Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Sunday 5 February 2017

सगळं ‘ठरवून’ ठेवू नका: गुगलचे सीईओ सुंदर पिचई



  • सुंदर पिचई. गुगलचे सीईओ. मूळचे भारतीय. आयआयटी खरगपूर येथून त्यांनी १९९३ साली बी. टेक. केलं. कॅम्पस सोडल्यानंतर इतक्या वर्षांनी प्रथमच त्यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा कॉलेजला भेट दिली.  तिथं शिकणाऱ्या साडेतीन हजार विद्यार्थ्यांसोबत मस्त गप्पा मारल्या.  ‘तुम्ही कधी लेक्चर्स बुडवलीत का?’  हे विचारण्यापासून ते ‘तुमच्या जागी मला गुगलचा सीईओ व्हायचं असेल तर काय करावं लागेल?’  इथपर्यंतच्या भन्नाट प्रश्नांना उत्तरंही दिली. या गप्पांदरम्यान पिचई यांनी भारतातल्या स्टार्टअप्सची स्थिती, शिक्षणपद्धती, जगाशी स्पर्धा करण्यासाठी आवश्यक तरुणांची तयारी,डिजिटायजेशन यांसह अनेक विषयांवर भाष्य केलं. त्याच गप्पांचा हा संपादित अंश..

    अंजली..सुंदर आया है!!!
    गंभीर विषयांबरोबरच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या गमतीशीर प्रश्नांनाही सुंदर पिचई यांनी प्रामाणिक उत्तरं दिली. 
    तुम्ही कॉलेजमध्ये होतात त्याकाळी मेसचं जेवण कसं असायचं, आठवतं का? 
    (हसून) ते मी कसं विसरीन? आम्ही नवीन होतो तेव्हा सिनिअर्स आम्हाला ओळखायला लावायचे की, हे सांबर आहे की डाळ. 
    कधी क्लासेस बंक केले होते?
    आॅफ कोर्स. सकाळची लेक्चर्स अनेकदा मिस व्हायची. म्हणजे मी मिस करायचो. पण आता समोर माझे शिक्षक बसले आहेत म्हणून सांगतो मी अभ्यासही करायचो. 
    रॅगिंग केलं होतं कुणी?
    विशेष नाही. पण आम्ही जेव्हा रूम लॉक करून लेक्चर्सना जायचो तेव्हा सिनिअर्स आमच्या रूममधील सगळं सामान उलटपालट करून ठेवायचे. त्यामुळे परत आल्यावर दरवाजा उघडला की पसारा दिसायचा. अनेकदा स्टेशनवर सिनिअर्सच्या बॅग्ज उचलाव्या लागत.
    कायम स्मरणात राहील अशी आठवण?
    मी मूळचा चेन्नईचा. शाळेत हिंदी शिकलो होतो, परंतु जास्त बोलत नसल्यामुळे विशेष बोलता येत नव्हती. जेव्हा इथं कॉलेजला आलो तेव्हा इतर लोक कसे बोलतात याकडे लक्ष द्यायचो. त्यावरून मला वाटलं की, एखाद्याला बोलावायचं तर ‘अबे साले’ म्हणतात. मग एके दिवशी मी मेसमध्ये एकाला ‘अबे साले’ अशी जोरानं हाक मारली. व्हायचं तेच झालं. काही दिवस माझी मेसच बंद केली. पण त्या दिवशी मुलांमध्ये चांगलाच लोकप्रिय झालो.
    तुमची लव्हस्टोरी कॅम्पसमध्येच सुरू झाली म्हणे..
    हो. अंजली माझी पत्नी. तिला मी येथेच भेटलो होतो. आम्ही एकाच वर्गात होतो. कॅम्पसमध्ये त्याकाळी केवळ एकच गर्ल्स होस्टेल होतं. तुम्हाला जर गर्ल्स हॉस्टेलमध्ये कोणाला भेटायचं असेल तर आधी रिसेप्शनवर सांगावं लागायचं की, कोणाला भेटायचं आहे. त्यानंतर मग ते मोठ्यानं ओरडून सांगायचे, ‘अंजली, सुंदर आया है!’
    सगळ्या हॉस्टेलला कळायचं मग!! फारच एम्बॅरसिंग होतं ते!!
    गुगलमध्ये दिलेल्या इंटरव्ह्यूचा अनुभव कसा होता?
    मी गुगलसाठी १ एप्रिल २००४ रोजी पहिला इंटरव्ह्यू दिला होता. ‘एप्रिल फूल’च्या दिवस असल्यामुळे मला वाटले की हे काही खरं नाही. त्याकाळी गुगलने ‘जीमेल’ची नुकतीच घोषणा केली होती. मला त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे पहिल्या तीन मुलाखतींमध्ये तर ‘जीमेल’ काय आहे हेच मला सांगता आलं नाही. अखेर चौथ्या मुलाखतीमध्ये त्यांनी मला थेट विचारलं की, ‘तू जीमेल पाहिलं तरी आहेस का?’ मी नाही म्हटल्यावर त्यांनी मला तिथंच जीमेलचं प्रात्यक्षिक दाखवलं. त्यानंतर मग पाचव्या इंटरव्ह्यूमध्ये मी अधिक चांगल्याप्रकारे उत्तर देऊ शकलो. आणि माझा गुगल प्रवास सुरू झाला.
    २३ वर्षांनंतर पुन्हा एकदा कॉलेजमध्ये येऊन कसं वाटतंय?
    सगळा भूतकाळ जागा झाला. ‘नॉस्टॅल्जिक’ वाटतंय. कॉलेज संपल्यानंतर मी जेव्हा रेल्वे स्टेशनकडे जात होतो तेव्हा खूप भरून आलं होतं. माझ्या आयुष्यातील सर्वात चांगली चार वर्षे मी या कॉलेजमध्ये घालवली. ते सारे दिवस पुन्हा जागे झाले.. मी जेव्हा आयआयटीमध्ये आलो तेव्हा या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणंच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आज मी जो कोणी आहे, तसा कुणी होईन असा तर विचारसुद्धा डोक्यात नव्हता आला कधी. 
    तेव्हा आणि आता, नेमका काय फरक जाणवतोय?
    ज्या वेगानं आपल्या देशात बदल होतोय ते पाहून थक्क व्हायला होतं. माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तर भारतानं खूप मोठी मजल मारली आहे. मला चांगलं आठवतं की, त्याकाळी घरी टेलिफोन घेणंसुद्धा खूप अवघड होतं. आज भारतात ३० कोटींपेक्षा जास्त स्मार्टफोन्स आहेत. आयआयटीमध्ये आलो तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा कम्प्युटरहाताळला. आता सारं बदलतंय..
     तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळातही आपली भारतीय शिक्षणपद्धती कितपत चांगली आहे असं वाटतं? ती अधिककालसुसंगत करण्यासाठी काय करायला हवं?
    भारतीय माणसांना शिक्षणामध्ये खूप रस असतो. हे आपलं वैशिष्ट्य आहे. लोकांच्या रोजच्या बोलण्याचा आणि जिव्हाळ्याचा तो विषय आहे. पालक मुलांच्या शिक्षणाबद्दल जागरूक आणि आग्रही असतात. आपल्या देशाच्या पायाभरणीत शिक्षणाचा खूप मोठा वाटा आहे; पण बदलत्या काळात शिक्षणपद्धतीसुद्धा विकसित झाली पाहिजे. आपल्याकडे पुस्तकी ज्ञानावर खूप भर दिला जातो. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मात्र व्यवहारज्ञान, वास्तव जगाचा अनुभव अधिक गरजेचा आहे. ‘प्रॅक्टिकल लर्निंग’ ज्याला आपण म्हणतो त्याला अधिक महत्त्व दिलं पाहिजे. नवनवीन गोष्टी शिका, जोखीम घ्यायला मागे-पुढे पाहू नका. तुमच्या मनाला जे आवडेल, जे तुमचं पॅशन आहे ते करण्याची हिंमत करा. आपण फार सुरक्षित चौकटीमध्ये आयुष्य जगतो. आपला मार्ग लहानपणापासूनच ठरलेला असतो. मुलं आठवीपासूनच आयआयटीची तयारी करताना पाहून मला तर फार आश्चर्य वाटतं. आपल्याकडे शाळेत असताना कॉलेजचा विचार असतो, कॉलेजमध्ये उच्च शिक्षणाचा, त्यानंतर नोकरी असं चक्र सुरू राहतं. गंमत म्हणजे, ‘आयआयटी’मध्ये आल्यावर लगेच ‘आयआयएम’चा प्लॅन आखला जातो. असं आखीव-रेखीव आयुष्य जगल्यावर नवीन क्रांतिकारी गोष्टी कशा घडतील? खऱ्याखुऱ्या आयुष्याची चव चाखल्याशिवाय जगण्याला अर्थ नाही. अमेरिकेतले विद्यार्थी अंतिम वर्षात जाईपर्यंत मेजर कोणत्या विषयात करायचं हे ठरवत नाहीत. आपल्याकडे तर शाळेपासूनच संपूर्ण शैक्षणिक नकाशा तयार असतो. त्यापेक्षा चौकटी मोडून नवीन गोष्टींचा अनुभव घ्यायला शिका. सृजनशीलता, काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव, जोखीम घेण्याची धमक हे सारं फार महत्त्वाचं आहे. शैक्षणिक प्रगती गरजेची आहे; परंतु तिला अवास्तव महत्त्व देण्याची गरज नाही.
    यशस्वी होण्यासाठी ‘आयआयटी’सारख्या संस्थेतच शिकण्याची आवश्यकता आहे का? 
    ‘आयआयटी’मध्ये प्रवेश मिळाला तर उत्तमच आहे; पण नाही मिळाला तर प्रगतीचे सर्व मार्ग बंद झाले असं नाही. आयआयटीमध्ये न शिकतादेखील खूप यशस्वी झालेली माणसं आपण पाहतोच. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, ‘आयआयटी’सारख्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवला म्हणजे यशाची खात्री असं काही नाही. त्यापेक्षा तुम्हाला जे येतं, जे आवडतं ते मनापासून करण्याला जास्त महत्त्व द्या. त्यासाठी तुम्ही इंजिनिअरच व्हायला हवं अशीदेखील अट नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा, प्रगतीच्या लाखो शक्यता आज निर्माण झाल्या आहेत.
    भारतात सध्या ‘स्टार्टअप’चं वारं जोरात वाहत आहे, त्याची नेमकी स्थिती कशी आहे?
    भारतामध्ये ‘स्टार्टअप’ ही संकल्पना चांगल्या प्रकारे रुजते आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने तिचा विकास आणि विस्तार होताना दिसतोय. येथील तरुणांमध्ये नावीन्य, कल्पनाशक्ती, सामर्थ्य आहे; परंतु अडचण केवळ एवढीच आहे की, त्याचा पुरेपूर उपयोग करून घेणारी बाजारपेठ अद्याप तेवढी सक्षम नाही. जगातील इतर प्रगत देशांच्या एकदम तोडीस तोड स्टार्टअप्स भारतात आहे, त्यात काहीच शंका नाही. गरज आहे ती फक्त त्यामध्ये गुंतवणूक करण्याची, जी माझ्या मते हळूहळू वाढेल. स्टार्ट-अप्स हे बहुधा तंत्रज्ञानाशीच संबंधित असतात आणि भारतात डिजिटल मार्केट सध्या विकसित होत आहे. म्हणजे आपल्याकडे ३० कोटी स्मार्टफोन्स आहेत जी खूप मोठी गोष्ट. पण जेव्हा आपण १३० कोटी लोकांचा विचार करतो तेव्हा ३० कोटी हे प्रमाण खूप कमी आहे असं लक्षात येतं. मात्र, आगामी काही वर्षांतच ही परिस्थिती बदलेल. भारतीय कंपन्यांना माझं केवळ एवढंच सांगणं आहे की, फक्त आपल्या देशाचा नाही तर इतर देशांचा विचार करून उत्पादनं तयार करा. खास करून इंडोनेशिया, व्हिएतनाम, कंबोडियासारख्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत देशांचा बाजारपेठ म्हणून नक्कीच विचार करायला पाहिजे. ध्येय लहान ठेवू नका. आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा.
    आयआयटीसारख्या संस्थेतून पदवी घेतली की विदेशात नोकरीसाठी जाण्याचा पूर्वी ट्रेण्ड होता. आता ते चित्र बदलतं आहे का? भारतातही यशस्वी करिअर करता येऊ शकतं, असं तुम्हाला वाटतं का?
    नक्कीच. मी जेव्हा जेव्हा भारतात येतो तेव्हा बेंगळुरू , दिल्ली या शहरातील स्टार्टअप्सना भेट देत असतो. त्यांपैकी अनेक स्वयंउद्योजक हे भारतातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिकलेले आहेत आणि त्यांनी भारतात राहूनच व्यवसाय किंवा कंपनी सुरू केली आहे. आज ते प्रचंड यशस्वी आहेत. मागच्या वीस वर्षांमध्ये केवळ जगच नाही तर आपला देशदेखील खूप बदलला आहे. आयआयटी करून मी जेव्हा अमेरिकेला गेलो होतो तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा विमानात बसलो होतो आणि आता तर भारतात दरवर्षी दहा कोटींपेक्षा जास्त लोक विमानाने प्रवास करतात. प्रत्येक क्षेत्रात हे जे काही बदल झाले आहेत ते एकदम झपाट्याने झालेले आहेत. ते पाहता पुढच्या वीस वर्षांकरिता भारत हा करिअरच्या दृष्टीने उत्तम देश आहे.
    इतर लोक आपल्यापेक्षा जास्त हुशार आहेत अशी भावना आणि त्यातून येणारी असुरक्षितता तुम्ही कधी अनुभवली आहे?
    तुम्ही जेव्हा खूप हुशार, कौशल्यपूर्ण किंवा यशस्वी लोकांसोबत काम करता तेव्हा असुरक्षिततेची भावना मनात येणं अत्यंत स्वाभाविक आहे. मलादेखील त्याचा अनुभव आहे. मी जेव्हा ‘गुगल’मध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या आजूबाजूला असणारे मोठमोठे नावाजलेले लोक पाहून त्यांच्यासमोर आपण काहीच नाही असं सतत वाटायचं. आमच्या कंपनीमध्ये तर हा फार कॉमन प्रॉब्लेम आहे. आम्ही त्याला ‘इम्पोस्टर सिंड्रोम’ म्हणतो. हीच गोष्ट सर्व प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांनासुद्धा लागू पडते. आयआयटीमध्ये प्रवेश मिळवल्यावर अवतीभोवतीचं वातावरण पाहून अशी असुरक्षिततेची भावना येते. पण ही एका अर्थानं चांगली गोष्ट आहे, कारण त्यामुळे तुम्हाला अधिक मेहनत घेण्यासाठी प्रेरणा मिळते. अन्यथा तुमच्या क्षमतांचं खरं सामर्थ्य तुम्हाला कधीच लक्षात येणार नाही.
    ( आय.आय.टी. खरगपूरच्या सौजन्याने)
    शब्दांकन: मयूर देवकर
    (मयूर लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत सहायक उपसंपादक/वार्ताहर आहे.)

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता