Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Saturday 17 September 2016

संदिप खरेंची संयम शिकविणारी कविता...



"मी सुद्धा चुकलो असेन",
एवढं मनात आणा!
धनुष्य मग हातातलं,
जरा संयमानंच ताणा!

बाणच हळू कानात सांगेल,
'ठेव मला भात्यात!
एवढं ऊन, एवढा पाऊस,
असणारच की नात्यात!'

वादा जवळ गप्प बसून,
संवाद करू, मारू गप्पा!
तुटण्या किंवा उसवण्याचा,
येणारच नाही टप्पा!

'अन्याय झाला' वाटेल तेव्हा,
पहिलं प्रेम आठवा!
आठवणीतलं ऐश्वर्य मग,
आतल्या खणात साठवा!

तेवढाच क्षण टळल्यावर
आकाश होतं साफ!
दंव होऊन गारवा देते,
तीच गरम गरम वाफ!

एक क्षण आवेगाचा,
फुटण्यापुर्वी अडवा!
डोळे सुद्धा राग बोलतात,
पापण्यांमागे दडवा!

थोडी गुदमर, थोडी घुसमट,
उंबरठ्यावर दाटेल!
राख झाली तरी चालेल,
असं वाटेल, ...पटेल!

दिवस रात्र असणारच,
तेव्हा आपण पूर्व बघू!
प्रकाशाचे वारकरीच की!
आपण उगवतीला निघू!

पहिली ठिणगी पडते तेव्हा,
विचार व्हावा पाणी!
मनात सूर जपतो तेव्हाच,
शब्द होतात गाणी!

कधीकधी आठवण्याहून,
विसरण्यातच मजा!
बेरजेपेक्षा कधीकधी ,
जोडून देते वजा!

बाकी उरणं महत्वाचं,
तेवढीच श्री शिल्लक!
कविता असेल साधी,
पण् विचार मात्र तल्लख!

संदीप खरे

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता