Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Saturday, 17 January 2026

शिक्षकाला जात नसते... मग गुणवत्तेच्या मोजमापात ही दरी का? (TET आणि MPSC/UPSC चा विरोधाभास)



"गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा..."

आपल्या संस्कृतीत शिक्षकाला देवाचा दर्जा दिला आहे. वर्गात शिकवणारा शिक्षक जेव्हा फळ्यावर एखादं गणित सोडवून देतो किंवा विज्ञानाचा एखादा नियम समजावून सांगतो, तेव्हा समोर बसलेला विद्यार्थी त्या शिक्षकाची 'जात' पाहत नाही, तर त्याचे 'ज्ञान' पाहतो. वर्गातल्या विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना शिक्षकाची जात आड येत नाही, आणि विद्यार्थ्याला ज्ञान देताना शिक्षक मुलाची जात पाहत नाही. जर ज्ञानदान ही प्रक्रिया जातविरहित आहे, तर त्या ज्ञानाची पात्रता सिद्ध करणारी परीक्षा जातीवर आधारित का असावी? हा आजचा सर्वात ज्वलंत प्रश्न आहे.

काल टीईटी परीक्षेचा निकाल लागला. त्यात ८५ गुण मिळवणारा उमेदवार नापास ठरतो आणि दुसरीकडे ८३ गुण मिळवणारा उमेदवार पास ठरतो. हा विरोधाभास आणि अन्याय मनाला अस्वस्थ करणारा आहे.

 शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ही भावी पिढीला घडवणारे शिक्षक निवडण्यासाठी तसेच जे शिक्षक म्हणून सेवा देत आहेत त्यांच्यासाठी ही अनिवार्य  केली आहे. या परीक्षेचा मूळ उद्देश शिक्षकाची बुद्धिमत्ता, विषयाचे ज्ञान आणि शिकवण्याची क्षमता तपासणे हा आहे. खुल्या प्रवर्गातील (General Category) उमेदवाराला पात्र होण्यासाठी ९० गुण लागतात, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला ८३ गुण वर पात्र ठरवले जाते. मग इथे हा विरोधाभास का?

एकाच वर्गात शिकवायचे, एकाच अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा द्यायची, पण पास होण्यासाठीची 'फिनिशिंग लाइन' मात्र वेगळी! हा 'अन्याय' नाही तर काय आहे? खुल्या प्रवर्गातील एखाद्या उमेदवाराला ८९ गुण मिळाले तरी तो 'नापास' ठरतो आणि स्पर्धेतून बाहेर फेकला जातो. दुसरीकडे, ८३ गुण मिळवणारा उमेदवार केवळ जातीच्या निकषामुळे 'पात्र' ठरतो आणि नोकरीच्या शर्यतीत पुढे जातो. ज्या मुलाला ८९ गुण मिळाले आहेत, त्याची बुद्धिमत्ता ८३ गुण मिळवणाऱ्यापेक्षा कमी आहे का? नक्कीच नाही. उलट, त्याने जास्त गुण मिळवूनही त्याला अपात्र ठरवणे, हे त्याच्या गुणवत्तेचा अपमान करण्यासारखे आहे.

 MPSC ला जमते, मग परीक्षा परिषदेला का नाही?

सर्वात महत्त्वाचा तर्क असा की, TET ही केवळ एक 'पात्रता' (Eligibility) चाचणी आहे, ही अंतिम निवड यादी  नाही. आपल्याच राज्यात MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत 'CSAT' चा पेपर असतो. हा पेपरसुद्धा 'पात्रता' (Qualifying) स्वरूपाचा आहे. तिथे नियम काय सांगतो? तिथे उमेदवाराला पास होण्यासाठी ३३% (६६ गुण) मिळवणे अनिवार्य आहे आणि विशेष म्हणजे, MPSC मध्ये हा निकष ओपन, ओबीसी, एससी, एसटी अशा सर्व प्रवर्गांसाठी समान आहे.

जर प्रशासकीय अधिकारी निवडताना त्यांची 'बौद्धिक पात्रता' तपासण्यासाठी सर्वांना एकच फूटपट्टी लावली जाते, तर मग भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांसाठी दोन वेगळ्या फूटपट्ट्या का? MPSC ला जे जमते, ते इथे का लागू होत नाही?

सेवेतील शिक्षकांवर आणि समानतेवर होणारा अन्याय:

हा अन्याय तिथे जास्त प्रकर्षाने जाणवतो, जिथे शिक्षक आधीच सेवेत आहेत. जे शिक्षक वर्षानुवर्षे एकाच स्टाफ रूममध्ये बसतात, एकच विषय शिकवतात आणि समान पगार घेतात, त्यांनाही या भेदभावाला सामोरे जावे लागते. परीक्षेचा निकाल लागल्यावर एकाला ८९ गुण मिळाले तरी तो 'अपात्र' ठरतो आणि त्याच्याच सहकाऱ्याला ८३ गुण मिळाले तरी तो 'पात्र' ठरतो.

एखादा विद्यार्थी जेव्हा आजारी पडतो, तेव्हा तो डॉक्टरांची जात पाहून औषध घेत नाही, तर डॉक्टरांची काबिलियत पाहतो. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्याला शिकवणारा शिक्षक हा 'गुणवान' असावा, मग तो कोणत्याही जातीचा असो. जर शिक्षकी पेशासाठी आवश्यक असलेली किमान बौद्धिक क्षमता ही 'पात्रता' असेल, तर ती सर्वांसाठी समान असायला हवी. गुणवत्ता ही सवलतींवर ठरत नसते, ती कष्टावर आणि बुद्धिमत्तेवर ठरते.

आज कित्येक तरुण-तरुणी, ज्यांनी डी.एड., बी.एड. केले आहे, ते केवळ १-२ गुणांनी TET नापास होतात. ९० चा आकडा गाठताना त्यांची दमछाक होते. ८८ किंवा ८९ वर अडकलेल्या त्या उमेदवारांच्या मानसिक वेदनांची दखल कोण घेणार? केवळ 'जनरल' कॅटेगरीत जन्म झाला म्हणून त्यांच्या बुद्धिमत्तेला कमी लेखायचे का? आपण म्हणतो की "शिक्षकाला जात नसते." पण दुर्दैवाने आपली व्यवस्था हेच सांगते की, "तुझी जात सांग, आम्ही सांगतो तुला किती हुशार असावं लागेल."

उमेदवारांना नोकरी देताना, जागांचे वाटप करताना आरक्षण जरूर असावे, तो संविधानिक अधिकार आहे. पण 'पात्रता' (Eligibility) ठरवताना आरक्षण असणे, हे गुणवत्तेच्या तत्त्वात बसत नाही. जर आपण 'समानतेचा' हक्क मानतो, तर शिक्षणाच्या क्षेत्रात, जिथे देशाचे भविष्य घडते, तिथे तरी गुणवत्तेशी तडजोड नको. म्हणूनच मागणी एकच आहे – TET ही फक्त 'पात्रता' परीक्षा आहे. MPSC/UPSC च्या CSAT प्रमाणेच इथेही सर्वांना 'समान कट-ऑफ' (Common Cut-off) लागू करा. शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे आणि या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी सर्वांना 'पायरी' सारखीच असावी. कारण शेवटी... शिक्षकाला जात नसते!

पन्नाशी ओलांडलेल्या शिक्षकांचा विचार कोण करणार?

या ५५% आणि ६०% च्या जाचक अटींचा सर्वाधिक फटका कोणाला बसत असेल, तर तो सेवेतील ज्येष्ठ शिक्षकांना. ज्या शिक्षकांचे वय ५० वर्षे झाले आहे, जे गेल्या २५-३० वर्षांपासून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत, त्यांना आज या वयात परीक्षेला बसवणे कितपत योग्य आहेवयाच्या पन्नाशीत डोळ्यांची आणि स्मरणाची ताकद कमी झालेली असते, अभ्यासाची सवय,लिंक तुटलेली असते. अशा वेळी त्यांना तरुण मुलांशी स्पर्धा करायला लावणे आणि ५५-६०% गुणांची अपेक्षा करणे हा अन्याय आहे. जर MPSC मध्ये अधिकार पदासाठी ३३% गुण पुरेसे असतील, तर ५० वर्षे वय झालेल्या शिक्षकांसाठी TET पात्रतेचा निकष ३३%  का असू नये?

त्यांच्याकडे पुस्तकी पाठांतराचे गुण कमी असतीलही, पण त्यांच्याकडे २५ वर्षांचा 'अनुभव' आहे, जो कोणत्याही पुस्तकात मिळत नाही. ३३% चा निकष लावला तर हे ज्येष्ठ शिक्षक सन्मानाने पात्र होऊ शकतील आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर त्यांना अपात्रतेचा कलंक माथी घेऊन जगण्याची वेळ येणार नाही.

मागणी न्यायाची! आज माझ्यासारखे ८५ गुण मिळवणारे तरुण शिक्षक असोत किंवा पन्नाशीतले ज्येष्ठ शिक्षक असोत; आमची मागणी एकच आहे –समान कट-ऑफ: MPSC CSAT प्रमाणे सर्व प्रवर्गासाठी समान गुण ठेवा. ३३% चा निकष: पात्रता परीक्षा ही केवळ गाळणी असावी, अडवणूक नसावी. ती ३३% वर आणावी, जेणेकरून ५० वर्षे वय असलेले आणि ८५ गुण मिळवूनही अपात्र ठरणारे उमेदवार सन्मानाने पात्र होतील.

                                                                                                                          -शशिकांत जोशी

 

Saturday, 27 September 2025

RMS प्रवेश परीक्षा २०२५ : एक गुणवत्तापूर्ण परीक्षा #MUSTAPPLY

 


Rashtriya Military Schools मध्ये शैक्षणिक सत्र 2026-2027 साठी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षाने वर्ग 6 आणि 9 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आहे. ही OMR आधारित परीक्षा डिसेंबरमध्ये होईल. अर्ज सादर करण्याची मुदत 10 सप्टेंबर 2025 पासून 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत आहे. परीक्षा दिनांक एसएमएस/E-mail द्वारे नोंदणीकृत विद्यार्थ्यांना कळवला जाणार आहे.

पात्रता निकष

  • कक्षा 6 साठी विद्यार्थ्यांचे वय 31 मार्च 2026 पर्यंत 10 ते 12 वर्षे असावे (1 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2016 दरम्यान जन्मलेले).

  • कक्षा 9 साठी वय 13 ते 15 वर्षे असावे (1 एप्रिल 2011 ते 31 मार्च 2013 दरम्यान जन्मलेले).

  • कक्षा 6 साठी विद्यार्थ्यांनी कक्षा 5 पास करावी किंवा त्या वर्षी पास व्हावी. कक्षा 9 साठी विद्यार्थ्यांनी कक्षा 8 पास करणे आवश्यक आहे.

परीक्षा स्वरूप

  • परीक्षा OMR पद्धतीची आणि बहुपर्यायी प्रश्नांची असेल.

  • कक्षा 6 साठी विषय: इंग्रजी, ह्या गुणांची गणना अंतिम मेरिटमध्ये होणार नाही, इंटेलिजन्स टेस्ट, गणित, सामान्य ज्ञान/करंट अफेअर्स, मुलाखत.

  • कक्षा 9 साठी विषय: इंग्रजी, हिंदी, सामाजिक विज्ञान, गणित, विज्ञान, मुलाखत.

  • प्रश्नपत्रिका कक्षा 6 साठी द्विभाषिक (इंग्रजी+हिंदी) तर कक्षा 9 साठी फक्त इंग्रजीमध्ये असेल.

  • Rashtriya Military Schools) या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमातील निवासी सार्वजनिक शाळा आहेत. या शाळांचा मुख्य उद्देश गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आणि विद्यार्थ्यांना संरक्षण सेवेसाठी तयार करणे आहे.

    शाळांचे ठिकाण आणि इतिहास

    • भारतात एकूण पाच राष्ट्र सैन्य शाळा आहेत: चैल (हिमाचल प्रदेश), अजमेर (राजस्थान), बेलगाव (कर्नाटक), बंगलोर (कर्नाटक) आणि धोलपूर (राजस्थान).

    • या शाळा 1925 मध्ये स्थापण्यात आल्या आणि त्या भारतातील सर्वांत जुन्या पब्लिक स्कूल्सपैकी आहेत.

    • शाळांमध्ये प्रवेश सहावी व नववी इयत्तेसाठी घेतला जातो. प्रवेशासाठी कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली जाते.

    शिक्षण आणि सुविधा

    • शाळा CBSE बोर्डाशी संलग्न असून, शिक्षणाचं माध्यम इंग्रजी आहे. निवडलेल्या कॅडेट्सना विज्ञान (Science) शाखेमधून दहावी नंतरचे शिक्षण दिले जाते.

    • या शाळांमध्ये शैक्षणिक दर्जाबरोबरच खेळ, एनसीसी (NCC), सहशालेय उपक्रम, शिस्त, क्रीडा, आरोग्य आणि उच्च दर्जाच्या वसतिगृहाच्या (Hostel) सुविधा दिल्या जातात.

    • विद्यार्थ्यांना नियमितपणे वैद्यकीय तपासणी, उत्तम आहार, खेळ आणि शैक्षणिक प्रशिक्षण मिळते. सहशालेय कृतींचा मोठा सहभाग आहे जसे की, वादविवाद, अभिनय, संगीत, इ..

    प्रवेश आणि इतर बाबी

    • सर्व प्रवेश ‘निवासी’ स्वरुपात असतात.

    • प्रवेश पात्रतेसाठी स्थिती, वयोमर्यादा, शाररिक आणि वैद्यकीय निकष आहेत.

    • शाळांमध्ये सैनिक, सेवा अधिकारी, नागरीक व ओबीसी/एससी/एसटी वर्गांसाठी आरक्षणाच्या जागा राखीव आहेत.

    शाळांची वैशिष्ट्ये

    • उत्कृष्ट कॅम्पस, वैविध्यपूर्ण सहशालेय उपक्रम, सुसज्ज क्रीडांगणे आणि उत्कृष्ट निवासी सुविधा.

    • प्रशिक्षणामुळे विद्यार्थी संरक्षण क्षेत्रात उत्तम करिअर करू शकतात; तसेच मोठ्या स्पर्धापरीक्षा व UPSC साठीही विद्यार्थ्यांना तयार केले जाते.

    या  शाळा केवळ शैक्षणिकच नव्हे, तर विविध क्षेत्रात सर्वांगीण विकास घडवतात आणि भारतीय संरक्षण सेवेसाठी उत्कृष्ट अधिकारी घडवण्याचे कार्य करतात.

Friday, 11 July 2025

ग्रामीण भागातील विद्यार्थी ही देऊ शकतील आता ऑलिम्पियाड्स परीक्षा -SOF एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षा

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि ग्रामीण भागातील शाळांना राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक व्यासपीठाशी जोडण्याची संधी देण्यासाठी SOF (Science Olympiad Foundation) ऑलिम्पियाड्स हे एक उत्तम माध्यम आहे. या वर्षी १ ली पासून CBSE अभ्यासक्रम लागू केला आहे. त्यामुळे हि परीक्षा उपयुक्त ठरू शकते . ही परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाची आणि कौशल्यांची चाचणी राष्ट्रीय पातळीवर घेण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. ज्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी मिळते. ही परीक्षा ७२ देशांतील ९६००० पेक्षा जास्त शाळांत घेतली जाते.

जर तुमच्या शाळेत ५० विद्यार्थी ही परीक्षा देण्यास इच्छुक असतील, तर तुम्ही स्वतः नोंदणी करून शालेय स्तरावर ही परीक्षा आयोजित करू शकता. मात्र प्रत्येक शाळेत इतका प्रतिसाद मिळत नाही. काही विद्यार्थी विशेष असतात, परंतु केवळ १-२ विद्यार्थ्यांसाठी नोंदणी करणे किंवा शाळास्तरावर परीक्षा आयोजित करणे शक्य नसते. यावर उपाय म्हणून, तालुक्यातील एकाच शाळेच्या नोंदणीवर सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देता येईल. तुमच्या शाळेत १-२ विद्यार्थी इच्छुक असले, तरी त्यांना ही संधी देऊन राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेचा अनुभव देता येईल. इच्छुक शिक्षकांनी सर्व शाळा मिळून किमान 50 विद्यार्थ्यांकरीता नोंदणी केल्यास अशाप्रमाणे सुरुवात करता येईल.

याप्रमाणे संधीकरीता नोंदणी लिंक: https://forms.gle/CspYktBwewY1dpWA7

 अंतिम नोंदणी दिनांक : ३१ जुलै २०२५ 

SOF ऑलिम्पियाड्सचे फायदे:

  1. शैक्षणिक सक्षमता वाढवणे:
    • ऑलिम्पियाडच्या प्रश्नपत्रिका CBSE, ICSE आणि राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. जिल्हा परिषद मराठी शाळा प्रामुख्याने राज्य शिक्षण मंडळाचे अभ्यासक्रम शिकवतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या नियमित अभ्यासावर आधारित प्रश्नपत्रिका मिळतात. यामुळे त्यांना विशेष तयारी न करता स्पर्धेत सहभागी होणे सोपे जाते.
    • या स्पर्धा विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, इंग्रजी, संगणक आणि सामान्य ज्ञान यासारख्या विषयांमध्ये सखोल समज विकसित करण्यास प्रोत्साहन देतात.
  2. आत्मविश्वास वाढवणे:
    • राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होणे आणि यश मिळवणे यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेकदा अशा संधींची कमतरता भासते आणि SOF ऑलिम्पियाड्स त्यांना स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी देतात.
    • यशस्वी विद्यार्थ्यांना मिळणारी प्रमाणपत्रे, पदके आणि बक्षिसे त्यांना आणखी प्रेरणा देतात.
  3. ग्रामीण शाळांचा राष्ट्रीय स्तराशी संपर्क:
    • झेड.पी. मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांना शहरी आणि ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांशी स्पर्धा करता येते.
    • यामुळे ग्रामीण भागातील शाळा आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक व्यासपीठाशी जोडले जाऊन त्यांचे शैक्षणिक क्षितिज विस्तारते.
  4. कौशल्य विकास:
    • ऑलिम्पियाड्समुळे विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक विचार, समस्या सोडवण्याची क्षमता आणि तर्कशुद्ध विचार करण्याची सवय विकसित होते.
    • स्पर्धेच्या तयारीदरम्यान विद्यार्थी वेळेचे व्यवस्थापन आणि दबावाखाली काम करण्याचे कौशल्य शिकतात, जे भविष्यातील शैक्षणिक आणि व्यावसायिक यशासाठी उपयुक्त ठरते.

शाळांनी घ्यावयाची कृती:

  • विद्यार्थ्यांना प्रोत्साहन: शाळांनी विद्यार्थ्यांना SOF ऑलिम्पियाड्समध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. यासाठी शाळांमध्ये जागरूकता कार्यक्रम, कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले जाऊ शकते.
  • तयारीसाठी संसाधने: शाळांनी विद्यार्थ्यांना ऑलिम्पियाडच्या तयारीसाठी अभ्यास साहित्य, सराव प्रश्नपत्रिका आणि ऑनलाइन संसाधने उपलब्ध करून द्यावीत.
  • शिक्षकांचे सहकार्य: शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या स्वरूपाची माहिती द्यावी आणि त्यांच्या नियमित अभ्यासाला ऑलिम्पियाडच्या तयारीशी जोडावे.
  • स्पर्धा संस्कृती निर्माण करणे: शाळांनी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून त्यांना यशस्वी होण्यासाठी प्रेरित करावे.

ऑलिम्पियाड्सचे स्वरूप आणि विषय:

SOF ऑलिम्पियाड्समध्ये खालील स्पर्धांचा समावेश होतो:

  • NSO (National Science Olympiad): विज्ञान विषयावर आधारित.
  • IMO (International Mathematics Olympiad): गणित विषयावर आधारित.
  • NCO (National Cyber Olympiad): संगणक आणि माहिती तंत्रज्ञान.
  • IEO (International English Olympiad): इंग्रजी भाषा.
  • IGKO (International General Knowledge Olympiad): सामान्य ज्ञान.
  • ISO (International Social Studies Olympiad): सामाजिक शास्त्र.

या स्पर्धा प्राथमिक इयत्ता १ ली ते १२ वी स्तरावर आयोजित केल्या जातात, ज्यामुळे सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येते.

ग्रामीण भागातील आव्हाने आणि उपाय:

ग्रामीण भागातील झेड. पी. मराठी शाळांना काही आव्हाने येऊ शकतात, जसे की संसाधनांची कमतरता, शिक्षकांचा अभाव किंवा जागरूकतेचा अभाव. यावर उपाय म्हणून:

  • SOF च्या संसाधनांचा वापर: SOF ऑनलाइन आणि ऑफलाइन अभ्यास साहित्य प्रदान करते, जे शाळा आणि विद्यार्थी वापरू शकतात.
  • ऑनलाइन प्लॅटफॉर्म: जिथे इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे तिथे विद्यार्थ्यांना ऑनलाइन सरावासाठी प्रोत्साहन देणे.

SOF ऑलिम्पियाड्स झेड.पी. मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी आहे, ज्याद्वारे ते शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होऊन राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडू शकतात. शाळांनी या स्पर्धांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील मुख्य प्रवाहात येऊन आपले भविष्य घडवू शकतील. यामुळे केवळ विद्यार्थ्यांचाच नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण शैक्षणिक व्यवस्थेचा विकास होईल.

अधिकृत संकेत स्थळ: https://sofworld.org