Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Tuesday 16 August 2016

एक प्रसंग देशप्रेमाचा..... संग्रहित

इ. 9 वीत होतो. दर शनिवारी सकाळची शाळा. त्या दिवशी विद्यार्थ्यांनी अंगण झाडायचं. कचरा, पाला- पाचोळा, कागद एकञ करायचा.  पेटवायचा. मग प्रार्थनेला रांगेत उभं रहायचं.  प्रत्येक शनिवारी प्रत्येक ग्रुपची पाळी. चार-पाच पोरांचा एक ग्रुप असायचा.

 एकदा राजू शिंदेच्या ग्रुपची पाळी होती. राजूनं अंगण साफ केलं. सगळा कचरा शाळेच्या पाठीमागं नेला आणि पेटवला.

 तास सुरू झाले. तिसरा तास गणिताचा. पवार सर शिकवत होते. सर नेहमी अगोदर देशप्रेमाच्या गोष्टी सांगत. देशरक्षण, देशाच्या सिमा , राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत ... सर भरभरुन बोलायचे. आम्ही भारावून जायचो. मग सर गणिताकडे वळायचे. त्या दिवशी सर भगतसिंग सांगत होते.  एवढ्यात स्टाफरूमजवळ गलका ऐकायला आला.

सर बाहेर गेले. शाळेच्या मागचा शेतकरी हातात काठी आणि ४ पोरं घेवून आला होता. सकाळी त्याचा कडबा पेटला होता. त्याचं हजार बाराशे रूपयाचं नुकसान झालं होतं. कडबा शाळेतल्याच पोरानं पेटवलाय अशी  त्याला शंका होती. तो शिव्या देत होता. सरांनी त्याला समजावलं. चौकशी करतो म्हणाले. मग तो शांत झाला.

सर वर्गावर आले. "सकाळी अंगण कुणी झाडलं?" राजू उभा राहीला. सरांनी विचारलं, गणपा शिंदेचा कडबा पेटवला का ? राजूने नाही म्हणून मान हलवली. सर म्हणाले, मग कसा पेटला ? राजू काही बोलला नाही. सरांनी राजूला वर्गाबाहेर काढले. स्टाफरूममध्ये नेले. शेतक-यादेखत हातावर वळ उठेपर्यंत मारलं. राजू काहीही बोलत नव्हता. सरांनी शेतक-याला सांगितलं, "आंम्ही त्याच्या आई बापाला बोलवून घेतलं आहे. तुम्ही उद्या या. आपण काहीतरी मार्ग काढू."

राजूला घेवून सर पुन्हा वर्गात आले. त्यांनी पुन्हा एकदा राजूला विचारलं, खरं सांग, तू कडबा पेटवलास का ? राजू पून्हा नाही म्हणाला. सरांनी पुन्हा २ छड्या मारल्या आणि उद्या "बा"ला घेवून ये म्हणून बसायला सांगितले.

 राजू उभाच होता. तो खाली मान घालून रडत होता. मग सांगायला लागला."सर, नेहमीप्रमाणं आम्ही अंगण झाडलं. शाळेमागे कचरा गोळा केला. तो पेटवला. एवढ्यात प्रार्थना चालू झाली. सगळी पोरं प्रार्थनेला गेली. माञ आग भडकल म्हणून मी तिथंच उभा होतो. पण एवढयात राष्ट्रगीत सुरू झालं.  तुम्ही सांगितलं होतं, राष्ट्रगीताला स्तब्ध उभं रहायचं असतं.  त्यामुळं मी स्तब्ध उभा राहिलो. कडबा पेटताना मला दिसला. पण राष्ट्रगीताचा अपमान नको म्हणून मी उभाच राहिलो. माझी काय बी चूक न्हांय.  मला वडलांना घेवून याला सांगितलं तर ते माझी शाळा बंद करतील, सर...

वर्ग शांत झाला. सरांचे डोळे डबडबले. सरांनी राजाला जवळ घेतलं.  एका विद्यार्थ्याला शाळेच्या मागं पाठवून त्या शेतक-याला बोलवून घेतले.

 शेतकरी वर्गात आला. सर त्याला म्हणाले, "हे बघा, मी माझ्या विद्यार्थ्याच्या वतीने तुमची माफी मागतो. तुमचं नुकसान झालंय, तर हे घ्या". सरांनी नोटांच पुडकं शेतक-यापुढं धरलं. तो अवाक् झाला. मास्तर तुम्ही का म्हणून पैसं देताय ? सरांनी त्याला वर्गाबाहेर नेलं. सर्व हकीकत सांगितली .

 राजाच्या आज्ञाधारकपणाने तोही भारावला. त्यानं पैसं स्विकारले नाहीत.

 पुढं राजा कित्येकजणांना सांगायचा, सरांनी माझ्यासाठी गणपा शिंदेची माफी मागितली.सरांनी त्या दिवशी माझ्या घरी सांगितलं असतं तर माझ शिक्षण बंद झालं असतं...

 राजा आता इंडियन नेव्हीत अंदमानला असतो. कधी कधी त्याचा फोन येतो. गावी आलं की सरांना भेटायचं आहे. त्यांना घरी घेवून जायचं आहे. त्यांच्यासाठी मी छान ड्रेस घेतलायं वगैरे सांगत असतो.

गेल्यावर्षी पवार सर अचानक गेले. गणिताच्या जोडीला देशप्रेम शिकवणारे एकमेव सर असावेत ते. मी जड अंत:करणानं राजूला फोन केला. त्यावेळी अंदमानात पहाटे ३:३० वाजले होते. "राजू ..पवार सर गेले ..!!

 राजू निशब्द झाला. दोन तिनं मिनटं काहीच बोलला नाही. नंतर राजूचा अंदमानातला हुंदका मला इथं ऐकायला आला... फक्त हुंदका.....!!

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता