Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Tuesday 28 March 2017

गुढ़ीपाडवा व शंभुराजे: डॉ. सच्चिदानंद शेवडे

गुढी उभारावी -  डॉ. सच्चिदानंद शेवडे
(तरुण भारत- तारीख: 03 Apr 2016  ) 
          गुढीपाडव्यासारखे सण आले की काही विकृत लोकांच्या पोटात खूप दुखू लागते. मग ते स्वतःला ज्ञानी आणि इतिहास संशोधक समजत असल्याचा आव आणत शंभूराजांच्या हौतात्म्याशी गुढीचा संबंध जोडू बघतात. गम्मत म्हणजे अन्य वेळी हिंदू तिथी आम्हाला मान्य नाहीत असे हेच कावकावतात. पण पाडव्याच्या आदली अमावास्या त्यांना नेमकी आठवते. तेव्हा तिथी आड येत नाही. बरं, हे हिंदू नसतील तर त्यांनी हिंदू सण व उत्सवाबद्दल का बोलावे? हिंदू असतील तर त्यांना आत्मताडनात विकृत आनंद मिळत असावा. सोशल मीडियावरचे इतिहास संशोधक पाहून थक्क व्हायला होते. यांना इतिहासाचे खरे रुमाल, कागदपत्रे, महजर, पत्रे आदींशी काही घेणे नसावे. आपण सांगू अथवा फॉरवर्ड करू तो खरा इतिहास अशी काहीशी मानसिकता दिसते. यावर विश्वास
ठेवणारे पाहिले की कपाळावर हात मारावासा वाटतो.
त्यांच्याकडे दुर्लक्ष करून खरा इतिहास आणि संदर्भ पाहू. पहिला स्पष्ट संदर्भ पुराणांमध्ये मिळतो. ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली तो आपला पहिला वर्षदिवस होय. इंद्राने याच पाडव्याच्या दिवशी दधिची ऋषींच्या अस्थींच्या योगे बनविलेल्या वज्राने वृत्रासुराचा वध केला. रामायण काळात श्रीरामांनी आपल्या राज्यकारभाराला या शुभदिनी आरंभ केला. शालिवाहनाने आपला नवीन शक या दिवसापासून सुरू केला. सर्व सृष्टी हिवाळ्यातील पानगळीतून मुक्त होऊन नवीन साज लेवते. ऊबदार वातावरण तयार होते. शेतकरी सुखावत असतो. कोकीळगान कानी येत असते. असे सर्वांना सुखावणारे वातावरण चैत्रात तयार होत असते. लक्षावधी वर्षांच्या परंपरा सर्वत्र सारख्याच असत नाहीत. अर्थात हे कळायला सामाजिक, पौराणिक, भाषिक, आर्थिक आदी अनेक संदर्भ ध्यानात घ्यावे लागतात. तरच उत्तरेत गुढी का उभारत नाहीत याचे उत्तर मिळू शकते. प्रत्येक ठिकाणची परंपरा वेगळी, हेच आपले वैशिष्ट्य आहे. संक्रांतीला तिळगूळ फक्त महाराष्ट्र व काही प्रमाणात गुजरातमध्ये मिळेल अन्यत्र नाही. पोंगल फक्त दक्षिणेत दिसेल, उत्तरेत नाही. म्हणजे सण असतात; फक्त ते साजरे करण्याची पद्धत वेगळी असते. त्यातून उत्तरेत इस्लामी आक्रमकांचा मार अधिक पडला आहे. स्त्रियांना उचलून नेणे सर्रास असे, त्यामुळे त्यांच्याकडे चेहरा लपविण्यासाठी घुंघट घेणे व महाराष्ट्रात काही ठिकाणी केशवपन पद्धत आली. या रूढी कालपरत्वे येतात व बंद होतात. केशवपन बंद झाले तथापि उत्तरेतील घुंघट कमी झाला पण संपला नाही.
शंभूराजांच्या दुर्दैवी व अमानुष हत्येचा आणि गुढीचा काहीही संबंध नाही यासाठी आपण त्यांच्या आधी होऊन गेलेल्या संतांचे संदर्भ पाहू. चौदाव्या शतकातील चोखा महाराजांचा अभंग आहे,
टाळी वाजवावी गुढी उभारावी
वाट हे चालावी | पंढरीची ॥
(श्री सकल संतगाथा, खंड ला, श्री संतवाङ्मय प्रकाशन मंदिर, पुणे)
तुकाराम महाराज हे शंभूराजांच्या जन्मापूर्वीच वैकुंठास गेले. त्यांनी श्रीकृष्णाच्या बाललीलांचे वर्णन करणारे जे अभंग लिहिले आहेत ते शासकीय गाथेत अखेरचे १०० अभंग आहेत. त्यांना बालक्रीडेचे अभंग म्हणतात. त्यात किमान पाच वेळा गुढ्या उभारण्याचा उल्लेख केला आहे.
गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा
बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी
गुढिया तोरणे करिती कथा गाती गाणे अ२८३९ क्र.
संत तुकाराम महाराजांनीच आणखी एकदा म्हटलेले आहे,
रोमांच गुढिया डोलविती अंगें भावबळें खेळविती सोंगें रे
तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे या विठोबाच्या अंगसंगें रे (अ.१९२ क्र.)
कृष्णाने कालियावर मात केल्यानंतर त्याच्या गोपाळ मित्रांना अतिशय आनंद झाला. त्यातील एका चपळ गोपबालकाच्या हातात गुढी देऊन त्याला कृष्णाने आनंदाची बातमी देण्यासाठी पुढे पाठविले, हे नोंदविताना तुकाराम महाराज वर्णन करतात,
पुढे पाठविले गोविंदें गोपाळा | देउनि चपळा हातीं गुढी | (अ.४५५३ क्र.)
आनंदाची ही बातमी गोकुळात पोचल्यानंतर तेथे काय घडले, ते सांगताना तुकाराम म्हणतात,
शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं | चेंडू वनमाळी घेउनि आले
आली दारा देखे हरुषाची गुढी | सांगितली गुढी हरुषें मात (अ.४५५५ क्र.)
त्यानंतर कृष्ण गोकुळात आल्यावर तेथे किती आनंदाचे वातावरण होते, ते नोंदविताना तुकाराम म्हणतात,
नेणे वर्णधर्मजी आली समोरी अवघीच हरी आळिंगिली
हरि लोकपाळ आले नगरात सकळांसहित मायबाप
पारणे तयांचे जाले एका वेळे देखिले सावळे परब्रह्म
ब्रह्मानंदें लोक सकळ नाचती गुढिया उभविती घरोघरीं
घरोघरीं सुख आनंद सोहळा सडे रंग माळा चौकदारी (अ.४५५६ क्र.)
तेराव्या शतकातील ज्ञानेश्वर माउलींनी म्हटले आहे की,
अधर्माचि अवधीं तोडीं दोषांचीं लिहीलीं फाडीं
सज्जनांकरवीगुढी सुखाची उभवीं (ज्ञानेश्वरी ४५०)
आइकैं संन्यासी तो चि योगी | ऐसी एकवाक्यतेची जगिं |
गुढी उभविली अनेकीं | शास्त्रांतरी ॥ (ज्ञानेश्वरी ६.५२)
माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी
येरू जीवीं म्हणे सांडी गोठी यिया (ज्ञानेश्वरी १४४१०)
त्याच शतकात रचना झालेल्या लीळाचरित्रात लीळा-२०८ मध्ये गुढी हा शब्द सापडतो. नामदेव महाराज, जनाबाई यांच्या अभंगात गुढीचे उल्लेख येतात. पुढे सोळाव्या शतकातील एकनाथ महाराजांच्या काव्यात गुढी हा शब्द अनेक वेळा आणि वेगवेगळ्या रूपांत समोर येतो. हर्ष, भक्तिसाम्राज्य, जैताची, रामराज्याची, वैराग्याची, ज्ञातेपणाची, सायुज्याची, स्वानंदाची, निजधर्माची अशा विविध रूपकांतून गुढी समोर येते. एखादा शब्द भाषेत तेव्हाच रूढ होतो जेव्हा ती वस्तू समोर असते. गुढी उभारली जात होती म्हणून तो शब्द संतांच्या रचनांमधून दिसतो.
आता काही तत्कालीन संदर्भ देतो. शिवचरित्र साहित्य खंड १ मध्ये एक महजर सापडतो. हा महजर सुहूर सन खमसेन अलफ, शके १५७१ साली म्हणजे इसवी सन १६४९/१६५० सालचा आहे, या महजरात गुढीयाचा पाडवा असा स्पष्ट उल्लेख आहे. याचाच अर्थ गुढीपाडवा हा इसवी सन १६८९ सालापूर्वी साजरा होत असे, हे सरळ स्पष्ट होते. त्यामुळे शंभूराजांच्या नावाने केवळ जातीय द्वेषाचे राजकारण केले जाते, हे सुज्ञ लोकांना सांगायला नको.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने- विसावाखंड- लेखांक १७६, पृष्ठ क्र.२३४ ते २३८ यात एक निवाडा दिला आहे. त्यात पान क्र. २३८ वर, फिर्यादीला पुरावा म्हणून प्राचीन कागद दाखविण्यास सांगितले आहेत. त्या आधारे पान क्र. २३९ वर शके मध्ये कार्तिक पौर्णिमा ग्रामस्त कसबे वाई याणी ग्रहण काळी कडत जोसी को मजकूर यास प्रतिवर्षी पासोडी एक व गहू व गुढीयाचे पाडव्यास कुडाव एक देऊ म्हणोन पत्र लेहून दिल्हे यास वर्षे आज तागायत १४८ होतात.
शिवकालीन पत्र सारसंग्रह, लेखांक मधील पत्र नारायण शेणवी याने आपल्या धन्याला म्हणजे मुंबईच्या गव्हर्नरला ४ एप्रिल १६७४ म्हणजे चैत्र शु. ८ शके १५९६ ला लिहिले आहे. यात निराजी पंडित पाडव्याकरिता आपल्या घरी आला असा स्पष्ट उल्लेख आहे. असे अनेक उल्लेख काढून दाखवता येतील.
तूर्तास हे दुर्मुख नाम संवत्सर, शके १९३८ आपणा सर्वांस सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे व देशाला शांततेचे जावो हीच शुभेच्छा...!!
                                

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता