Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Wednesday 18 April 2018

उडवा उडवीचा खेळ: Whatsapp वर येणाऱ्या मेसेज वर होणार ऑनलाईन बदल्या

उडवा उडवीचा खेळ: Whatsapp वर येणाऱ्या मेसेजवर  होणार ऑनलाईन बदल्या
          ┄─┅━━ⓢⓟⓙ━━┅─┄

               मागील वर्षी अर्धवट राहिलेला खेळ यावर्षी पुन्हा सुरु, आणि तो ही अर्धवट राहण्याच्या मार्गावर....
बदली हवी , बदली नको असे गट पडून मोर्चा बांधनी सुरु आणि दुसरीकडे सर्वर स्लो, सर्वर एरर, वेबसाईट एरर या समस्यांशी लढत रात्रीचा दिवस करून 20 पर्याय टाकण्याची घोड़दौड़ ही सुरुच.
मा.न्यायालय यांच्या आदेशाने पुन्हा २७/२ नेच बदल्या करण्याचे ठरले. वाटले या वर्षी तरी सर्वर चांगले स्ट्रॉन्ग असेल परंतु पुन्हा तेच लॉग इन न होणे, लॉग इन झाले तर गोल गोल चक्री तासन तास फिरत राहने, चक्री थांबली तर शाळांची नावेच न दाखविने असे प्रकार चालूच.
लाखों यूजर्स असणाऱ्या फेसबुक , ट्विटर, फ्लिप्कार्ट, अँमेझॉन सारख्या वेबसाईट कधी क्रैश किंवा हैंग झालेल्या ऐकल्या नाही. असे स्ट्रॉन्ग सर्वर आपल्याला घेता येणार नाही का ?

या ऑनलाइन बदल्या म्हणजे खरं तर उडवा उडवीचा खेळ. ज्युनियर ला बिनधास्तपने उडविण्याचा खेळ, सर्वांच्याच भावनांचा खेळ, आंधळा  खेळ. कोणी काय मागितले,कोणाला काय भेटले,आणि कोणाला काय भेटणार या प्रश्नांची उत्तरे न मिळण्याचा खेळ. 

जुन्या समुपदेशन पद्धतीत जागा दाबुन ठेवल्या जायच्या व भ्रष्टाचार व्हायचा हे खरे असले तरी काय शिल्लक राहीलं हे मात्र स्क्रीनवर अचूक कळायच.  यात मात्र  सगळच शिल्लक. सगळच उघड, काहीही मागा. पण काय भेटेल ते सांगता येणार नाही. सगळ अनिश्चित. 20 पैकी नाही भेटले तर रैंडम राउंड. त्यातही अनिश्चितता. कसा होईल क़ाय होईल काही माहित नाही.

एक उदाहरण:
20 गोळ्याची बंदूक प्रत्येकाला दिली आणि डोळ्यावर पट्टी बांधून म्हटले मार एका शत्रूला. हजारों शत्रु आहेत समोर त्यापैकी 20 निवड, कदाचित तू जे मारायला निवडशील ते  आधीच मृत ही झालेले असू शकतात. काही सांगता येणार नाही पण तरी ही, "तू ही बंदूक घे आणि लढ."

विरोध बदल्याला नसतोच कर्मचाऱ्याचा. याही बदल्याचे स्वागत बऱ्याच शिक्षकांनी केले. मी ही करतोच, तंत्रज्ञानाच्या जगात ऑनलाइन ला महत्त्व आहेच ते सर्वांनी स्विकारायलाच हवं. मात्र यातील जो आंधळा खेळ आहे तो थांबायला हवा. माझ्या परिचयातील सर्वच शिक्षक वर्ग आज त्रस्त दिसत आहे, कोणते गाव भेटेल या चिंतेत तो आहे. त्यात पुन्हा सर्वर एरर. त्या मुळे माझा फॉर्म भरल्या जाईल की नाही याचा मानसिक त्रास. मागील वर्षी तर 53+ असणाऱ्या एका शिक्षिकेचा whatsapp नसल्याने फॉर्म भरायचा राहिला.

सर्वांनाच मनासारख तर भेटणार नाहीच पण आपण निवडलेल गाव सीनियरने निवडलेल्या गावांनंतर शिल्लक राहिलेल्या गावांपैकीच मात्र उघड्या डोळ्यांनी निवडलेले आहे असे जर तो म्हणु शकत असेल तर तो शिक्षक स्वखुशीने तेथे जाईल.
या बदल्याने निश्चितच पैशाचा भ्रष्टाचार कमी होईल पण भावनांचा उद्रेक वाढेल. कारण 20 गोळ्यांची बंदूक असून ही एक ही शत्रु मारला गेला नाही याचे शल्य त्याच्या मनात राहील.

या पोस्टच्या माध्यमातून बदली यंत्रनेस एवढेच सांगने आहे की, या बदलीत पारदर्शकता आहे परंतु ही पारदर्शकता १००% झाली तर सर्वांना न्याय मिळेल. संवर्ग १, संवर्ग २ ने घेतलेल्या जागा, सोडलेल्या जागा व नेमक्या कोणत्या जागा आपल्याला खात्रिशीर मिळू शकतील हे माहित नसल्याने आज जो जिल्ह्याच्या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे तो संभ्रमात आहे. माझ्या अडचणी साठी मी खुपदा मेल केले पण कसला ही reply तेथून आला नाही.

परभणी जिल्ह्याच्या 2016 साली झालेल्या जिल्हास्तरीय बदल्या  स्वतः मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत समुपदेशन पद्धतीने राबविल्या गेल्याने प्रत्येक शिक्षकास जो हवा तो तालुका, जे हवे ते गाव, उपलब्ध असेल तर स्क्रीन वर दिसू लागले, कोणी घेतले लगेच त्याची ऑर्डर व स्क्रीन वरून संबंधित गाव हटविले जायचे.

काल परवाच नवीन वेबसाइट उघड़त असतांना मला हवे असलेले डोमेन नाव टाकत होतो परंतु जे उपलब्ध नव्हते म्हणजे ज्या नावाची वेबसाईट अगोदरच कुणीतरी बनविली आहे ते टाकताच This domain is unavailable अशी टिप येऊ लागली. अशीच नोट जर या बदली प्रक्रियेत आली तर निश्चितच या बदली प्रक्रियेत असणाऱ्यांना दृष्टि मिळेल.

(आपल्या प्रतिक्रया खालील लिंक वर देऊ शकता)
एस.पी.जोशी
spjoshi21@gmail.com
www.espjoshi.blogspot.in

==========================================================

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता