्या मोबाइलवर येऊन धडकलं. त्यात अधिकाधिक गुंतवून ठेवणारी व्यवस्था शारिरिक, मानसिक आरोग्यावर आता घाला घालू लागली आहे.

'स्कूल नर्सिग जर्नल्स'मध्ये १५ दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेलं जागतिक सर्वेक्षणानुसार, भारत, तैवान, जपान, इंडोनेशियातील जास्तीतजास्त वेळ इंटरनेट सर्फिंग आणि गेम खेळण्यात घालवणारी किशोरवयीन मुलं उच्च रक्तदाबाच्या किंवा स्थूलतेला बळी पडत आहेत. मुला-मुलींमध्ये व्यसनाधीनता, उदासीनता, स्थूलता, एकलकोंडेपणा असे शारीरिक आणि मानसिक पातळीवरचे आजार निर्माण होऊ शकतात, असंही हे सर्वेक्षण सांगतं. डोळ्यांची जळजळ होण्याइतकाच त्रास गॅझेटस् देत नाहीत, तर त्यातून मोतीबिंदूसारखे आजार होताहेत. उशाला मोबाइल ठेवून झोपणाऱ्यांमध्ये निद्रानाशाचं प्रमाण वाढतंय, तर सदोदित मोबाइल खिशात घेऊन फिरणाऱ्या पुरुषांमध्ये वंधत्वाच्या तक्रारी असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. इअरफोन कानामध्ये घालून ४० मिनिटांहून अधिक वेळ गाणी ऐकणं बहिरेपणाला आमंत्रण देण्याचं लक्षण आहे. कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ. उप्पल यातील धोके समजावून देतात. कमी ऐकायला येणं, एकच शब्द वेगवेगळ्या प्रकारे ऐकू येण्यासह ठार बहिरेपणा येण्याचं प्रमाणही वाढतं आहे. मोबाइलमधून होणारे उत्सर्जन हे आरोग्यासाठी मारक ठरते.

मोबाइल चांगल्या दर्जाचा नसेल तर हा धोका चारपट अधिक वाढतो. वैद्यकीय तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही गॅझेटस्च्या अतिवापरामुळे निर्माण झालेला शारीरदोष पूर्ववत करण्यासाठी वैद्यकशास्त्राकडे ठोस उत्तर आजही नाही. कानातील नसांची क्षमता एकदा कमी झाली की ती पूर्ववत होत नाही. व्हिटॅमिनच्या काही औषधांनी ती वाढवण्याचा तकलादू व पेशंटला दिलासा देणारा तात्पुरता उपाय केला जातो. या बहिरेपणावर ना शस्त्रक्रियेचा उपाय आहे ना गोळ्यांचा!

'हूज किडिंग? : अ रायझिंग ट्रेंड इन मेट्रोज' या सोशल डेव्हलमेंट फाऊंडेशनने केलेल्या देशपातळीवर सर्वेक्षणात गॅझेटच्या अतिवापरामुळे एकटेपणा, नैराश्य अशा आजारांनी मानसिक आरोग्यावरही परिणाम झाल्याचे स्पष्ट झालंय. झोपण्यापूर्वी मोबाइलवर चॅटिंग करत असाल, किंवा लॅपटॉपवर काही वाचत असाल तर ही सवय तुमच्या झोपेसाठी चांगली नसल्याचे हा अहवाल सांगतो. मोबाइल, लॅपटॉप, टॅब यांमधील निळा रंगाचा प्रकाश धोकादायक ठरू शकतो. तसेच बेडवर झोपून आपण मोबाइल डोळ्यांच्या जवळ धरतो. यामुळे डोळ्यांवर जास्त ताण येतो.

मोबालइचा सातत्याने वापर केल्याने मुले एकलकोंडी, हट्टी होतात. सुरुवातीला गंमत म्हणून हातात दिला जाणारा मोबाइल कालांतराने सवय बनतो आणि ही गोष्ट मुलांच्या वाढीसाठी मारक ठरतेय. आठ ते २० वर्षांच्या मुलांमध्ये नव्या गॅझेटससाठीचा हट्ट वाढता आहे. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वेकडे येणाऱ्या या वयोगटातील केसेसमध्ये ही कनेक्टिव्हिटी भावनिक गोंधळ, नैराश्य निर्माण करण्यासाठी कारण ठरताना दिसतेय. रिलेशनशिपमध्ये असणारी मुलं एकमेकांना 'व्हेरी लाँग टाइमस्पॅन'पासून ओळखतोय, असं सांगतात. हा 'स्पॅन' असतो सहा महिने ते वर्षाचा. संवाद, सहवासाशिवाय असलेलं नात तुटलं, की त्यातून निर्माण होणाऱ्या नैराश्यामुळे हात थरथरणे, फोन वाजला नाही तरी तो वाजल्याचा भास होणे, डोकेदुखी, सतत रडू येणे अशा नव्या शारीरिक आरोग्याच्या तक्रारी उद्भभवतात.

नवे गॅझेटस् विकत घेऊन दिले नाहीत तर अभ्यास करणार नाही, इथंपासून घर सोडून निघून जाईन, अशा अनेक धमक्या देऊन पालकांना इमोशनल ब्लॅकमेल केलं जातं. पाच वर्षे वयाच्या आतील मुलांच्या हातात सतत मोबाइल असेल तर त्यांचा बौद्धिक विकास खुंटतो. त्यांच्या भाषिक क्षमतांवर मर्यादा येतात. काही मुलं स्वमग्न झाल्याचीही उदाहरणे बालरोगतज्ज्ञांकडे आहेत. जी मुलं मोबाइलवर अधिक प्रमाणात गेम खेळतात त्यांना अल्झायमरसारख्या आजारांनाही सामोरं जावं लागतं.

मोबाइच्या अतिवापराचा स्त्री आणि पुरुष यांच्या गुणसूत्रांवर आणि हार्मोन्सवरही परिणाम होतो. उच्च तापमानामुळे चुंबकीय लहरींमुळे डोळ्यांमध्ये जळजळ किंवा मोतीबिंदूसारखे विकारही होण्याची शक्यता असते. कधी कधी फोन न वाजताही फोन आल्याचा भास होतो. याला वैद्यकीय भाषेत रिंगटोन एन्जायटी म्हणतात. कित्येक जण डोक्याशी फोन घेऊन झोपतात. अशा लोकांची झोपही कमी होते. हृदयांच्या ठोक्यांच्या गतीवर परिणाम होतो. हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात.

संवादाची प्रभावी माध्यमं हाताशी नव्हती तेव्हा माहितीची देवाणघेवाण करताना आलेल्या अनेक अडचणींवर या गॅझेटजालाने मात केली. माणसाचं असणं, दिसणं, नसणं सगळंच 'अपलोड' होऊ लागलं. आपल्या गोतावळ्यातून बाहेर पडून विस्तारित जगाशी कनेक्ट राहण्यासाठी हात जोडून उभे असलेल्या तंत्रज्ञानाचा अतिवापर आरोग्याला मारक तर ठरत नाही ना, हे तपासून पाहायला हवं. वेळीच ते केलं नाही तर शेवटी आपण इतके एकटे राहू, की आजूबाजूला फोटो काढायलाही कुणी नसेल. यातूनच 'सेल्फी' संकल्पनेचा जन्म झालाय हा उपहास खरा ठरेल.

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता